नितीन जगताप, मुंबई
आजही नोकरीच्या ठिकाणी महिलांना विशेषतः मुस्लीम महिलांना बरेचदा भेदभावाचा सामना करावा लागतो. केवळ धर्मामुळे अनेक मुस्लिम महिलांना घरकाम नाकारले जाते. कर्त्या बाईच्या जिवावर चालणाऱ्या कुटुंबावर त्यामुळे बरेचदा उपासमारीची वेळ येते. हीच अडचण ओळखून मुंबईतील एका सामाजिक संस्थेकडून या मुस्लिम महिलांसाठी रोजगाराची एक अनोखी पहल सुरू करण्यात आली आहे. टिफिन सेवा आणि शिवणकामातून या महिलांना आपल्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न People for Education Health Environment and Livelihoods Foundation (PEHEL) म्हणजेच ‘पेहेल फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेद्वारे केला जातोय.
व्यावसायिक कामे देताना शिक्षण, कौशल्य व अनुभव आदी बाबी पाहिल्या जातात. मात्र घरकाम आणि स्वयंपाक या बाबींमध्ये प्रत्येक स्त्रीला निपुण असते. त्यामुळे अनेक महिला इतरांकडे घरकाम करतात. मात्र गोवंडी भागात राहणाऱ्या मुस्लिम महिलांना ही कामे मिळवण्यासाठीही संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आता सर्रास पाहायला मिळते. त्यांना वारंवार नकार मिळतो. त्यामुळे पोटापाण्यासाठी करायचे तरी काय, असा प्रश्न या महिलांपुढे उभा राहिला. त्यामुळे गोवंडीतील अनेक महिलांना भेंडी बाजार आदी मुस्लिमबहुल भागात जाऊन काम करण्याची वेळ येई.
गोवंडीतील उच्चभ्रू घरांमध्ये अनेकदा जेवण बनवणारी बाई कामावर आली नाही की बाहेरून जेवण मागवण्याची आवश्यकता भासते. घरघुती जेवण मागवण्याला त्यांची पहिली पसंती असते. दुसरीकडे स्वयंपाकात पारंगत असूनही अनेक मुस्लिम महिलांना काम मिळत नाही. मुंबईच्या आयआयटीमध्ये प्रोडक्ट मॅनेजर असलेल्या डॉ. पियू परदेशी यांनी यातून मार्ग शोधून काढण्याचा प्रयत्न केला. एकीकडे महिलांसाठी रोजगार, तर दुसरीकडे विद्यार्थ्यांना चांगले जेवण मिळेल, यासाठी त्यांनी टिफिन सेवा सुरू केली. या कामी त्यांचे पती डॉ. सिद्धार्थ आचार्य यांनी साथ दिली. आणि आकाराला आली 'पेहेल' ही संस्था. हे जेवण परदेशी दाम्पत्याच्या राहत्या घरीच बनवले जाते. सर्व महिला तिथूनच हे सर्व काम करतात. स्वयंपाक करताना स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते.
पेहेलमुळे रोजगार मिळालेल्या अनेक मुस्लीम महिलांपैकीच एक आहेत कुलसुम खान. त्या म्हणतात, "मी अनेक ठिकाणी घरकामासाठी प्रयत्न केले; परंतु मला घरकाम मिळाले नाही. पुढे मला कांता दीदीच्या माध्यमातून पेहेल फाऊंडेशनबाबत माहिती मिळाली. आता मी येथे जेवण बनवते, त्या माध्यमातून मला रोजगार मिळाला आहे."
कुलसुम यांनी ज्या कांता दीदीचा उल्लेख केला, त्या म्हणजे कम्युनिटी हेल्थ वर्कर कांता नादर. त्यांनाही पेहेलमुळेच रोजगाराची संधी उपलब्ध झाली. याविषयी त्या सांगतात, "मी यापूर्वी दोन सामाजिक संस्थांमध्ये काम केले आहे. मला तब्बल २८ वर्षे कामाचा अनुभव आहे. मात्र माझे शिक्षण केवळ पाचवीपर्यंत झाले आहे. शिक्षण हा माझ्यासाठी मोठा अडथळा ठरत होता. त्यामुळे आधीची कामे सुटली. पुढे माझी भेट डॉ. पियू परदेशी यांच्याशी झाली. त्यांनी मला कामाची संधी दिली. गेल्या दोन वर्षांपासून मी इथे त्यांच्यासोबत काम करते. सध्या मी महिलांच्या आरोग्याबाबत सर्वेक्षण करते."
पेहेल ही परवीन खाजा यांची पहिलीच नोकरी. याविषयी त्या सांगतात, "महिलांनी नोकरी करू नये असा सूर मुस्लीम समाजातील परंपरावादी मंडळी लावत असतात. माझ्या घरून मात्र नोकरीसाठी मला पाठिंबा होता. पण बाहेर नोकरी करू शकेल इतका आत्मविश्वास माझ्यामध्ये नव्हता. पुढे मला पेहेल फाउंडेशनबाबत माहिती मिळाली. त्यानंतर माझी इंटर्न म्हणून मुलाखत घेण्यात आली आणि मी संस्थेशी जोडली गेले. इथे मला प्रशिक्षणही मिळाले."
पेहेलमध्ये समन्वयक म्हणून काम पाहणाऱ्या परवीन पुढे सांगतात, "झोपडपट्टीतील महिलांनी बाहेर पडावे, त्यांना रोजगार मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्या महिलांना आम्ही शिवणकामाचे प्रशिक्षण देत आहोत जेणेकरून त्या स्वयंपूर्ण होऊ शकतील."
मुस्लीम महिलांची अडचण ओळखून त्यांना रोजगार मिळवून देण्याची कल्पना ज्यांनी सत्यात उतरवली त्या पेहेल फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. पियू परदेशी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी पेहेलचा हेतू स्पष्ट केला. त्या म्हणाल्या "मुळात भेदभाव चुकीचाच आहे. धर्मामुळे रोजगार नाकारणे वाईटच. मुस्लिम महिलांना देखील स्वीकारायला हवे. त्यांचे कौशल्य ओळखून त्यांना आत्मनिर्भर कसे बनवता येईल या विचारातूनच पेहेल आकाराला आली. त्यामुळे महिलांना रोजगार आणि विद्यार्थ्यांना चांगले अन्न हा दुहेरी हेतू साध्य झाला. यासोबतच महिलांचे आरोग्य आणि शिवणकाम यावरही पहलमध्ये काम केले जात आहे. सध्या १० महिला पेहेलसोबत जोडल्या गेल्या आहेत. भविष्यात ही संख्या आणखी वाढेल अशी आम्हाला आशा आहे."
पेहेलचे संचालक सिद्धार्थ आचार्य म्हणाले, सर्वांगीन बदल घडवायचा असेल तर ते केवळ शिक्षण, रोजगार किंवा आरोग्य यांच्यापुरतेच मर्यादित असून चालणार नाही. इतर क्षेत्रांकडेही आपण लक्ष द्यायला हवे. यातूनच पेहेल आकाराला आली. 'खुशाल रसोई, सशक्त शिलाई' हे आमचं घोषवाक्यच आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना रोजगार प्रशिक्षणही दिले जात आहे."
महिलांसाठी आरोग्य शिबिर
बऱ्याचदा महिला कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे त्यांचे आजारपण वाढत जाते. महिलांना वेळेत उपचार मिळावे, यासाठी पेहेलने पुढाकार घेतला आहे. त्यांच्यामार्फत महिलांची साखर, रक्तदाब तपासणी करण्यात येते. आरोग्य शिबिरेही भरवण्यात येतात. आजारी महिलांना पेहेलमार्फत मोफत मार्गदर्शन केले जाते. इतकेच नव्हे तर उपचारासाठी मदतदेखील केली जाते.
- नितीन जगताप