हजयात्रेतील दुर्घटनेतून जगाने घ्यायला हवा धडा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 8 d ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

पर्यावरणात वेगाने बदल होताना दिसत आहेत. एका ठिकाणी घडलेली घटना उर्वरित जगाला धोक्याचे संकेत देण्यास पुरेशी असते. नुकतीच इस्लामची पवित्र हज यात्रा संपन्न झाली. या यात्रेदरम्यान उष्माघातामुळे तेराशेहून अधिक भाविक  मृत्यूमुखी पडले. या दुर्घटनेतून आपण सर्वांनी बोध घ्यायला हवा. 

गेल्या काही दिवसांत हज यात्रेकरूंना अराफात आणि मीना या दोन ठिकाणांदरम्यान प्रवास करताना जितक्या उष्णतेचा सामना करावा लागला, तो यापूर्वी कधीही झाला नव्हता. इतिहासात अनेक वेळा साथीच्या आजारांमुळे हज यात्रा प्रभावित आणि विस्कळीत झाल्या आहेत. परंतु उष्णतेमुळे सुमारे हजार लोकांचा जीव जाईल, असा विचारही काही दिवसांपूर्वी कोणी केला नव्हता. 

या काळात तेथे जे काही घडले ते केवळ सौदी अरेबियाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे बदलते वास्तव आहे. सध्या जगाच्या कानाकोपऱ्यातून वाढत्या तापमानाविषयी बातम्या येत आहेत. हज काळात अराफत आणि मीना दरम्यान कमाल तापमान ५१.८ अंश नोंदवले गेले होते. मात्र परंतु २८ मे रोजी दिल्लीतील मंगेशपूर येथे नोंदवलेले गेलेलं तापमान यापेक्षा एक अंशाने अधिक होते.

आपली अडचण अशी आहे की आपण अशा भयंकर घटनेला एक दोन दिवसांचा उद्रेक समजतो आणि गप्प बसतो आणि  पुढच्या प्रकोपाची वाट बघत बसतो. सौदी अरेबियामध्ये हेच घडले. भारतात आणि जगभर हेच घडतंय. एवढा मोठा अपघात झाला मात्र सौदी सरकारकडून  कितीतरी दिवस यावर अधिकृत प्रतिक्रियादेखील  आली   नव्हती. 

सौदीतील हे सर्व अचानक घडलेले नाही. सौदी अरेबियामध्ये दरवर्षी सरासरी तापमान ०.४ अंश सेल्सिअसने वाढत आहे, असे आकडे सांगतात म्हणजेच आपण आज जिथे पोहोचलो  तिथे एक ना एक दिवस पोहोचणारच  होतो.

पर्यावरण वाचवण्यासाठी सौदी अरेबिया कितपत गंभीर आहे, हाही प्रश्न आहेच. याबाबत दोन गोष्टी सांगता येतील. जगातील इतर देशांप्रमाणे हा देशही कधी पर्यावरणासाठी पुढाकार घेताना दिसतो, तर कधी त्याला हरताळ फासताना दिसतो. 

या वर्षी डिसेंबरमध्ये सौदी अरेबियातील रियाध येथे जागतिक पर्यावरण परिषद COP-16 होणार आहे. संयुक्त राष्ट्रांद्वारे आयोजित ही सर्वात मोठी पर्यावरण परिषद असते. यामध्ये १९७ देश सहभागी होणार आहेत. सौदी अरेबियामध्ये होणारी ही आजवरची सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय परिषद असेल. सौदीही या आयोजनाबाबत खूप उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. या परिषदेत पर्यावरण रक्षणाविषयी काही ठोस निर्णय घेण्यात येतील आणि  संमेलन यशस्वी यासाठी तो देश विशेष प्रयत्न करत आहे. 

मात्र दुसरीकडे, जीवाश्म इंधनाचा वापर झपाट्याने कमी करण्याचा सर्व देशांनी प्रयत्न केला पाहिजे, असे जगातील सर्व पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. सौदी अरेबिया मात्र या समस्येवर केवळ मौन बाळगत नाही, तर अशा युक्तिवादांवर टीकाही करत आहे.

हज यात्रेकरूंसोबत ही दुर्घटना घडली, त्याच्या  काही दिवसांआधीच जी-7 देशांनी सौदी अरेबिया आणि चीनसह जगातील श्रीमंत देशांना पर्यावरणाच्या संकटापासून जगाला वाचवण्यासाठी सढळ हस्ते मदत करण्याचे  आवाहन केले होते. सौदी अरेबियाने हज यात्रेच्या घटनेवर मौन पाळले तसेच या आवाहनावर शांत राहणेच पसंत केले. 

त्यामुळे सौदी अरेबियामध्ये हज यात्रेदरम्यान घडलेली दुर्घटना तर संपूर्ण जगासाठी मोठा इशारा आहे. तापमान वाढीची टांगती तलवार आपल्याही डोक्यावर असून, ही वेळ निष्क्रिय बसण्याची नक्कीच नाही.

(अनुवाद - फजल पठाण)

- हरजिंदर
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter