कुंभमेळा १९४१ : निजामाच्या दवाखान्यात झाले हजारो भाविकांवर मोफत उपचार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 d ago
१९४१च्या कुंभमेळ्याविषयी निझाम सरकारच्या रिपोर्टमधील एक फोटो. 
(निझाम मीर उस्मान अली)
१९४१च्या कुंभमेळ्याविषयी निझाम सरकारच्या रिपोर्टमधील एक फोटो. (निझाम मीर उस्मान अली)

 

सय्यद शाह वाएज 
 
हिंदू संस्कृतीमध्ये कुंभमेळ्याला मोठे धार्मिक महत्व आहे. अनेक पंथांचे, विचारांचे साधू, महंत, संत कुंभमेळ्यात सहभागी होतात. दर तीन वर्षांनी प्रयागराज, उज्जैन, नाशिक आणि हरिद्वार येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. कुंभमेळ्याचा मध्ययुगीन काळापासूनचा इतिहास उपलब्ध आहे. मध्ययुगीन काळात अनेक तत्कालीन मुस्लिम शासकांनी कुंभमेळ्यासाठी मदत केली. अर्थातच यामध्ये अकबर बादशाहने केलेली मदत व त्यासाठी आखलेल्या योजनांचा इतिहास महत्त्वाचा आहे. अकबरानंतर अनेक मोगल शासकांनीही कुंभमेळ्यासाठी मदत केली. मोगलांप्रमाणेच उत्तरेतील काही मुस्लिम नवाबांनी कुंभमेळ्यासाठी आर्थिक मदत व इतर सुविधा पुरवल्या. 

हैदराबादची वैद्यकीय प्रगती
निजाम मीर उस्मान अलींच्या काळात हैदराबादमध्ये आरोग्याच्या सुविधा निर्माण करण्याकडे विशेष लक्ष पुरवण्यात आले होते. त्यामुळेच हैदराबाद शहरात उस्मानिया रुग्णालय, क्वारंटाईन हॉस्पिटल व अन्य दवाखाने सुरु झाले. निजाम मीर उस्मान अलींनी स्थापन केलेल्या उस्मानिया विद्यापीठात स्थानिक उर्दू भाषेत वैद्यकीय शिक्षण दिले जाऊ लागले होते. त्यामुळे स्थानिक विद्यार्थी मोठ्या संख्येत वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनत होते. 

यामुळेच प्रगत वैद्यकीय सुविधा असलेले शहर म्हणून हैदराबादला वसाहतकालीन भारतात लौकीक मिळाले होते. भारतातल्या वेगवेगळ्या शहरात निर्माण झालेल्या आपत्कालीन स्थितीत हैदराबादच्या वैद्यकीय पथकाने सेवा पुरविली होती. कुंभमेळ्याच्या काळातही हैदराबादेतल्या वैदकीय पथकाने मोठी कामगिरी बजावली होती. याचा एक अहवाल हैदराबादच्या निजाम राजवटीच्या वैद्यकीय विभागातील महंत बाबा पुरणदास उदासीन यांनी प्रकाशित केले. हैदराबादमध्ये उदासीन साधूंचे एक आश्रम होते, त्याचे बाबा पुरणदास हे एक प्रमुख होते. 

हैदराबादचा कुंभमेळ्यातील वैद्यकीय सेवेचा प्रस्ताव 
सन १९४१- ४२मध्ये अलाहाबाद (आताचे प्रयागराज) येथे कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या कुंभमेळ्यात लाखो लोक सहभागी झाले होते. कुंभमेळ्यांमध्ये वैद्यकीय सुविधा नसल्याने मोठ्या समस्या निर्माण व्हायच्या. या असुविधांच्या बातम्या देशभरातील वर्तमानपत्रात अनेकवेळेस प्रकाशित झाल्या होत्या. त्यामुळे त्यावर्षी हैदराबादच्या वैद्यकीय विभागकडून पथक पाठवण्यात आले होते. याचप्रकारचे पथक हैदराबादच्या आरोग्य विभागाने हरिद्वार व अन्य कुंभमेळ्यातही पाठवले होते. 

त्यापार्श्वभूमीवर बाबा पुरणदास यांनी १९४१-४२ च्या कुंभमेळ्यातील भाविकांच्या हिताचा विचार करुन निजाम मीर उस्मान अली यांच्या सेवेत एक विनंती अर्ज सादर केला. मौलवी सय्यद अब्दुल अजीज हे निजाम राज्याच्या धार्मिक शिष्टाचार विभागाचे प्रमुख होते. त्यांनी या विनंती अर्जावर गांभीर्याने विचार करुन बाबा पुरणदास यांचा कुंभमेळ्यात वैद्यकीय पथक पाठवण्याचा प्रस्ताव तात्काळ मंजूर केला. आणि हैदराबादच्या एका वैद्यकीय पथकाला कुंभमेळ्यात पाठवण्याचे आदेश जारी केले.  

कुंभमेळ्यातील हैदराबादचे वैद्यकीय पथक 
निजाम सरकारच्या आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य पंडीत राधाकृष्ण आणि निजाम रुग्णालयातील डॉक्टर पंडीत एम. ए. रंगाचार्य यांच्या नेतृत्वात एका वैद्यकीय पथकाची स्थापना करण्यात आली. २६ डिसेंबर १९४१ रोजी हे पथक हैदराबादवरुन अलाहालबादला पाठवण्यात आले. १ जानेवारीला या पथकाने आपल्या सेवेला सुरुवात केली. स्वामी हरनामदासजी आणि रायताराचंद साहब गुप्ता यांच्या उपस्थितीत हैदराबादच्या वैद्यकीय पथकाचे उदघाटन करण्यात आले. 

यावेळी बोलताना राय ताराचंद गुप्ता म्हणाले, ‘‘विशेष उल्लेखनीय बाब ही आहे की, निजाम राज्याचे सरकारी आयुर्वेदीक रुग्णालयाचे जे पथक येथे सेवा देत आहे, त्याच्या स्थापनेमुळे कुंभमेळ्याच्या अगणित भाविकांना त्याचा लाभ मिळत आहे. हा लोकहिताचा उपक्रम मानवतेविषयी आस्था व सेवेचे एक अतिशय चांगले उदाहरण आहे. हरिद्वारच्या कुंभमेळ्याप्रमाणेच इथेही त्यांनी उत्तम सेवा द्यावी अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. मी इश्वराकडे प्रार्थनाकडे करतो की, निजाम मीर उस्मान अली व त्यांच्या राजपुत्रांना दिर्घायुरोग्य लाभावे.’’ 

मौलवी अब्दुल अजीज यांची कुंभमेळ्यातील वैद्यकीय पथकाला भेट
अलाहाबादच्या वैद्यकीय पथकाला पाठवल्यानंतर हैदराबादच्या धार्मिक शिष्टाचार विभागाचे प्रमुख मौलवी अब्दुल अजीज हे पथकाचे काम पाहण्यासाठी कुंभमेळ्याला गेले होते. २५ जानेवारीला मौलवी अब्दुल अजीज हे अलाहबादला पोहोचले. त्यांचे अलाहाबादला मोठे स्वागत करण्यात आले. सुरुवातीला त्यांनी आयुर्वेदीक दवाखान्याची पाहणी करुन काही सुचना दिल्या. वेगवेगळ्या आखाड्याच्या संत महंतांकडूनही त्यांचे स्वागत करण्यात आले. काही वेळ मोटारीतून कुंभमेळ्यात फिरल्यानंतर त्यांना तब्बल एक मैल पायी चालत जाऊन कुंभमेळ्याच्या व्यवस्थेची पाहणी केली. कुंभमेळ्याच्या पाहणीनंतर काही निवडक साधूंच्या सेवेत त्यांनी भेट म्हणून रोख रकमांचा नजराणा सादर केला. 

रुग्णालयातील उपचार सुविधा
निजाम राजवटीच्या या दवाखान्याने कुंभमेळ्यात खूप महत्त्वाची भूमिका पार पाडली. या दवाखान्याचा जो अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे, त्यामध्ये अनेक रुग्णांच्या प्रतिक्रिया आहेत. त्यावरुन रुग्णांवर झालेल्या उपचारांची माहिती मिळते. जखमा झाल्यानंतर प्रथमोपचार करण्यापासून सर्दी, ताप, डोकेदुर्खी, डोळ्यांवर उपचार, जुलाब, उलट्या, पोटाच्या अन्य विकारांवरदेखील येथे उपचार करण्यात आल्याचे या प्रतिक्रियांवरुन दिसून येते. 

अब्दुल अली खान नावाच्या एका व्यक्तीची प्रतिक्रिया या रजिस्टरमध्ये नमूद आहे. तो या दवाखान्यात दहा दिवसांपर्यंत ॲडमीट होता. तर रामशरण नावाचे एक दुसरे रुग्ण ज्यांना फोडे आले होते. त्यामुळे शरीरात वेदना होत होत्या. ते देखील या रुग्णालयात काही दिवस उपचार घेत होते. चुन्नीलाल नावाचे निवृत्त कार्यालय अधिक्षक कुंभमेळ्यात सामील झाले होते. त्यांना खरुज झाली होती. त्यामुळे त्वचेवर जखमादेखील झाल्या होत्या. या रोगाने अनेक वर्षापासून पिडीत होते. पण कुंभमेळ्यातील निजाम दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर त्यांना या रोगापासून मुक्ती मिळाली होती. 

मुखर्जी नावाच्या रुग्णाला कुंभमेळ्यादरम्यान छातीत वेदना होऊ लागल्या. ते खूप अस्वस्थ स्थितीत दावाखान्यात आले. त्यानंतर दवाखान्यातील औषधांची एक खुराक घेतल्यानंतर त्यांना बरे वाटू लागले. हैदराबादच्या या सरकारी वैद्यकीय पथकाने कुंभमेळ्यादरम्यान एकूण ३,२९५ रुग्णांवर उपचार केले होते. हैदराबाद, बलुचिस्तान, पंजाब, सिंध आणि त्याकाळातील सेंट्रल प्रोव्हीएन्समध्ये राहणाऱ्या भाविकांनी मोठ्या प्रमाणात या रुग्णालायचा लाभ घेतला होता. 

मान्यवरांच्या प्रतिक्रिया
कुंभमेळ्यात निजाम सरकारने पुरवलेल्या सेवेविषयी अनेक मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले होते. वैद्य भवानी दत्ता शर्मा (सचिव, अखिल भारतीय धन्वंतरी सेवा समिती), सरकार बहादूर जौहरी (बार कौन्सिल सचिव), आणि अॅडव्होकेट गुलाब राय (हायकोर्ट निजाम सरकार), यांनी या दवाखान्याच्या कार्याची प्रशंसा केली.

विशेष म्हणजे, कुंभमेळ्यातील हा एकमेव दवाखाना होता जो २४ तास सुरू होता, त्यामुळे यात्रेकरूंना अखंड वैद्यकीय मदत मिळत होती. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, जिथे इतर दवाखाने स्वस्त आणि कमी प्रभावी औषधांचे वितरण करत होते, तिथे निजामच्या फिरत्या दवाखान्याने उत्तम प्रतीच्या आयुर्वेदिक औषधांसह दर्जेदार उपचार दिले.

हिंदू महासभेचे वैद्यरत्न पंडित भवानी दत्ता शर्मा यांनी विशेष प्रशंसा करताना म्हटले, " निजामने या मेळ्यात फिरता दवाखाना पाठवून मोठे कार्य केले आहे. अशा सार्वजनिक सेवा वाढवल्या जाव्यात. आम्हाला आशा आहे की निजाम सरकार अशा दवाखान्यांची संख्या वाढवेल."

आयुर्वेद शास्त्री जगदीश आनंद यांनीही दवाखान्याविषयी गौरवोद्गार काढत म्हटले होते, " निजामचा हा फिरता आयुर्वेदिक दवाखाना पंडित राधाकृष्ण आणि पंडित रंगाचारी यांच्या देखरेखीखाली उत्कृष्ट सार्वजनिक सेवा पुरवत आहे."

याशिवाय, सरकार बहादूर जौहरी, (बार कौन्सिल सचिव आणि आग्रा प्रांतीय हिंदू सभाचे सरचिटणीस) कौतुक करत म्हटले, "मी या मेळ्यात गुरुनानक सेवा समितीच्या अध्यक्ष म्हणून सहभागी झालो आणि वेगवेगळ्या दवाखान्यांना विनामूल्य औषधे पुरवताना पाहिले. मला समजले की इतर दवाखान्यांमध्ये वितरित केलेली औषधे स्वस्त आणि कमी प्रभावी होती. मात्र, हा मोबाईल दवाखाना प्रत्येक रुग्णाला दर्जेदार आणि  पूर्ण उपचार देत होता. त्यासाठी संबंधित मंत्र्यांचे निश्चितच कौतुक केले पाहिजे."

राय गुलाब हे निजाम उच्च न्यायालयातील वकील होते. ते म्हणाले की, ‘‘मला हे पाहून अत्यंत आनंद होतोय की, हुजूर निजाम यांनी यात्रींसाठी वैद्यकीय सेवेसाठी या पवित्र भूमीवर प्रयागच्या कुंभमेळ्यात एक आयुर्वेदिक दवाखाना सुरु केला. अनेक वेळा या दवाखान्याला भेट देण्याचा मला योग आला. दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना रात्रंदिवस लोकांची सेवा करताना मी पाहिले आहे. 

दवाखान्यातील वैद्य रुग्णांची काळजीपूर्वक तपासणी करुन मोठ्या अदबीने त्याच्यावर उपचार करतात. रुग्ण निजांमांना आशिर्वाद देत. त्यांच्या प्रगतीसाठी देवाकडे प्रार्थना करत. हे पाहून मला खूप आनंद होत असे.’’ याशिवाय राय बेनी प्रसाद, वैद्य रतन पंडीत भवानी दत्त शर्मा, मनोहर सिंग इन्स्पेक्टर, श्रीकीशन कौल, स्वामी अभयानंद सरस्वती (पुणे), रामशरण यांच्यासह अनेक महत्वाच्या व्यक्ती व रुग्णांच्या प्रतिक्रिया उपलब्ध आहेत. 

कुंभमेळ्यातील हैदराबादची अन्य व्यवस्था 
कुंभमेळ्यात केवळ वैद्यकीय सुविधा पुरवून हैदराबाद संस्थान थांबले नाही. कुंभमेळ्यातील अन्य सुविधांसाठीदेखील हैदराबाद संस्थानने मोठा खर्च केला होता. त्यांच्याकडूनच पोलीस व्यवस्था, अंतर्गत सुरक्षा, दिवाबत्तीची यांसारखी व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे कुंभमेळ्यात स्वच्छता राखण्यासाठी हैदराबादच्या स्वच्छता विभागाने चांगली भूमिका बजावली होती. पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यासाठी काही योजना हैदराबाद संस्थानने आखल्या होत्या, त्याचा भाविकांना चांगलाच लाभ झाला होता. 
कुंभमेळ्यात गवत आणि बांबूचा वापर करुन तंबू बांधण्यात आले होते. त्यामुळे कुंभमेळ्यात आग लागण्याची शक्यता होती. तशा काही लहानमोठ्या घटनाही घडल्या होत्या. निजाम हैदराबाद यांच्याकडे अग्नीशमन दलाची प्रगत व्यवस्था होती. त्यामुळे कुंभमेळ्यात ही सेवादेखील निजामाकडून पुरवण्यात आली होती.  

हैदराबाद राज्याचे सहिष्णू धोरण
निजाम मीर उस्मान अलींच्या काळात हैदराबाद राज्यातील विविध देवस्थानांच्या यात्रांसाठी विशेष सुविधा पुरवल्या जात होत्या. त्यामध्ये तुळजापूरचे तुळजाभवानी मंदीर, कुंथलगीरीचे जैन देवस्थान, परळीचे मंदिर, नांदेडचे गुरुद्वारा आणि तेलंगणातील काही देवस्थानांचा समावेश आहे. तुळजापूरसाठी देवल कवायद कवानीन (कायदे) निर्धारित करण्यात आले होते. तर कुंथलगीरीच्या जैन मंदिराच्या आसपास दहा मैल परिसराला अहिंसा क्षेत्र घोषित करुन तेथे जनावरांच्या कत्तलींना बंदी घालण्यात आली होती. 
 
सय्यद शाह वाएज 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter