हिंदू बहिणीवर कोसळला दुःखाचा डोंगर, मदतीसाठी धावून आले मुस्लीम-ख्रिस्ती भाऊ
Story by आवाज़ मराठी | Published by Bhakti Chalak • 2 d ago
जयश्री किंकळे यांच्यासोबत हिंदू रितीरिवाजाने विधी पार पाडताना जावेद खान
पुण्यातील एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एकीकडे राज्यातले धार्मिक वातावरण कलुषित झाले असताना, दुसरीकडे एक दिलासा देणारी घटना पाहायला मिळाली. या घटनेने द्वेषाचे बीज पेरणाऱ्या मंडळींना चांगलीच चपराक दिली आहे. पुण्यातील एका ब्राह्मण व्यक्तीवर एका मुस्लिम व्यक्तीच्या सहकार्याने विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार करणाऱ्या व्यक्तीचे नाव जावेद खान आहे. याबाबतचा व्हिडीओ यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
पुणे शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या रास्ता पेठेत, वृद्ध बहिण-भावाची जोडी एकमेकांचा आधार बनून राहत होती. जवळचे कोणी नसल्याने हे दोघेच एकमेकांचे सर्वस्व होते. पण अचानक भावाला देवाज्ञा झाली आणि बहीण एकटी पडली. ओळखीचे कुणीच नसल्याने भावावर अंत्यसंस्कार करायचे कसे, हा प्रश्न बहिणीला भेडसावत होता. अशा कठीण प्रसंगात पुण्यातील जावेद खान आणि मायकल साठे या दोन मित्रांनी पुढाकार घेतला. रमजान आणि ख्रिस्ती लेंटच्या पवित्र काळात एका हिंदू व्यक्तीचा धार्मिक रीतीरिवाजानुसार अंत्यसंस्कार दोघांनीही माणुसकीचा एक अनोखा वस्तुपाठच घालून दिला. त्यांनी हे धार्मिक कर्तव्य मानत अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला .
नेमकं काय घडलं
उम्मत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जावेद खान यांना त्यांचे मित्र मायकल साठे यांचा २७ मार्चला फोन आला. मायकल यांनी सांगितले की, त्यांच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणारे सत्तरवर्षीय सुधीर किंकळे यांचे राहत्या घरी निधन झाले आहे. सुधीर यांना फक्त बहीण जयश्री किंकळे ही एकमेव नातेवाईक आहे. त्यांना इतर कोणीही आधार नव्हता. मायकल यांनी जावेद यांना घटनेबाबत कळवले. त्यांनंतर जावेद खान यांना हातातील सर्व कामे सोडून थेट या बहिणीच्या मदतीसाठी धाव घेतली.
जावेद तातडीने पुण्याच्या ससून रुग्णालयातील डेड हाऊसमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी जयश्री किंकळे आणि पोलीस हवालदार होळकर यांची भेट घेतली. पंचनामा सुरू होता आणि संध्याकाळची वेळ झाली होती. चौकशी केल्यानंतर असे समजले की मृतदेह मिळण्यास रात्र होणार होती. जावेद यांनी जयश्री यांना अंत्यविधीविषयी विचारले. परंतु जयश्री यांनी एक अडचण बोलून दाखवली. त्या म्हणाल्या, “आम्ही ब्राह्मण आहोत. सूर्यास्त झाल्यावर अंत्यविधी करत नाही. आपल्याला अंत्यसंस्कार सकाळीच करावे लागतील.”
दुसऱ्या दिवशी म्हणजेच २८ मार्चला रमजानमधील सर्वात महत्त्वाची रात्र, लैलतुल कद्र असल्याने जावेद खान यांच्यासमोर मोठे धर्मसंकट उभे राहिले. ही रात्र मुस्लिमांसाठी अत्यंत पवित्र मानली जाते. या रात्री नमाज, कुरआन पठण आणि प्रार्थना यांना विशेष महत्त्व आहे. जावेद यांनी सांगितले, “रमजान महिना चालू आहे. त्यात सत्ताविसावी उपवासाची रात्र विशेष असते. त्यामुळे ती रात्र इबादतीत, प्रार्थनेत व्यतीत करण्याचा माझा मानस होता. पण मी मनात विचार केला की हे कार्य करण्यासाठी अल्लाहने कदाचित मला निवडले असेल.” तर दुसरीकडे, ख्रिस्ती समाजातील मायकल साठे यांच्यासाठीही लेंटचा पवित्र काळ सुरू होता. या काळात ख्रिस्ती बांधव उपवास करतात. सोबतच या काळात प्रार्थना आणि सत्कार्यांना विशेष महत्त्व असते.
रमजान आणि लेंटच्या पवित्र काळात स्वतःच्या धार्मिक कर्तव्यांचे पालन करत माणुसकीच्या नात्याने एका हिंदू बांधवाचा विधीवत अंत्यसंस्कार केला. एवढेच नाही तर जयश्री यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत असताना, जावेद आणि मायकल यांनी त्यांना भावनिक आधार दिला. या घटनेने जयश्री किंकळे यांना केवळ भावनिक आधारच दिला नाही, तर त्यांच्या एकटेपणाच्या कठीण प्रसंगात त्यांना खंबीर साथ देखील मिळाली.
जावेद यांनी या घटनेचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला. जावेद यांनी या प्रसंगानंतर भावना व्यक्त केली आहे. त्यात ते म्हणतात, "आम्ही सगळेच त्या सुधीर काकाचे नातेवाईक झालो आणि त्यांचे अंत्यसंस्कार केले.पवित्र रमजान महिन्यात केलेले पवित्र कार्य."
प्रसिद्ध पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी या घटनेचे वर्णन करताना लिहिले, "रमजान आणि गुढीपाडव्याची लगबग सुरू असताना जावेद खान यांनी दाखविलेली माणुसकी पाहून 'हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे' या वाक्याचा प्रत्यय आला."
लेखक आणि पत्रकार कामिल पारखे यांनी या प्रसंगाविषयी लिहिले, "जावेद खान आणि मायकल साठे यांना त्यांच्या या सत्कार्यासाठी निश्चितच दुआ मिळेल. May their tribe increase!!"
रमजान आणि लेंटचा पवित्र काळ
या घटनेचे महत्व सांगायचे झाले तर, ही घटना रमजान आणि लेंटच्या पवित्र काळात घडली. मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मियांचा वर्षातील पवित्र मानला जाणारा उपवासकाळ सध्या सुरू आहे. ख्रिस्ती समाजाचे कॅलेंडर ग्रेगरियन म्हणजे सौरवर्षीय आहे, तर मुस्लिम समाजाचे कॅलेंडर चांद्रवर्षीय असते. त्यामुळे ख्रिस्तीजनांचा लेंट सिझन किंवा उपवासकाळ नेहमीच फेब्रुवारी अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला सुरू होतो आणि सुमारे चाळीस दिवसानंतर एप्रिलमध्ये गुड फ्रायडे या सणाने संपतो. तर मुस्लिमांचा रमजान महिना ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये वर्षभर कधीही असू शकतो. या काळात मानवसेवेला देखील मोठे महत्व असते. जावेद खान आणि मायकल साठे यांनी या पवित्र काळात एका हिंदू बंधूचा अंत्यसंस्कार करून मानवसेवा हीच ईश्वरसेवा हि उक्ती सार्थ ठरवली.
जयश्री किंकळे यांनी मानले आभार
अंत्यसंस्करचा विधी पार पडल्यानंतर जयश्री किंकळे यांनी जावेद आणि मायकल यांचे आभार मानले. त्या भावुक होत म्हणाल्या की, “जावेद खान आणि मायकल साठे हे इतर धर्माचे असून सुद्धा माझ्या हिंदू भावावर त्यांनी विधिवत अंत्यसंस्कार केले. आज समाजात हिंदू-मुस्लिमांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आणि द्वेष पासरवणाऱ्या लोकांना मी सांगू इच्छिते की, आपण सगळे एकाच ईश्वराची देन आहोत. माझे या जगात कुणी नसताना हेच मुस्लिम-ख्रिस्ती भाऊ माझ्या मदतीला धावून आले. हिंदू- मुस्लिम असा भेद नसतो हे या घटनेने सिद्ध झाले.”
पुणे हे शहर नेहमीच सांस्कृतिक आणि धार्मिक एकतेसाठी ओळखले जाते. याठिकाणी हिंदू, मुस्लिम आणि ख्रिस्ती समुदाय अनेकदा एकत्र येऊन सौहार्दाचा संदेश देतात. जावेद खान आणि मायकल साठे यांचे हे कार्य या परंपरेला आणखी बळकटी देणारे आहे. त्यांच्या या कार्याने पुणे शहरातील सौहार्दाची परंपरा आणखी समृद्ध झाली आहे. जावेद आणि मायकल यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले की, खरी भक्ती ही माणुसकीच्या सेवेत आहे आणि धर्माच्या सीमा ओलांडून माणसाने माणसाशी माणसासम वागणे हेच खरे धर्माचे कार्य आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -