फजल पठाण
बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनानंतर हसीना शेख यांचे सरकार कोसळले. पंतप्रधान पदाचा राजीनामा देत हसीना शेख यांनी देश सोडला. यामुळे नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ मोहम्मद युनूस यांच्या हंगामी सरकार सत्तेत आले. सरकार स्थापन झाले खरे मात्र त्यानंतर तेथील अल्पसंख्यांक समाजाच्या हक्कांवर गदा यायला सुरू झाली. अल्पसंख्यांक विशेषतः हिंदू समाजावर, त्यांच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले होऊ लागले. साहजिकच भारतात याचे तीव्र पडसाद उमटले.
बांगलादेशात हिंदू अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या या अत्याचाराविरोधात भारतात विविध ठिकाणी निदर्शने सुरू झाली जी आजतगायत सुरू आहेत. विशेष म्हणजे अत्याचाराच्या घटनांचा निषेध व्यक्त करण्यात हिंदूंसोबत मुस्लिम समाजदेखील अग्रभागी आहे. देशभरातील विविध मुस्लिम संघटनांनी, विचारवंतांनी आणि इतकेच नव्हे तर मुस्लीम धर्मगुरूंनीही बांगलादेशला अल्पसंख्यांकांचे रक्षण करण्याच्या परखड शब्दात सूचना दिल्या आहेत.
नुकतेच (९ डिसेंबर) महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नागपूर येथे भव्य रॅली काढत बांगलादेशातील अत्याचाराच्या घटनांचा निषेध केला. प्यारे खान हे प्रसिद्ध हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे अध्यक्षदेखील आहेत. त्यामुळे त्यांच्या या कृतीला विशेष महत्त्व आहे. त्यांनी काढलेल्या निषेध रॅलीत मुस्लिम समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. यामध्ये मुस्लिम महिलांचा आणि तरुणांचा समावेश होता. ‘Protect Hindus in Bangladesh’ अशा आशयाचे पोस्टर यावेळी मुलांनी हातात धरले होते.
या निषेध रॅलीच्या आयोजनामागची भूमिका सांगताना प्यारे खान म्हणतात, “भारतीय मुस्लिम हा कोणत्याही प्रकारच्या अन्यायाचे आणि हिंसेचे समर्थन करत नाही. मुस्लिम समाज हिंसेच्या विरोधात आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक पैगंबर मोहम्मद यांनी आपल्याला प्रेमाचा आणि शांततेचा संदेश दिला आहे. इतर धर्मातील लोकांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. यामुळे बांगलादेशातील हिंसेचा निषेध करण्यासाठी हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट आणि मुस्लिम समाजाने रॅली काढली होती. मुस्लिम समाज हा नेहमी हिंदू बांधवांच्या पाठीशी उभा आहे असा संदेश आम्ही या रॅलीतून दिला आहे.”
या रॅलीत सहभागी झालेले डॉ. मोहम्मद फैजल म्हणतात, “कोणत्याही लोकशाही राज्यात अल्पसंख्यांकांचे रक्षण करणे हे सरकारचे काम असते. केवळ लोकसंख्येच्या जोरावर बहुसंख्य समाजाकडून अल्पसंख्यांक समाजाची शिकार केली जात नाही ना, हे पाहणे समाज म्हणून आपली जबाबदारी आहे. बांगलादेशातील हिंदूंवरच्या अत्याचाराचे कोणीही समर्थन करणार नाही. तेथील सरकारने हिंदूंचे रक्षण केले पाहिजे, हीच आमची मागणी आहे.”
मुंबई उच्च न्यायालयाचे वकील फिरदोस मिरझा म्हणतात, “ हिंसेमुळे निर्दोष व्यक्तींना त्रास सहन करावा लागतो. बऱ्याच घटनांमध्ये तर निष्पाप व्यक्तींचा बळीही जातो. तशीच परिस्थिती आज बांगलादेशमध्ये आहे. त्यामुळेच मुस्लिम या नात्याने आम्ही तेथील हिंदू आणि अल्पसंख्यांक समाजासोबत आहोत.”
पुढे ते म्हणतात, “१९९२मध्ये संयुक्त राष्ट्रांनी ‘मानवी हक्कांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. जगातील सर्व देशांच्या सारकारांची अल्पसंख्यांकांप्रती काय जबाबदारी असेल याविषयी त्यामध्ये माहिती देण्यात आली होती. त्यामध्ये अल्पसंख्यांकांचे, त्यांच्या प्रार्थनास्थळांचे रक्षण करण्याची खबरदारी त्या त्या देशांनी घ्यावी असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. बांगलादेशने या मानवी हक्कांचा जाहीरनाम्याचे पालन करावे असे आवाहन आम्ही केले आहे. ”
भारतीय मुस्लिमांचा बांगलादेशाला कडक इशारा
नागपुरच नाही तर भारतातून इतर ठिकाणाहून देखील मुस्लिम समाजाने बांगलादेशला कडक शब्दात इशारा दिला आहे. भारतीय मुस्लिमांच्या सर्वांत महत्त्वाच्या आणि मोठ्या संस्थांपैकी एक असणाऱ्या 'जमियत उलेमा ए हिंद' ने हिंदूंवर होणारे हल्ले त्वरित थांबवले जावेत असा स्पष्ट इशारा बांगलादेशला दिला आहे. बिहारच्या मुस्लिमबहुल किशनगंज जिल्ह्यात 'इजलास-ए-आम'चे म्हणजे संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनासाठी राष्ट्रीय मौलाना महमूद मदनी यांच्यासमवेत इतर धर्मगुरू आणि मुस्लिम बांधव उपस्थित होते. या संदर्भात सविस्तर लेख आवाज मराठीवर प्रकाशित झाला आहे.
तसेच प्रसिद्ध विद्वान आणि अल्पसंख्याक अधिकारांसाठी झटणारे केरळमधील प्रतिष्ठित धर्मगुरू डॉ. मुहम्मद अब्दुल हकीम कांडी यांनी बांगलादेशमधील वाढत्या तणावाविषयी आणि धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेविषयी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमयख मोहम्मद युनूस यांना या संदर्भात पत्र लिहले आहे. या पत्रातून त्यांनी युनूस यांना धार्मिक तणाव संपवण्याचे आणि शांतता प्रस्थापित करणाचे आवाहन केले आहे.
याशिवाय देशातील काही मुस्लिम विचारवंतांनी मोहम्मद युनूस यांना उद्देशून परखड शब्दात पत्र लिहले आहे. बांगलादेशातील घटनेमुळे इस्लामची नकारात्मक प्रतिमा तयार करणारा भ्याडपणा होत असल्याचे विचारवंतांचे म्हणणे आहे. त्यामुळे बांगलादेश सरकारने तातडीने कारवाई करावी व न्याय आणि लोकशाहीच्या तत्वांचे पालन करावे अशी मागणी करण्यात आली. याविषयीचा आवाज मराठीवर प्रकाशित लेख जरुर वाचा.
कोण आहेत प्यारे खान?
नागपूरमधील प्रसिद्ध दर्गा हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे प्यारे खान अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. याच वर्षी त्यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. . ते सामाजिककार्यात नेहमीच आघाडीवर असतात. कोरोना काळात त्यांनी ऑ क्सिजनचा मोठा तुटवडा झाला असताना स्वतःच्या बळावर तो उपलब्ध करून देत अनेकांचे जीव वाचवले होते. होती, त्यामुळे देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता.