आत्मनिर्भर भारत ही घोषणा नव्हे, कर्तव्य !

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 2 Years ago
S. Jayshankar
S. Jayshankar

 

पुणे: चीनबरोबरचा व्यापारातील असमतोल मोठा आहे. त्यामुळेच 'आत्मनिर्भर भारत'च्या माध्यमातून हा असमतोल दूर करावा लागेल, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज सांगितले. आत्मनिर्भर भारत ही केवळ घोषणा नसून कर्तव्य आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
 
परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांच्या वतीने आयोजित केलेल्या एशिया इकॉनॉमिक डायलॉग या चर्चासत्राच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. या उद्घाटनाच्या सत्रात जयशंकर यांच्याबरोबर भूतानचे अर्थमंत्री लिंपो नामगे आणि मालदीवचे अर्थमंत्री इब्राहिम अमीर यांनी सहभाग घेतला होता. या तीन दिवसांच्या चर्चासत्राचे समन्वयक आणि चीनमधील भारताचे माजी राजदूत गौतम बंबावाले यांनी पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन केले. एशिया इकॉनॉमिक डायलॉगचे हे चौथे वर्ष आहे. पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यावेळी उपस्थित होते.
 
 
चीनबाबत बोलताना जयशंकर म्हणाले,"चीनबरोबरच्या व्यापारातील असमतोल मोठा आहे. उत्पादनाच्या शक्तीच्या जोरावर ते वरचढ ठरण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक उद्योगांचे तिकडे स्थलांतरही होत आहे. त्यामुळेच 'आत्मनिर्भर भारत'च्या माध्यमातून देशाला उत्पादन केंद्र बनवून असमतोल दूर करावा लागेल."जयशंकर यांनी भारताकडे आलेले जी २० चे अध्यक्षपद, शेजाऱ्यांबाबतचे धोरण आणि पर्यावरण या मुद्द्यांवरही चर्चा केली. जयशंकर म्हणाले,''भारताकडे जी २० चे अध्यक्षपद केवळ भारताशी संबंधित नाही, तर सर्वांचा विकास हेच आमचे उद्दिष्ट आहे. कोरोना, संघर्ष आणि पर्यावरण यांचा जगावर परिणाम झाला असला तरी, त्यावर उपायही आहेत. जी-२० कडे आम्ही त्याच दृष्टिकोनातून पाहतो. जी २० च्या बैठका भारतात सर्वत्र घेण्यामागे, भारताचे जगासमोर मार्केटिंग करून देशाची खरी क्षमता समोर आणणे हा आहे. सामान्य लोकांमध्येही त्याबद्दल उत्सुकता वाढते आहे. " अनेक समस्या पर्यावरणाशी निगडित असल्याने 'हरित निधी'ची उभारणी आवश्यक असल्याचे जयशंकर यांनी सांगितले.
 
जग बहुकेंद्री होत असून, त्यात भारताची काय भूमिका असेल, असे विचारले असता जयशंकर यांनी, आशिया बहुकेंद्री झाल्याशिवाय जग बहुकेंद्री होणार नाही, आणि त्याची मोठी जबाबदारी भारतावरच आहे, असे ठामपणे सांगितले. लिंपो आणि अमीर यांनी भारताला जी २० चे अध्यक्षपद मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच अनेक अपेक्षाही व्यक्त केल्या. पर्यावरण, कोरोनानंतर अद्याप अडचणीत असलेली अर्थव्यवस्था आणि अपूर्ण प्रकल्प या मोठ्या समस्या असल्याचे या दोन्ही अर्थमंत्र्यांनी सांगितले. पर्यावरण निधी आवश्यकच असून तोपर्यंत आर्थिक मदतही तातडीने मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 
पाकिस्तानला चिमटा
भारताच्या शेजारी देशांबरोबरच्या धोरणात २०१४ नंतर मोठा बदल झाला आहे. भारतातील विकासाच्या लाटेचा फायदा सर्व शेजाऱ्यांना व्हावा, अशीच आमची इच्छा आहे, असे जयशंकर यांनी सांगितले. व्यापार सहकार्य वाढवून काहो देण्याबरोबरच काही घेणेही महत्त्वाचे असते, असेही ते म्हणाले. पाकिस्तानच्या सद्यस्थितीबाबत विचारले असता, 'आपला शेजारी आर्थिक संकटात असावा, असे कोणत्याही सूज्ञ देशाला वाटणार नाही. पण, केवळ पाकिस्तानच नाही तर आर्थिक अडचणीत असलेल्या देशांना जग सहकार्य करू शकते, पण त्यांनी त्यांच्याकडील राजकीय आणि सामाजिक समस्या सोडविणे आवश्यक आहे.