दाऊदी बोहरा समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सैफी बुरहानी एक्स्पो २०२५ चा सोमवारी शानदार समारोप झाला. पुण्यातील डेक्कन कॉलेज ग्राउंडवर शनिवारी सुरू झालेल्या या तीन दिवसीय एक्स्पोला प्रचंड प्रतिसाद मिळाला. एक्स्पोला रविवार आणि सोमवारी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. विविध व्यवसायिकांचे स्टॉल्स आणि प्रदर्शने पाहण्यासाठी पुणेकरांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
सैफी बुरहानी एक्स्पोमध्ये विविध क्षेत्रांतील उद्योग आणि व्यावसायिक एकाच छताखाली एकत्र आले होते. स्टार्टअप्स, महिला उद्योजक, लहानमोठे विक्रेते, रिअल इस्टेट डेव्हलपर्स, शैक्षणिक संस्था, आरोग्यसेवा, वेलनेस व्यावसायिक आणि इतर उद्योगांच्या सुमारे १७० स्टॉल्सने या प्रदर्शनीत सहभाग घेतला होता.
या तीन दिवसीय एक्स्पोमध्ये दाऊदी बोहरा समाजाचे राजकुमार हुसेन बुरहानुद्दीन, किर्लोस्कर न्यूमॅटिक्सचे अध्यक्ष राहुल किर्लोस्कर, आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, भाजप व्यापारी आघाडीचे प्रमुख उमेश शहा यांच्यासह अनेक जणांनी उपस्थिती दर्शवली.
सैफी बुरहानी एक्स्पोचे आयोजन व्यापारिक कनेक्टिव्हिटी, ब्रँडिंग आणि नेटवर्किंगसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरले. या प्रदर्शनामुळे व्यवसायिकांना नवीन संधी मिळाल्या आणि विविध उद्योगांमध्ये संबंध अधिक मजबूत झाले. याठिकाणी फर्निचर, हार्डवेअर, गृहसजावटीच्या सामग्रीसह इतर विविध वस्तूंची खरेदी करताना पुणेकर दिसले.
समारोप प्रसंगी विविध उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. या प्रदर्शनीने पंढरपूरपासून ते परदेशी उद्योगांपर्यंत व्यवसायिकांना कनेक्टिव्हिटी मिळवून दिली आहे. तसेच पुण्यात एक विशेष प्रकारचे व्यावसायिक समुदाय निर्माण करण्यात यश मिळवले आहे.