'दावत-ए-इफ्तार'ला उपस्थित डावीकडून पोलीस उपनिरीक्षक तहसील बेग, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि इतर मान्यवर
आवाज द व्हॉईस मराठी, पुणे
देशभरात रमजानचा उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. रमजानचा महिना मुस्लीम समाजासाठी विशेष महत्त्वाचा असतो. उपवास आणि विशेष नमाज या महिन्याचे वैशिष्ट्य. मुस्लीम समाज दिवसभर निर्जळी उपवास पकडत असल्यामुळे संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी ठिकठिकाणी विशेष आयोजन करण्यात येते. त्याला इफ्तार असे म्हणतात.
महाराष्ट्रातला रमजान वैशिट्यपूर्ण असतो.विविध धर्मियांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या 'इफ्तार पार्टी'ही इथल्या रमजानची विशेष ओळख. रमजाननिमित्त विविध सामाजिक संस्था-संघटना यांच्याकडून विशेषत इफ्तारचे आयोजन करण्यात येते. विशेष म्हणजे या आयोजनात विविध राजकीय पक्षांसोबतच महाराष्ट्र पोलीसही पुढाकार घेतात. मुस्लीम समाजाशी असलेले संबंध अधिक दृढ करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी पोलीस विभागाकडून इफ्तारचे आयोजन करण्यात येते.
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यामध्येही नुकतेच असे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील सर्वांत मोठा आणि प्रसिद्ध मुस्लीमबहुल भाग असणारा कोंढव्यातील कौसरबाग परिसर तेथील खाद्यसंस्कृतीसाठी विशेष लोकप्रिय आहे. एरवीसुद्धा शहरभरातील लोक कौसरबाग परिसरात विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. कौसरबाग परिसरात पुणे शहरातील सर्वात मोठी मस्जिदही आकर्षणाचे केंद्र ठरते.
मात्र हा परिसर बरेचदा नकारात्मक कारणांसाठीही चर्चेत राहिला आहे. त्यामुळे येथील पोलीस विभागाकडून या परिसरात विशेष खबरदारी आणि काळजी घेतली जाते. येथील जनतेशी पोलिसांचे खूप चांगले संबंध आहेत. पोलीस आणि मुस्लिम जनता यांच्यातील दुरावा कमी व्हावा, विश्वास वाढावा यासाठी वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे रमजान निमित्त विशेष इफ्तारचे आयोजन.
नुकतेच पुणे पोलिसांच्या झोन चार विभागाकडून कौसरबाग मस्जिदच्या परिसरात भव्य इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पुण्यातील आणि महाराष्ट्रातील सर्वात भव्य इफ्तार कार्यक्रमांपैकी एक ठरला. या कार्यक्रमाला परिसरातील मुस्लिम समुदायातील 800 ते 1000 नागरिक उपस्थित होते. पुणे पोलीस आणि मरकजी बैतुल माल यांच्या संयुक्त विद्यमाने कोंढव्यातील कौसरबाग परिसरात या 'दावत-ए-इफ्तार'चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासमवेत पोलिस सह-आयुक्त राजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त (पूर्व) मनोज पाटील, आणि इतर प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. डीसीपी झोन फाईव राजकुमार शिंदे हे या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक होते.

कौसरबाग मस्जिदच्या आवारात संध्याकाळी पाच वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी संपूर्ण मैदान मुस्लिम मान्यवरांनी भरून गेले होते. स्टेजवर पुणे पोलीस दलातील प्रमुख पोलीस अधिकारी उपस्थित होते. याशिवाय परिसरातील मुस्लिम मान्यवरांना, आजी-माजी नगरसेवकांनाही स्टेजवर विशेष स्थान देण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नव्यानेच पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या तहसील बेग या मुस्लिम तरुणीने केले. मुस्लीम समाजाला विशेषत: तरुण-तरुणींना तिच्या यशातून प्रेरणा मिळावी असा सदहेतू यामागे होता.
यावेळी बोलताना पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मुस्लिमांचे आभार मानले. पोलीस आणि परिसरातील मुस्लिम यांनी एकत्र येऊन काम करणे का गरजेचे आहे याचे महत्त्व त्यांनी यावेळी उपस्थित पटवून दिले.ड्रग्स आणि गुंडगिरी यांसारख्या या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मुस्लीम समाज आणि पोलीस प्रशासनाने एकत्र येऊन मोहीम आखायला हवी, ही गरज त्यांनी यावेळी बोलून दाखवली. परिसरातून बेकायदेशीर गोष्टी हद्दपार करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य कसे अपेक्षित आहे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
रमजानकाळात कौसरबाग परिसरातील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सला भेट देण्यासाठी केवळ शहरभरातूनच नव्हे तर राज्य आणि देशभरातून लोक येतात. त्यामुळे या काळात येथे प्रचंड गर्दी आणि वर्दळ असते. रमजान काळात परिसरातील व्यवसायिक आणि नागरिकांना पोलिसांकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी यावेळी दिले. इफ्तारची वेळ झाल्याची घोषणा होताच पोलीस आयुक्तांनी दोन लहान मुलींना खजूराचा घास भरवत त्यांच्या समवेत इफ्तार केला. स्टेजवरील अधिकाऱ्यांनीहि यावेळी उपस्थित मुस्लीम समुदायासोबत इफ्तार केला.
पुणे पोलिस दलात नुकतीच उपनिरीक्षक पदी रुजू झालेल्या तेहसीन बेग या तरुणीचा पोलीस आयुक्तांकडून यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.मुस्लिम समाजापुढे समाजातील तरुणीचा आदर्श ठेवण्यासाठी हा सत्कार करण्याची पुणे पोलिसांची भूमिका विशेष कौतुकास्पद होती. या सत्काराविषयी बोलताना तहसीन म्हणते, "पोलीस आयुक्तांनी माझ्या समाजासमोर केलेल्या सत्काराने मी भारावून गेले आहे. मला फारच आनंद झालाय. आता माझ्यावरची जबाबदारी ही वाढली आहे."
या सत्कारामागची भूमिका स्पष्ट करताना तेहसीन सांगते, "मेहनतीच्या जोरावर माझ्यासारखी सामान्य मुस्लिम कुटुंबातून आलेली व्यक्तीही मोठे यश मिळवू शकते हा सकारात्मक संदेश समाजात जावा आणि समाजातील इतर मुलींनी तो आदर्श घ्यावा, हा या सत्कारामागचा विशेष उद्देश होता. या सत्कारासाठी मी माझ्या अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानते." मुस्लिम तरुणांनी अधिकाधिक संख्येने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा, अधिकारी बनून समाजाची आणि देशाची सेवा करावी अशी इच्छा तहसीन 'आवाज'शी बोलताना व्यक्त केली.
मरकजी बैतुल माल सामाजिक संस्था, कौसरबाग मज्जिद ट्रस्टचे ट्रस्टी आणि परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सलीम शेख यांनी या आयोजनामाची भूमिका मांडली. ते म्हणाले, "कोंढवा परिसर हा पुण्यातील सर्वांत मोठा मुस्लिम बहुलभाग म्हणून ओळखला जातो. लोकसंख्येच्या मानाने इथे पायाभूत सुविधा कमी आहेत. त्यामुळे बरेचदा वाहतुकीपासून इतर अनेक समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी पोलिसांची मदत लागते. दुसरीकडे पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मुस्लिम समाजाकडून सहकार्य अपेक्षित असते. रमजानच्या काळात तर परिसराला भेट देणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढते. अशावेळी समाज किंवा पोलीस एकट्याने गोष्टी सुरळीत करू शकत नाही. त्यामुळे समाजाला पोलिसांची आणि पोलिसांना समाजाची गरज भासते. त्यासाठी दोघांनी एकत्र येणं गरजेचं आणि महत्त्वाचे आहे. त्या भूमिकेतूनच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते."
या कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट करताना सलीम शेख म्हणाले, "मुस्लिम समाजात पोलिसांविषयी भीतीचे आणि बरेचदा अविश्वासाचे वातावरण विनाकारण तयार झालेले असते. दोघांमधील विसंवादाची दरी दूर व्हावी यासाठी पोलीस दलाकडून नेहमीच विशेष प्रयत्न करण्यात येतात. मुस्लिम सामाजिक संघटनाही या प्रयत्नांना सहकार्य करतात. अशाच प्रयत्नांचा भाग म्हणून आजच्या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तुम्ही पाहात असाल या कार्यक्रमाला परिसरातील शेकडो नागरिक स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहिले होते. पोलिसांनी आणि मुस्लिम समाजाने असेच एकमेकांचे सहकार्य करत समाजाची प्रगतीसाठी आणि परिसराच्या आणि अंतिमतः देशाच्या सुरक्षितता आणि उज्वल भविष्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे."
कौसरबाग येथे आयोजित या अनोख्या इफ्तार आयोजनाने केवळ महाराष्ट्रासमोरच नव्हे तर देशासमोर परस्पर सहकार्य आणि सामंजस्य यांचे उत्तम उदाहरण ठेवले आहे. या उपक्रमापासून प्रेरणा घेऊन येत्या काळात महाराष्ट्रभरात या प्रकारचे आणखी उपक्रम राबवले जाणार आहेत. त्यातून पोलीस दल आणि मुस्लीम समाज यांच्यात सहकार्याचे आणि विश्वासाचे नाते आणखी दृढ होईल हे मात्र नक्की!