'मंदिर-मस्जिद'वाद ही न्यायाची लढाई

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 6 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

संभळ आणि अजमेरच्या निमित्ताने सुरु झालेल्या मंदिर-मशीद दावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदुत्ववादी नेत्यांना कानपिचक्या दिल्या असतानाचा दुसरीकडे रा. स्व. संघाशी निगडित ऑर्गनायझर या नियतकालिकाने मात्र ही नागरी न्यायाची लढाई असून ऐतिहासिक सत्य जाणून घेण्यासाठीचा हा लढा असल्याचे म्हटले आहे. संभळ येथील जामा मशीद येथे हरिहर मंदिर असल्याच्या दाव्यावरून येथे सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले होते. याप्रकरणी भाष्य करताना, या मुद्द्याच्या निमित्ताने विविध समुदायांना आणि व्यक्तींना देण्यात आलेल्या विविध घटनात्मक अधिकारांवरही चर्चा सुरू झाली आहे.

"या मुद्द्यांकडे केवळ फसव्या पुरोगामी दृष्टिकोनातून पाहून त्याला हिंदू-मुस्लिम या मुद्द्यावर मर्यादित न ठेवता समाजातील सर्व घटकांचा समावेश करून घेत खऱ्या इतिहासाच्या आधारावर या विषयावर सर्वसमावेशक आणि विवेकनिष्ठ चर्चा व्हायला हवी आणि यातून नागरी न्याय मिळविण्याच्यादृष्टेने शोध घ्यायला हवा. सोमनाथ ते संभळ आणि त्यापलीकडेही अन्यत्र हा जो लढा आहे तो ऐतिहासिक सत्य जाणून घेण्यासाठी असून धार्मिक वर्चस्ववादासाठी नाही, असा वर्चस्ववाद करणे हे हिंदू मूल्यांच्या विरोधात आहे. त्यामुळे हा लढा वर्चस्वादाचा नसून आपल्या राष्ट्रीय अस्मितेला जागृत करणे आणि नागरी न्याय मिळविणे यासाठी आहे," असे मत ऑर्गनायझरमध्ये व्यक्त करण्यात आले आहे.

संभळ येथील मृत्युकूपाचे नूतनीकरण सुरू
संभळ : उत्तर प्रदेशातील संभळ जिल्ह्यातील कोट पूर्वी येथील प्राचीन मृत्यू कूपाचे प्रशासनाच्या वतीने उत्खनन आणि नूतनीकरण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्राचीन विहिरींचे उत्खनन आणि येथील धार्मिक स्थळांचे नूतनीकरण सुरू असून त्याच अनुषंगाने मृत्यू कूपाचे उत्खनन सुरू आहे. ही विहीर गेले अनेक वर्ष बंद असून येथे राडारोडा टाकण्यात आला होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ही विहीर सुस्थितीत होती तेव्हा येथे भाविक स्नान करत असत. येथे स्नान केल्याने मोक्ष मिळतो अशी स्थानिकांची भावना होती. या विहिरीसह संभळ येथील ऐतिहासिक वास्तूंच्या नूतनीकरणामुळे येथील पर्यटनालादेखील चालना मिळणार असल्याचे मत स्थानिक लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले. ज्या जामा मशिदीच्या सर्वेक्षणावरून हिंसाचार झाला होता त्या मशिदीच्या अगदी जवळ ही विहीर आहे.