‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ हा सर्वच धर्मांचा सार आहे. अनेक सामाजिक संघटना हेच तत्व डोळ्यासमोर ठेवून काम करत असतात. सोलापूरमधील 'तंजीम-ए-हमदर्द-इन्सानियत' ही त्यापैकीच एक. सोलापूरमधील या संघटनेने आजवर अनेक अभिनव उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्यासोबतच तरुणाईचे प्रबोधन करत समतेची ज्योत पेटवण्याचा प्रयत्न संस्था करू पाहत आहे. 'तंजीम-ए-हमदर्द-इन्सानियत' चा अर्थ मानवतेविषयी आपुलकी असणारी संस्था. संस्थेच्या नावातूनच आपल्या त्यांच्या ध्येय आणि उद्दिष्टांची कल्पना येऊ शकते.
वंचित घटकांनामदत करण्याच्या सदहेतूने २०१९ मध्ये 'तंजीम-ए-हमदर्द-इन्सानियत' ची स्थापना करण्यात आली. मौलाना गयास अहमद हे संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तर मुफ्ती अनीसउर रहमान प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहतात. ५० हून अधिक शाखा असणाऱ्या या संघटनेचे मुख्यालय हैद्राबाद येथे आहे.
हाफीज महेबूब नदाफ हे स्थापनेपासून संघटनेशी जोडले गेले आहेत. सध्या ते संस्थेचे सोलापुरचे शहराध्यक्ष म्हणून काम करत आहेत. संस्थेविषयी ते सांगतात,“मी स्वतः गरीबीचा अनुभव घेतला. गरीबीचे चटके काय असतात हे मला चांगलेच माहीत आहे. गरीबी कोणाच्या वाट्याला येऊ नये. पण नशिबी गरिबी आलेल्यांना मदत करावी या विचाराने आम्ही 'तंजीम-ए-हमदर्द-इन्सानियत' ची स्थापना केली.”
'तंजीम-ए-हमदर्द-इन्सानियत' स्थापनेपासूनच सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत. मात्र संघटना सुरु कशी झाली याची कथाही मोठी रंजक आहे. हाफिज नदाफ सांगतात,“केवळ नेकनियती असून चालत नाही. संस्था चालवायला पैसाही लागतो. आमच्याकडे आर्थिक साधने नव्हती, मात्र आमची समाजसेवेची तळमळ मोठी होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांना भंगार, रद्दी, लोखंड, इलेक्ट्रॉनिक वस्तू, प्लॅस्टिक असे सर्व टाकावू वस्तु संस्थेला देण्याचे आवाहन केले. नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. या वस्तूंच्या विक्रीतूननिधी उभा करत संघटनेचे काम सुरू केले. आमच्यासाठी हा काळ संघर्षाचा होता. परंतु परमेश्वराने दरवाजे उघडले आणि आज शेकडो लोकांच्या पाठिंब्यामुळे हा समाजसेवेचा रथ ओढला जात आहे. आता संघटनेतर्फे दहाहून अधिक मानवसेवी उपक्रम उभे राहिले आहेत.”
'तंजीम-ए-हमदर्द-इन्सानियत' मार्फत दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. गरजूंना मदत करणे आणि धार्मिक सलोखा जपणे हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. याविषयी नदाफ सांगतात, “ संघटनेची स्थापना झाली तेव्हा कोविडची महामारी सुरू होती. कोरोनाच्या भीतीमुळे घरचे एकमेकांना मदत करत नव्हते. तेव्हा आमच्या संघटनेचे कार्यकर्ते पुढे आले. आम्ही सर्वांनी मिळून शेकडो नागरिकांना दोनवेळचे जेवणाचे आणि धान्य किटचे वाटप केले."
राज्यातील हजारो पूरग्रस्तांना धान्यकिटचे वाटप
२०२२ मध्ये चिपळूण, कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये पावसाने थैमान घातले होते. त्यानंतर या परिसरात भयंकर पूरस्थिती निर्माण झाली होती. हजारो नागरिक पुरात अडकले होते. अन्नपाण्याविना त्यांचे प्रचंड हाल होत होते. त्यावेळी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले. या आवाहनाला नागरिकांनी विशेषतः मुस्लिम समाजाने मोठा प्रतिसाद दिला. या उभ्या राहिलेल्या मदतीतून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त भागात सहा हजारांहून अधिक धान्यकिटचे वाटप केले होते.
ते पुढे सांगतात,“थंडीमध्ये मंदिरे व मशीदीच्या बाहेर अनेक निराधार लोक उघड्यावर झोपतात. अशा निराधार लोकांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी आम्ही सातत्याने ब्लॅंकेटचे वाटपची मोहीम राबवतो. समाजात आजही अशी अनेक कुटुंब आहेत ज्यांच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे शिक्षणाचा आणि मुलींच्या लग्नाचा. अशा कुटुंबतील मुलांच्या शिक्षणासाठी आणि गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नाला हातभार लावण्यासाठी आमची संघटना मदत करते.”
हाफिज नदाफ संघटनेच्या इतर उपक्रमांविषयी बोलताना म्हणतात,“झोपडपट्टीतील नागरिकांसाठी आम्ही मोफत आरोग्य शिबिरे व हिजाम थेरपी कॅम्प लावतो. सोबतच वेळोवेळी रक्तदान शिबिरांचे आयोजन आम्ही करतो. अलीकडच्या काळात नैसर्गिक आपत्तीच्या घटना वाढत आहेत. अशा प्रसंगी लोकांचे जनजीवन विस्कळीत होते. अनेक जण बेघरही होतात. अशा हजारो लोकांना आम्ही धान्यकिट आणि इतर गरजचेच्या वस्तू मोफत पुरवतो. अनेक गरजू कुटुंबांना आम्ही दर महिना २० हजार रुपयापर्यंत बिनव्याजी मदत करतो. नवे शैक्षणिक वर्ष आले की आम्ही न चुकता विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटपही करतो.”
‘शिवी मुक्त कट्टा’ उपक्रमामुळे संस्थेचे झाले कौतुक
काही महिन्यांपूर्वी सोलापूर शहरात 'तंजीम-ए-हमदर्द-इन्सानियत' संघटनेकडून ‘शिवी मुक्त कट्टा’ ही मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेची परिसरात विशेष चर्चा होती. या मोहिमेविषयीते सांगतात, ”आपल्याकडे भांडणात किंवा बरेचदा मजामस्करीत आई-बहिणीवरून शिवी देण्याचा प्रघात आहे. तो इतका रुळला आहे, की बरेचदा कुणाला त्यात काहीच आक्षेपार्ह वाटत नाही. स्त्रीच्या कष्टांची पुरुषांना क्वचितच जाणीव होते. त्यामुळे तिचा अपमान होईल अशा शिव्या देणं बंद व्हायला हवं, म्हणून या मोहिमेद्वारे आम्ही तरुणांमध्ये जनजागृती केली आणि त्यांना शिवी न देण्याचे आवाहन केले. या मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद तर लाभला. सर्वांनी या उपक्रमाचे आणि संघटनेचे कौतुक केले. आमच्यासाठी हा क्षण अविस्मरणीय होता. या प्रतिसादामुळे आम्हाला आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली”
'तंजीम-ए-हमदर्द-इन्सानियत' संघटनेचे आगामी उपक्रम
संघटनेच्या आगामी उपक्रमांविषयी विचारले असता हाफीज नदाफ सांगतात, “आज समाजात धार्मिक तेढ वाढत आहे. समाजातील प्रेम, सलोखा कमी होत आहे. एकमेकांविषयी अविश्वास आणि भीती तयार होत आहे. येणाऱ्या काळात आम्ही सोलापूर शहरात एक अशी मस्जिद उभारण्याचा संकल्प केला आहे जी सर्वधर्मियांसाठी सामाजिक उपक्रमांचे केंद्र असेल. मेडिकल कॅम्प लागतील. युवकांसाठी करियर गायडन्स आणि इतर कार्यक्रम घेतले जातील. या उपक्रमांचा फायदा प्रत्येक जाती-धर्माचे लोक घेतील. धार्मिक सलोखा आणि सामाजिक ऐक्य टिकवण्याचे काम या मस्जिदमार्फत करण्याचा आमचा मानस असणार आहे.”
‘ऑनलाइन जुवा हटाओ, देश का युवा बचाओ’
सध्या युवकांकडून सोशल मिडियाचा अतिरिक्त वापर होताना दिसतो. यामुळे तरुण वर्ग ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात अडकला आहे. म्हणून संघटनेच्या वतीने ‘ऑनलाइन जुवा हटाओ, देश का युवा बचाओ’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाविषयी नदाफ म्हणतात, “इंटरनेटमुळे आणि सोशल मिडियाच्या वाढत्या वापरामुळे देशातील तरुण व्यसनाच्या अधीन होत आहे. देशाचे भविष्य असणारी युवा पिढी ऑनलाइन गेमिंगमुळे भरकटली जात आहे. ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यातून तरुणांना बाहेर काढण्यासाठी पुढील महिन्यात संघटनेच्या माध्यमातून ‘ऑनलाइन जुवा हटाओ, देश का युवा बचाओ’ हा अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे.”
'इमदाद आपकी, खिदमत हमारी, फायदा तुम्हारा' (मदत तुमची, सेवा आमची, फायदा गरिबांचा) हे संघटनेचे ब्रीदवाक्य आहे आणि त्याला अनुसरूनच संस्था गरिबांची सेवाभावी वृत्तीने खिदमत करत आहे. 'तंजीम-ए-हमदर्द-इन्सानियत'च्या मानवतावादी भूमिकेला आणि त्यांच्या आगामी उपक्रमांना 'आवाज मराठी'च्या शुभेच्छा!