वडिलांच्या इच्छेखातर 'आयसीयू'तच झाला लेकींचा निकाह

Story by  Pradnya Shinde | Published by  Pradnya Shinde • 3 Months ago
'आयसीयू'तील निकाहचे दृश्य
'आयसीयू'तील निकाहचे दृश्य

 

प्रज्ञा शिंदे
 
तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या मुलीच्या लग्नाची प्रत्येक आई-वडिलांना ओढ लागलेली असते. लग्न हे केवळ त्या मुलीचेच नव्हे तर  तिच्या आई-वडिलांचेही मोठे स्वप्न असते. साहजिकच पालकांना तिच्या लग्नाची काळजी सतावत असते. त्यामुळे मुलीचे लग्न आपल्या डोळ्यादेखतच व्हावे असा त्यांचा आग्रह असतो. 

लखनऊमधील एका बापाचाही असाच आग्रह होता. मात्र यावेळी परिस्थिती थोडीशी बिकट होती. कारण वडिल अतिदक्षता विभागात म्हणजे आयसीयूत दाखल होते. परिस्थितीचे भान राखत डॉक्टरांनी एक निर्णय घेतला. सध्या सोशल मीडियावर वडील- मुलींच्या नात्यांचा अनोखा क्षण दाखवणारा तो व्हिडिओ व्हायरल होतोय. वडिलांची शेवटी इच्छा पूर्ण करण्यासाठी दोन्ही मुलींचे लग्न रुग्णालयातच पार पडल आहे. नेमकी काय आहे यामागची कहाणी पाहूयात...

सय्यद जुनैद इक्बाल हे लखनऊमधील उन्नावच्या मुसंदी शरीफ दर्गाहचे सज्जादानशीन म्हणजे प्रमुख आहेत. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. इथे गेल्या १५ दिवसांपासून उपचार घेत आहेत. त्यांना श्वास घेण्यास त्रात होत होता. यापूर्वीही प्रकृती खालावल्याने त्यांना चार वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

इक्बाल यांना तन्वीला आणि दरख्शां या दोन मुली आहेत. त्यांच्या लग्नाची तारीख जवळ आली होती. २२ जूनला मुंबईत लग्न आणि रिसेप्शन ठरले होते. मात्र एप्रिल महिन्यात इक्बाल यांची प्रकृती खालावली. १५ दिवसांपूर्वी ते लखनऊच्या इरा मेडिकल कॉलेजच्या आयसीयूमध्ये दाखल झाले. उपचार करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती.  मात्र आयसीयूमध्ये असल्याने मुलींचा  निकाह होणे काही शक्य नाही, हे त्यांना माहित होते. पण आपल्या मुलींचा निकाह आपल्या डोळ्यादेखत व्हावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या इच्छेखातर मुलींनी इरा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालय प्रशासनाकडे त्यांच्या डोळ्यांदेखत निकाह करण्याची परवानगी मागितली. 

इरा मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि मानवतेच्या भावनेतून आयसीयूमध्ये लग्नाला परवानगी दिली. मात्र हे करताना रुग्णालयातील इतर रुग्णांना त्रास होणार नाही आणि आयसीयूचे नियम पाळले जातील याची दक्षता घेण्यात आली. रुग्णालय प्रशासनाने वराला आणि लग्न लावणाऱ्या मौलवींना आयसीयूमध्ये बोलावून घेतले. त्यानंतर वडिलांच्या उपस्थितीत दोन्ही मुलींचे एकेक करून निकाह लावून देण्यात आले. तन्वीला हिचा निकाह १३ तारखेला झाला. तर दारख्शनचा निकाह १४ जून रोजी पार पडला.  

निकाहच्यावेळी आयसीयू प्रोटोकॉलचे काटेकोर पालन
रुग्णावर उपचार करणाऱ्या क्रिटिकल केअर विभागाचे डॉ. मुस्तहसीन मलिक म्हणाले, "आम्ही आयसीयू प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन केले. रुग्णाला कोणत्याही प्रकारच्या संसर्गाचा त्रास होऊ नये, यासाठी काही निवडक लोकांना बोलावण्यात आले. मौलवीपासून सगळ्यांना एप्रन घालायला लावले होते. निकाह सोहळ्यातील काही विधी वेगळ्या केबिनमध्ये तर काही विधी रुग्णासमोर कबुलीजबाबात पार पडले."
 
डॉक्टरांच्या या निर्णयामुळे वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले आणि मुलींनाही त्यांचे आशीर्वाद मिळाले. आता कुटुंबीय इक्बाल यांच्या तंदुरुस्तीसाठी दुआ करत आहे. 

धर्मापलीकडे जाऊन माणुसकीचा बंध जपत, इतर रुग्णांनाही त्रास होणार नाही याची दक्षता घेत, मोजक्या लोकांच्या साक्षीने हा निकाह पार पाडण्यात आला. हा प्रसंग केवळ बाप-लेकीच प्रेमाचाच नव्हे तर सामाजिक सौहार्दाचेही उदाहरण बनून गेला यात शंका नाही.  

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter