गेल्या काही दिवसांपासून मंत्री नितेश राणे हे सातत्याने मुस्लिम समाजाला टार्गेट करणारी आणि राज्यातील धार्मिक सौहार्द बिघडवणारी वक्तव्य करत आहेत. यामुळे हिंदू मुस्लिम समाज एकमेकांसमोर उभे राहण्याची शक्यता आहे. नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी हिंदू मटण दुकानदारांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या धोरणाची घोषणा केली होती. यावरून देखील राज्यात मोठा वाद झाला होता.
नुकतच नितेश याने यांनी एका सभेत म्हटल की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोणीच मुस्लिम नव्हतं. काही लोक उगाच त्यांच्या टेपरेकॉर्डर चालवतात. स्वराज्याच्या लढाई ही इस्लामविरोधातच होती. हिंदू विरुद्ध मुस्लिम अशीच होती.” त्यांच्या या विधानावर चोहीबाजूने टीकेची झोड उठली आहे.
या विधानावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितेश राणे यांचा समाचार घेतला आहे. राणे यांच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “देशाबद्दल प्रेम असणारा मुस्लिम समाज महाराष्ट्रात आहे. आपण इतिहास वाचला आहे. इतिहासात अनेक मोठमोठ्या लोकांनी पुस्तक लिहिली आहेत. इतिहासाच संशोधन केलं आहे. इतिहासाची माहिती खोलवर मिळवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर मुस्लिम लोक सुद्धा होते. नितेश राणे यांनी इतिहास वाचायला हवा. दारुगोळा कोण संभाळत होतं? त्याची कितीतरी उदहारण आपल्याला देता येतील.”
पुढे ते म्हणाले, “यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची शिकवण दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाला घेऊन स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी समाजामध्ये समतेचा भाव निर्माण केला. दोन्ही बाजूच्या सदस्यांनी कुठल्याही वक्तव्यामुळे कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. नितेश राणे यांनी हे वक्तव्य का केलं माहीत नाही. त्यांच्या वक्तव्यामागचा हेतू माहित नाही. परंतु देशाबद्दल प्रेम असणारा प्रत्येक मुस्लिम हा देशप्रेमीच आहे.”
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी अजित पवार कराड प्रिती संगमावर गेले होते. यावेळी ते बोलले.
याचविषयावर बोलताना शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले नितेश राणे यांची कानउघडणी केली. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू-मुस्लिम असा भेदभाव कधीच केला नाही. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची संकल्पना सर्वधर्म समभावाची होती. त्यांनी तसा भेदभाव केला असता तर आपण मुघलांच्या गुलामगिरीतच असतो.”
तर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मी अधूनमधून पुस्तकं वाचतो, पण नितेश राणेंनी वाचलेले पुस्तक कदाचित माझ्याकडून वाचायचे राहून गेले असावे. कारण मी जे वाचले, त्यात शिवाजी महाराजांबरोबर मुस्लिम होते. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर लढणारे देशभक्त मुस्लिम होते.”
नितेश राणे यांच्यावर टीका करत खासदार संजय राऊत म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता? किंवा शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते? बखरी चाळाव्यात, समजून घ्यावा इतिहास मग इतिहासावर बोलाव.”
ते पुढे म्हणाले, “इतिहास बदलण्याची प्रक्रिया सुरु आहे, ती अत्यंत गंभीर आणि घातक आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी पहिली लढाई औरंगजेबाबरोबर नाही तर चंद्रराव मोरेबरोबर केली हा इतिहास आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना इतिहासाचे धडे योग्य इतिहास तज्ञाकडून द्यावेत.”
प्रक्षोभत भाषण आणि नितेश राणे
नितेश राणे यांनी गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी सरकार म्हणत मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचे काम सूरु केले आहे. काही दिवसांपूर्वी मढी ग्रामपंचायतीने मुस्लिम व्यवसायिकांविरोधात एक ठराव मंजूर केला होता. या ठरावाविरोधात निदर्शने झाल्यानंतर हा ठराव गटविकास अधिकाऱ्यांनी रद्द केला. यानंतर नितेश राणे यांनी ठराव रद्द करण्याच्या विरोधात भूमिका घेतली होती.
गटविकास अधिकाऱ्यांनी फेटाळला ठराव पुन्हा नव्याने करा. त्यावर ९९ टक्के ग्रामस्थांच्या सह्या घ्या. मी या ठरावाला मान्यता मिळवून देतो. राज्यात व देशातील सरकार तुमच्या पाठीशी ठाम उभे आहे. कोणता अधिकारी आडवतो ते मी बघतो असे विधान केलं होत.
काही दिवसांपूर्वी हिंदू मटण दुकानदारांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या धोरणाची घोषणा नितेश राणे यांनी आम्ही मटणाच्या दुकानांना मल्हार झटका प्रमाणपत्र देणार आहोत. त्यासाठी आम्ही मल्हार सर्टिफिकेशन नावाची व्यवस्था तयार केली आहे. हिंदूंसाठी हिंदूंची मटणाची दुकानं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. मल्हार प्रमाणपत्र असलेल्या दुकानातूनच मटण खरेदी करावं अस आवाहन मंत्री नितेश राणे यानं हिंदू समुदायाला केलं होतं. यावर सर्व स्तरावरून टीका झाली होती.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter