राज्य अल्पसंख्यांक आयोगांच्या राष्ट्रीय परिषदेत बोलताना केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू.
अल्पसंख्यांक समाज राष्ट्रनिर्माणामध्ये महत्वाची भूमिका बजावत राहील असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी केले. ते राज्य अल्पसंख्यांक आयोगांच्या राष्ट्रीय परिषदेत बोलत होते. ही परिषद राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने आयोजित केली होती.
या परिषदेविषयी म्हणाले, “नवी दिल्लीतील आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने आयोजित केलेल्या राज्य अल्पसंख्याक आयोगांच्या परिषदेत सहभागी झालो. सर्वसमावेशक विकास आणि सर्वांसाठी समान संधी या वचनबद्धतेला बळकटी देण्यासाठी हे एक महत्वाचे व्यासपीठ आहे.”
या परिषदेत बोलताना त्यांनी म्हटले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अल्पसंख्यांक समुदायाने मोठे योगदान द्यावे. भारतामध्ये अल्पसंख्यांक सुरक्षित आहेत. परंतु काही लोक या गोष्टीचा अप्रचार करत आहेत.”
भारतातील मुस्लिम लोकसंख्या आणि त्यांचे देशासाठीच्या योगदानाविषयी बोलताना केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, "अल्पसंख्यांक समुदायांनी आधीही राष्ट्रनिर्माणामध्ये मोठे योगदान दिले आहे आणि पुढेही देतील. त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. सध्या सऊदी अरेबियामध्ये हज परिषदेमध्ये सुमारे ८० देशांचे मंत्री उपस्थित होते. यावेळी इंडोनेशियाच्या एका मंत्र्याने सांगितले की त्यांच्या देशामध्ये सर्वात मोठी मुस्लिम लोकसंख्या आहे. मी त्यांना सांगितले की, पुढील जनगणना होईल, तेव्हा कदाचित भारतातील मुस्लिम लोकसंख्या इंडोनेशियापेक्षा अधिक असेल.”
सध्या भारताकडे जनगणने संदर्भातील कोणतीही ठोस आकडेवारी नाही. २०२१ च्या जनगणनेला कोविड महामारीमुळे विलंब झाला होता.
भारतात होते अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण- किरेन रिजिजू
या परिषदेत बोलताना ते म्हणाले, "भारत हा संविधानावर चालणारा देश आहे. येथे सर्व धर्म, जाती आणि पंथांच्या लोकांना समान अधिकार आहेत. भारत केवळ अल्पसंख्यांकांचे संरक्षण करत नाही, तर त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये सहभागी करून घेतो. सबका साथ, सबका विकास या तत्वावर चालत आहे. आपण सर्व भारतीय आहोत. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करणे गरजेचे आहे."
यावेळी त्यांनी रमजानच्या महिन्यात इफ्तार पार्टीला हजेरी लावल्यानंतर धार्मिक ऐक्याचा संदेश दिल्याचेही सांगितले.
पुढे ते म्हणाले, “मुस्लिम, सिख, बौद्ध, जैन आणि ख्रिश्चन यांसारख्या विविध धार्मिक समुदायांसाठी आम्ही एक ठोस योजना तयार केली आहे. ज्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याची गरज आहे, तेथे सरकार आपली भूमिका बजावेल. भारत सरकारच्या योजना सर्वांसाठी आहेत. कोणत्याही जाती-धर्माचा भेदभाव केला जात नाही. प्रत्येक भारतीय नागरिकासाठी समान सुविधा आहेत. भारत हा एक मोठा देश आहे आणि याठिकाणी अल्पसंख्यांक समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आपली जबाबदारीही मोठी आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र राहून जगाला चुकीचा संदेश जाऊ न देण्याची काळजी घेतली पाहिजे.”
किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केले की, भारत हा सर्वधर्म समभाव आणि एकात्मतेचा देश आहे. येथे सर्वांना समान हक्क मिळतात आणि सरकार प्रत्येक समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. भविष्यातही सर्वसमावेशक विकास आणि शांततेसाठी सरकार कटिबद्ध राहील.
-फजल पठाण
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter