समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाची स्तुती केली होती. त्यावरून विधानसभेत मोठा गदारोळ झाला. यानंतर त्यांना अर्थसंकल्पी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले. त्यांना विधानभवनाच्या आवारात येण्यासदेखील बंदी घालण्यात आली आहे.
आझमी यांनी विधानभवनात पत्रकारांशी बोलताना ‘औरंगजेब किती चांगला शासक होता’ असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावरून सत्ताधारी पक्षाचे सदस्य आक्रमक झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सत्ताधारी आमदारांनी आझमींविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांचे सदस्यत्व निलंबित करावे, अशी मागणी केली. त्यानंतर मंगळवारी विधिमंडळात सत्ताधारी सदस्यांनी गोंधळ घालून कामकाज थांबवले.
सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभेत जोरदार घोषणाबाजी करत आझमींच्या निलंबनाची मागणी केली. यावर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रस्ताव मांडला की, आझमींचे सदस्यत्व अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करावे आणि त्यांना विधानभवनाच्या आवारात प्रवेशबंदी घालावी. भाजपचे ज्येष्ठ सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी आझमींचे निलंबन केवळ अधिवेशन संपेपर्यंत न करता कायमचे करावे, अशी मागणी केली.
आझमींचे निलंबन करण्याचा ठराव चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत मांडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मतविभाजन करून त्याला मंजुरी दिली. यामुळे काही वेळा सभागृहात कामकाज ठप्प झाले. या गोंधळामुळे कार्यवाही थांबली.
विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आझमींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, "औरंगजेबाचे समर्थन कोणीही करू शकत नाही. तो एक नालायक शासक होता. मुस्लिम समाजातही आजकाल कोणी आपल्या मुलांची नावे औरंगजेब ठेवत नाही."
आझमींची स्पष्टीकरणे
अबू आझमी यांनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, "माझ्या विधानाची मोड-तोड करून ते दाखण्यात आलं. औरंगजेब यांच्याबद्दल मी तेच वक्तव्य केलं जे इतिहासकारांनी आपल्यासमोर मांडलं आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा अन्य कुठल्याही महापुरुषाबद्दल कोणत्याही प्रकारचं अपमानजनक वक्तव्य केलं नाही. तरीदेखील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो. माझ्या वक्तव्याला राजकीय वळण दिलं जात आहे. माझ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं अधिवेशन तहकूब होणं महाराष्ट्राच्या जनतेसाठी चांगली गोष्ट नाही. त्यामुळे जनतेचं नुकसान होतंय.”
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter