‘सबका साथ, सबका विकास’ या उद्देशाने अल्पसंख्याक समुदायातील २५ धार्मिक नेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांचीही भेट घेतली.
शिष्टमंडळात ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख इमाम अहमद इलियासी आणि विविध अल्पसंख्याक समुदायांचे प्रतिनिधीत्व करणारे नेते आदींचा समावेश होता. बैठकीपूर्वी इलियासी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते की, ही भेट म्हणजे 'पैगाम-ए-मोहब्बत है, पैगाम देश है'. तसेच 'आज मी पंतप्रधानांना भेटणार आहे', या शब्दांत त्यांनी आनंद व्यक्त केला.
या बैठकीनंतर सर्व धर्मगुरूंनी भारतीय समाज व्यवस्थेचे कौतुक केले. 'येथे विविध समाजातील विविध लोक बंधुभावाने एकत्र राहतात. एकता आणि शांतता हे देशाच्या सर्वोच्च ठिकाणी आहे. देशातील प्रत्येक धर्माच्या परंपरा वेगळ्या आहेत, पण माणुसकी हा एका धागा आपल्याला एकसंध ठेवते. येथे आपण सर्व एक आहोत. आपल्याला देशाला पुढे घेऊन जायचे आहे,' असा संदेशही त्यांनी या भेटीनंतर दिला.
सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत ‘विश्वगुरू’ होण्याच्या मार्गावर वाटचाल करत असल्याचेही त्यांनी सांगितले. नवीन संसद भवनात अल्पसंख्याक समुदायांच्या नेत्यांची उपस्थिती बदलत्या भारताचा एक उत्कृष्ट नमुना आहे. राष्ट्र हे सर्व वैयक्तिक विचारांपेक्षा वर आहे,' अशी भूमिकाही त्यांनी मांडली.
“आज संसदेत धार्मिक नेत्यांच्या शिष्टमंडळाला भेटून आनंद झाला. आपल्या देशाच्या विकासाच्या वाटचालीबद्दल त्यांनी व्यक्त केलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे आभार मानतो.” या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.