सौरभ चंदनशिवे
सण आणि उत्सव म्हटले की डीजे चा दणदनाट आणि ध्वनी प्रदूषण जणू काही एक समीकरणच बनले आहे. थरांमुळे आणि त्यावर वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांमुळे उलट धार्मिक उत्सवांना आणि सणांना गालबोट तर लागतेच, मात्र या आवाजाचा त्रास लहान मुलांना आणि वृद्धांना मोठ्या प्रमाणात होतो. यावेळी डेसिबलची मर्यादा सर्रासपणे ओलांडली जाते. या आवाजामुळे गेल्या काही वर्षात अनेकांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे तर अनेकांना कायमचे बहिरेपण आले आहे.
हीच बाब लक्षात घेऊन जुन्या नाशिक मधील मुस्लिम समुदायाने एक अनुकरणीय निर्णय घेतला आहे. येथील शाही मशीद मध्ये नुकतीच मुस्लिम समुदायातील महत्त्वाच्या व्यक्तींची बैठक झाली. त्यात मुस्लिम धर्मगुरू ही उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत ईद-ए-मिलादून नबीच्या जुलूस निमित्त एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. शहर-ए-खतीब हिसामुद्दीन खतीब यांनी याविषयीची माहिती दिली.
ते म्हणाले, “ईद- ए- मिलादनिमित्त शहरात सोमवारी जुलूस काढण्यात येणार आहे. दुपारी २ वाजता चौक मंडई येथून जुलूसला प्रारंभ होणार आहे. कुठल्या दिवशी जुलूस काढायचा यावर एकमत नव्हते.शाही मशिदीत जुलूस कमिटी, विविध मशिदीचे मौलवी, राजकीय, सामाजिक, धार्मिक संस्थेचे पदाधिकारी तसेच मुस्लिम बांधवां उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत १६ सप्टेंबरला जुलूस काढण्यावर एकमत झाले.”
या बैठकीत घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल बोलताना खतीब म्हणाले, “सण- उत्सव म्हटले की डीजे आणि बीभत्सपणा पाहायला मिळतो. त्यामुळे प्रेषित मुहम्मद यांच्या जयंतीनिमित्त निघणाऱ्या जुलूसचे पावित्र्य टिकून राहावे म्हणून आम्ही सर्वांनी एकमताने ‘डीजेमुक्त जुलूस’चा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या जुलूसमुळे ध्वनी प्रदूषण होणार नाही आणि सर्वसामान्यांना त्याचा त्रासही होणार नाही.”
शहर-ए-खतीब हिसामुद्दीन खतीब शेवटी म्हणाले, “जुलूसमध्ये सामील होणाऱ्या भाविकांना आम्ही काही सूचनाही केल्या आहेत. जेणेकरून इतरांना त्याचा त्रास होणार नाही. मोठ्याने घोषणाबाजी, मोठे झेंडे टाळण्याचे आवाहनही आम्ही केले आहे. पाण्याचा अतिवापर टाळणे आणि गरजूंना मदत करणे याविषयी जुलूसमधून जनजागृतीही केली जाणार आहे.”
यंदाही पारंपारिक मार्गावरूनच जुलूस काढण्यात येणार आहे. मात्र दरवर्षी जुलूसमध्ये रिक्षा, चारचाकीसह अन्य वाहनांचा समावेश केला जातो. यंदा त्यात कुठल्याही प्रकारच्या वाहनांचा समावेश करण्यात येणार नाही. मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने पायी जुलूसमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे यंदा जुलूसमध्ये घोडे, उंट यांसारख्या जनावरांनाही बंदी असल्याचेही बैठकीत ठरवण्यात आले आहे.
बैठकीला शहर-ए-नायब काजी एजाज काजी, वसीम पीरजादा, शोएब मेमन, गुलजार कोकणी, निजाम कोकणी, हनीफ बशीर, आसिफ जानोरी, बबलू पठाण, अजीज पठाण, एजाज रजा, अस्लम खान यांच्यासह विविध मशीदचे मौलवी आणि मुस्लिम बांधव उपस्थित होते.
नाशिकमधील मुस्लीम बांधवांच्या डीजेमुक्त मिलादून नबी साजरी करण्याच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यानिमित्ताने मुस्लीम समाजाने दाखवलेल्या सामाजिक प्रगल्भतेचे अनुकरण इतर भागातील मुस्लिमांसोबतच इतर धर्मियांनीही करावे, अशी भावना सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत.
- सौरभ चंदनशिवे