भक्ती चाळक
समाजकार्याविषयी आत्मीयता, समाजाप्रति असलेली निष्ठा काहींना कोणत्याही परिस्थितीत स्वस्थ बसू देत नाही. आपल्या कार्याचा लाभ गरजूंना घेता यावा, अशी त्यामागची भावना असते. ही भावना जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत ती व्यक्ती अस्वस्थ असते. हाफिज शेख हे देखील त्यापैकीच एक!
आपण समाजाचे देणे लागतो या उद्देशाने हाफिज यांनी समाजकार्याची सुरुवात केली. त्यानंतर काही वर्षातच त्यांनी ‘निसार’ नावाने संस्था स्थापन करून हे कार्य अधिक मोठ्याप्रमाणात सुरु केले. २०१६ पासून पुण्यातील कोंढव्यामध्ये निसार फाउंडेशनच्या माध्यमातून समाजसेवेसाठी ते झटत आहेत. पेशाने व्यावसायिक असले, तरी समाजसेवेसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. फाउंडेशसाठी निधी जमा करण्याबरोबरच निराधार महिलांचे जीवन उभे करण्यापासून अनेकांना त्यांनी आधार दिला आहे.
समाजातील सर्वसामान्य वर्गातील रुग्णांसाठी शासनाच्या विविध योजना असल्यातरी त्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची गरज असते. मात्र निराधार रुग्णांकडे हे कागदपत्रही त्वरित उपलब्ध नसल्याने शासकीय रुग्णालयांना उपचारच नाही तर इतर सोयी देणेही अवघड जाते. मग अशावेळी समाजकार्य करणाऱ्या संस्थांमार्फत मिळालेली वैद्यकीय मदतच त्या रुग्णांसाठी जीवनदायी ठरते. कोंढव्यातील निसार फाउंडेशन निराधार रुग्णांसाठी धाऊन आल्याने अनेकांना मुबलक दरात उपचार मिळाले आहेत. त्यासोबतच फाउंडेशनने वैद्यकीय उपचारांसाठी लागणारे बेड, पाण्याच्या गाद्या, वॉकर, व्हील चेअर अशा प्रकारच्या वस्तू वापरण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत.
गोळ्या औषधांवरील अतिप्रमाणात होणारा खर्च लक्षात घेऊन हाफिज यांनी कोंढव्यात भाग्योदय नगर आणि नवाझीश चौकात निसार नावाने दोन दवाखाने उभे केले आहेत. त्याठिकाणी ते केवळ ३० रुपयांत रुग्णांना उपचार देतात. त्यामध्ये वैद्यकीय तपासणी आणि दोन दिवसांची औषधे देखील दिली जातात. या दोन्ही दवाखान्यात दररोजची शेकडो पेशंटची वर्दळ असते. या दोन्ही दवाखान्यांमध्ये चार डॉक्टर्सची टीम सेवा देत आहे. तिथे उपचार देणारे सर्वच डॉक्टर्स हे पदवीधारक असून, त्याठिकाणी ते चांगल्या पगारावर नोकरी करत आहेत. डॉक्टरांशिवाय तिथे अजून ८ कर्मचारी कार्यरत आहे. या दोन्ही दवाखान्यांचे कार्य सुरळीत चालावे यासाठी हाफिज स्वतः जातीने लक्ष घालतात.
हाफिज यांना त्यांच्या समाजकार्याविषयी विचारल्यावर ते सांगतात, “या कार्यातून मला मोठे समाधान मिळते. संस्थेचे कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. अनेक निःस्वार्थी आणि ध्येयवादी कार्यकर्ते या संस्थेत काम करतात. गरिबी आणि उपचारादरम्यान रुग्णांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन मी हे काम करण्याचे ठरवले. रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची जी जी संधी मिळते, ती पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. हे कार्य करताना आमच्याकडे सगळ्या प्रकारचे रुग्ण येतात. मग त्यात आम्ही कुणाची जात-धर्म किंवा गरीब-श्रीमंती पाहत नाही. इथे प्रत्येक वर्गातील रुग्ण चांगल्या दर्जाचे उपचार घेऊन जातात.”
हाफिज यांना समाजकार्याच्या उद्देशाविषयी विचारले असता ते म्हणतात, “खिदमत से खुदा मिलता है… मला समाजकार्याची प्रेरणा आमच्या धर्माकडून मिळते. समाजात समतोल राखायचा असेल तर गरजूंना मदत करणे आवश्यक आहे. धर्म-जात न पाहता समाजातील घटकांची मदत केली तर अल्लाह आपल्याला बरकती देतो. वैद्यकीय भाषेत उदाहरण द्यायचं झाल तर, रुपया-पैशांचे समाजामध्ये शरीरातील रक्तासारखे महत्त्व आहे. शरीराच्या कोणत्याही भागाला रक्ताचा पुरवठा कमी पडला तर प्रकृती बिघडते. त्याचप्रमाणे समाजाच्या एका भागावर गरिबी कोसळली तर पूर्ण समाजात अनैतिक गोष्टी घडतात. म्हणून इस्लाम धर्माने जकातद्वारे विषमतेविरुद्ध मार्ग काढला आहे आणि तोच वसा आम्ही पुढे घेऊन चाललो आहोत.”
महिलांसाठी शिक्षण क्षेत्रात योगदान…
रुग्णसेवेसोबतच हाफिज यांनी महिलांसाठी शिक्षण क्षेत्रातही काम सुरु केले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी तसेच त्यांना स्वयंरोजगाराकरिता प्रेरित करण्यासाठी देखील निसार फाउंडेशन काम करीत आहे. महिलांना सहजरीत्या नोकरी मिळावी यासाठी त्यांनी वोकेशनल ट्रेनिंग सेंटर सुरु केले. हे कोर्स महिला दहावीनंतरही करू शकतात. या कोर्सचा कालावधी सहा महिने ते एक वर्षापर्यंतचा असतो. या कोर्सनंतर महिलांना पदवी प्रदान केली जाते. या कोर्सेसची फी केवळ ५००-७०० रुपयांपर्यंत आहे तर काही प्रशिक्षण अगदी मोफतही दिले जातात. मग त्यात नर्सिंग, पॅरामेडिकल कोर्सेस, स्पोकन इंग्लिश, टेलरिंग, मेहंदी, ब्युटी पार्लर, मेकअप प्रशिक्षण, फॅशन डिझायनिंग अशा प्रकारच्या अनेक कोर्सेसचा समावेश आहे. यासोबतच पैशांअभावी तासिकांची फी न परवडणाऱ्या शालेय मुलांसाठी त्यांनी मोफत तासिका सुरु केल्या आहेत.
याविषयी बोलताना हाफिज म्हणतात, “एक स्त्री सक्षम झाली तर संपूर्ण घराला सक्षम करते. समाजातील प्रत्येक महिलेची प्रगती झाली, तर संपूर्ण समाजाचीही आपोआप प्रगत होईल. आम्ही संस्थेमार्फत स्त्रियांचं प्रबोधन करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कार्यरत आहोत. आर्थिकदृष्ट्या गरीब आणि निराधार महिलांना मोफत पदवी प्रशिक्षण देतो.”
पेशाने व्यावसायिक असले तरी रुग्णसेवेच्या माध्यमातून हाफिज हे समाजाची सेवा करत आहेत. पडद्याआड राहून गोरगरीब रुग्णांच्या सेवेचे त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. पुण्यासारख्या शहरात अनेक रुग्णांना वैद्यकीय खर्च पेलवणे अवघड जाते. त्यांच्या या अडचणी लक्षात घेऊन हाफिज शेख यांनी सुरु केलेले हे कार्य असेच अविरत सुरु राहावे यासाठी आवाज द व्हॉईस तर्फे त्यांना शुभेच्छा !
- भक्ती चाळक