मराठी संतपरंपरेत संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यानंतर आपल्या वाङ्मयाच्या आविष्कारातून महासमन्वय घडवून आणणारे थोर संत म्हणून संत शेख महंमद यांचे मराठी साहित्यविश्वात अनन्यसाधारण स्थान आहे.'नारळ वरुता कठीण, तैसे अंतरी जीवन, शेख महंमद अविंध, त्याचे हृदयी गोविंद' असे म्हणणाऱ्या या अवलिया संताने वारकऱ्यांच्या हृदयामध्ये स्थान मिळवून आपल्या वैविध्यपूर्ण रचनांनी मराठी साहित्यविश्वात मोलाची भर घातली. मराठी साहित्यविश्वात त्यांनी केलेल्या कार्यामुळे योगिराज, भागवत संप्रदायी संत शेख महंमद महाराज म्हणून त्यांना ओळखले जाते.
शेख महंमदांनी आपल्या रचनांसाठी 'शेख महंमद' अशी आपली नाममुद्रा वापरली आहे. ते भाषाप्रभू होते. त्यांच्या रचना या ग्रंथी ओवी, आवी गीत, दुचरणी ओवी, दीडचरणी ओवी, मिश्र ओवी, आरत्या इत्यादी स्वरूपातील आणि ओवीप्रमाणे असल्याने त्या सहजपणे म्हटल्या जातात. संत शेख महंमद हे वारकरी परंपरेत बहुभाषाप्रभू, चतुरस्र, व्यासंगी तसेच समाजातील अनिष्ट रूढींवर थेट प्रहार करणारे म्हणून ओळख असलेले संत होते. यासोबत भागवत संप्रदायाचा एक महासमन्वय घडवून आणणारे मराठी भाषेतील थोर संत म्हणूनही त्यांची नोंद होते.
वा. सी. बेंद्रे यांनी संत शेख महंमद यांच्या समग्र वाङ्गयाचे संपादन १९५९ दरम्यान केले होते. त्यात पहिल्या भागाला संत शेख महंमदकृत 'योगसंग्राम' आणि दुसरा भाग हा 'कवितासंग्रह' असे नाव त्यांनी नाव दिले आहे. 'योगसंग्राम' या ग्रंथाचे डॉ. यू. म. पठाण यांच्यासह विविध संशोधक, तज्ज्ञांसह श्रीगोंद्यातील श्री संत शेख महंमद महाराज देवस्थान उत्सव प्रतिष्ठान व ग्रामस्थ यांनीही 'संत शेख महंमद महाराज श्रीगोंदेकरकृत सार्थ योगसंग्राम' नावाने संपादन केले आहे. त्यांनी केलेल्या आरत्यांमधून सद्गुरू दिगंबरा, सद्गुरू नभा, जयवंत परब्रह्मा, अवक्ता निज रूपा या रूपांच्या आरती पदबंधातून करतात. 'जय जय आरती अविनाशरूपा, धूप दीप वोवाळिला अजपजपा' असे म्हणतात.
शेख महंमदांनी आपल्या रचनांमधून सद्गुरुमहिमा, भक्तिबोध, आचारबोध, कथन केले असून, त्यांच्या रचनांमध्ये प्रामुख्याने योगसंग्राम, पवनविजय, निष्कलंक प्रबोध, गायका, मदालसा, अभंग व स्फुटरचना, हिंदुस्थानी कविता, साठी संवत्सर, ज्ञानसागर आणि डॉ. गं. ना. मोरजे यांनी प्रसिद्ध केलेले अप्रसिद्ध अभंग व डॉ. भीमा मोदळे यांना क्षेत्रीय अभ्यासात आढळलेले अभंग आदींचा समावेश असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
ज्येष्ठ साहित्यिक व अभ्यासक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले, "मराठी भाषेच्या विकासात भिन्न भिन्न पंथ, संप्रदायांतील वेगवेगळ्या लेखकांचे, संतांचे मोठे योगदान आहे. ते जसे जैनांचे आहे तसेच मुस्लिम मराठी संतांचेही आहे. शेख महंमद हे त्या परंपरेतील एक महत्त्वाचे नाव. भक्ती संप्रदाय आणि सूफी परंपरा या दोन्हींचे ऐक्य त्यांच्या मांडणीत आहे. निर्गुण, निराकार अशी ईश्वराची त्यांची संकल्पना आहे. विविध धर्मातील ईश्वरऐक्याचा वेध ते घेतात. मराठी भाषा आणि वाङ्गय समृद्ध करण्यात त्यांचाही वाटा मोठा राहिला आहे."
ज्येष्ठ साहित्यिक प्रा.फ. म. शहाजिंदे म्हणतात,"सूफी संतांनी देशातील बहुतांश भाषांमध्ये साहित्याची निर्मिती केली. त्यात मराठी भाषेला आणि संत परंपरेला समृद्ध करण्यात त्यांचे खूप मोलाचे योगदान राहिले आहे. या मातीतील वारकरी परंपरेला, धार्मिक परंपरेला अधिष्ठान मिळवून देत त्यांनी एकाच वेळी अंधश्रद्धा, अनिष्ट रूढींवर प्रहार केले. समाजाला समतेची शिकवण दिली."
संत साहित्याचे अभ्यासक प्रा. महेबूब सय्यद यांनी सांगितले की, "तेराव्या शतकापासून मुस्लिमांनी मराठीत लिखाण केल्याचे दिसून येते. मुस्लिम मराठी संतकवींनी आपल्या लिखाणातून सामाजिक आणि आध्यात्मिक ऐक्याचा विचार मांडला. 'याति मुसलमान। महाराष्ट्री वचने । ऐकती आवडीने।' असे शेख महंमदाने म्हटले आहे. वारकरी संप्रदायाला शेख महंमदांबद्दल जशी जवळीक होती तशीच जवळीक शेख महंमदांनादेखील वारकरी संप्रदायाबद्दल होती."