बोपोडीतील मस्जिदमध्ये सर्वधर्मीयांनी अनुभवला धार्मिक एकोप्याचा क्षण

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 15 h ago
बोपोडी येथील जमात-उल-मुस्लिमीन ट्रस्टच्या मशिदीत आयोजित कार्यक्रमप्रसंगी सर्वधर्मीय नागरिक
बोपोडी येथील जमात-उल-मुस्लिमीन ट्रस्टच्या मशिदीत आयोजित कार्यक्रमप्रसंगी सर्वधर्मीय नागरिक

 

ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद हा सण मुस्लिमांसाठी आनंदाचा आणि एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करण्याचा पवित्र प्रसंग. यानिमित्ताने पुण्यातील बोपोडी येथील जमात-उल-मुस्लिमीन ट्रस्टने अनोखा उपक्रम राबवला. सर्वधर्मीय बांधवांसाठी मस्जिदीची दारे खुली करून धार्मिक एकोप्याचा संदेश समाजाला दिला. मस्जिदींबद्दल समाजात पसरलेल्या गैरसमजुतींना छेद देण्यासाठी आणि सर्व धर्मियांमध्ये बंधुभाव वाढावा यासाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. 

यंदा पहिल्यांदाच राबवल्या गेलेल्या या उपक्रमाला नागरिकांनी विशेष हजेरी लावली. यावेळी सर्वपक्षीय राजकीय नेते, पोलिस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी मस्जिदीत भेट दिली. विशेष म्हणजे यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी सर्वच उपस्थितांना मस्जिदीतील धार्मिक प्रक्रिया जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. तसेच त्यांना मस्जिदीतील प्रत्येक विभाग दाखवण्यात. मौलाना मुफ्ती वाजिद यांनी उपस्थितांना नमाजाची प्रक्रिया, त्यामागील महत्त्व, सूफी परंपरा याविषयी समजावून सांगितले. 
 

पारंपरिक पदार्थांची मेजवानी 
या कार्यक्रमाप्रसंगी मस्जिदीत आलेल्या पाहुण्यांचे स्वागत पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. खजूर, शिरकुर्मा आणि इतर गोड पदार्थांच्या मेजवानीचा आनंद त्यांना लुटता आला. अशा लहान परंतु अर्थपूर्ण गोष्टींमुळे सर्वधर्मीय बांधवांमध्ये एक आपुलकीची भावना निर्माण झाली. उपस्थितांना मस्जिदीतील शांत आणि भक्तिमय वातावरण अनुभवण्याची संधी मिळाली.

सामाजिक कार्यकर्ते अनवर शेख यांनी उपक्रमाच्या संकल्पनेविषयी सांगितले की, “दरवर्षी आमचे इतरधर्मीय बांधव आम्हाला ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी मस्जिदीबाहेर येतात. संपूर्ण महाराष्ट्रभर मस्जिदिंबाहेर ही दृश्य पाहायला मिळते. परंतु त्यांनी बाहेर थांबून आम्हाला शुभेच्छा देणे हे अयोग्य वाटते. त्यामुळे यंदा ईदनिमित्त बोपोडी मस्जिद ट्रस्टने एक अनोखा उपक्रम राबवण्याचे ठरवले. आजच्या या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या वातावरणात सर्वधर्मांमध्ये बंधुभाव टिकून राहावा हा उपक्रमामागचा महत्वाचा उद्देश होता. तसेच या माध्यमातून इतर बांधवांना मस्जिद परिचय देखील करून द्यायचा होता.”

उपक्रमाच्या महत्वाविषयी बोलताना ते पुढे म्हणाले, “जमात-उल-मुस्लिमीन ट्रस्टचा हा उपक्रम केवळ ईद साजरी करण्यापुरता मर्यादित नव्हता. यामागे समाजात एकता टिकून ठेवण्याचा एक मोठा उद्देश होता. आजच्या काळात जिथे धार्मिक तणाव आणि गैरसमज वाढत आहेत, तिथे असे उपक्रम समाजाला एकत्र आणण्याचे काम करतात. मस्जिदीची दारे सर्वांसाठी खुली करून आम्हाला हे दाखवून द्यायचे की, धर्म हा माणसांना तोडणारा नाही तर, जोडणारा दुवा आहे.” 

ते पुढे म्हणतात की, “समाजात मस्जिदीबद्दल अनेक चुकीच्या समजुती पसरलेल्या आहेत. मशिदींमध्ये शस्त्रसाठा ठेवला जातो किंवा राष्ट्रविरोधी कारवाया होतात असा काही लोकांचा असा गैरसमज आहे. परंतु या उपक्रमाने हे गैरसमज मोडीत काढले. मस्जिदीत आलेल्या पाहुण्यांनी मस्जिदचा कानाकोपरा जाणून घेतला. याठिकाणी केवळ प्रार्थना आणि शांततेचे वातावरण आहे, याची त्यांनी अनुभूती घेतली. हा उपक्रम केवळ संस्कृतीची आदानप्रदान करण्यासाठीच नाही तर समाजात धार्मिक सलोखा वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल देखील ठरले.”

मुस्लिमांविषयीचे गैरसमज दूर 
मस्जिद, मदरसा म्हटले की अनेकांच्या मनात शंका किंवा गैरसमज असतात. या गैरसमजांना समाजात रुजवण्याचे काम काही समाज कंटक करत असतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे फतवा शब्दाबाबत असलेल्या गैरसमज. त्यामुळे याविषयी अनेकांना प्रश्न पडणे सहाजिकच. लोकांच्या मनातील ही गैरसमज दूर करण्याचे काम या उपक्रमाच्या माध्यमातून झाले. 
 

याविषयी बोलताना अनवर शेख म्हणाले, “काही विक्षिप्त लोकांनी मुस्लिमांच्या धार्मिक स्थळांबद्दल समाजात अनेक अफवा पसरवल्या आहेत. इथे दहशतवादी तयार होतात किंवा मस्जिदींच्या टेरेसवर दगडे ठेवलेली असतात… खरं तर ही सगळं हस्यास्पद आहे. सर्वसामान्यांच्या मनात याविषयी कोणतीच शंका राहू नये म्हणून हा उपक्रम खरोखर गरजेचा होता. यावेळी आम्ही हिंदू बांधवांना संपूर्ण मस्जिद फिरवली आणि इस्लामच्या धार्मिक संस्कृतीची ओळख देखील करून दिली. ”
 
ते पुढे म्हणतात, “समाजात ‘काफिर’ या शब्दाभोवती अनेक समजगैरसमज आहेत. या शब्दाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाते. इथे उपस्थित एका हिंदू भावाने याविषयी प्रश्न उपस्थित केला. तेव्हा आम्ही या शब्दाचा नेमका अर्थ सांगितला. हा एक अरबी शब्द आहे. काफिर म्हणजे सत्य लपवणारा व्यक्ति. परंतु या शब्दाचा प्रयोग नकारात्मकदृष्ट्या केला जातोय. उपस्थितांचे असे गैरसमज दूर करण्यात आम्हाला यश मिळाले, याचा आनंद आहे. ” 

 

या प्रसंगी अनेक मान्यवरांनी मस्जिदीत हजेरी लावून या उपक्रमात सहभागी होत इस्लामी धार्मिक स्थळ आणि त्यात होणारे धार्मिक विधी यांविषयी जाणून घेतले. त्यामध्ये आनंद छाजेड, श्रीकांत पाटील, राजेंद्र भुतडा, विनोद रणपिसे, अॅड. नंदलाल धिवार, अनिल भिसे, मयूरेश गायकवाड, संकेत कांबळे, अशोक गायकवाड, संगीता धिवार, अॅड. विठ्ठल अरुडे, जय चव्हाण, सुंदर ओहळ, ज्योती परदेशी यांसारख्या व्यक्तींची उपस्थिती या कार्यक्रमाला विशेष महत्त्व देऊन गेली. या उपक्रमामुळे समाजातील सर्वच स्तरातील लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न अधिक यशस्वी झाला.

पुण्यातील बोपोडी येथील जमात-उल-मुस्लिमीन ट्रस्टने राबवलेला हा अनोखा उपक्रम समाजात धार्मिक सलोखा आणि बंधुभाव टिकवण्यासाठी प्रेरणादायी ठरला. ईदनिमित्त मस्जिद परिचयाचा हा कार्यक्रम आयोजित करून आयोजकांनी प्रभावीपणे धार्मिक एकोप्याचा संदेश दिला. या उपक्रमाने मस्जिदींबद्दल समाजात पसरलेले गैरसमज दूर करण्यात मोठी भूमिका बजावली. नमाज, सूफी परंपरा आणि इस्लामच्या धार्मिक संस्कृतीची ओळख सर्वांना करून देताना उपस्थितांच्या मनातील शंकांचेही निरसनही झाले. 

आजच्या धार्मिक तणावाच्या काळात असा उपक्रम समाजाला एकत्र आणण्याचे आणि परस्पर विश्वास वाढवण्याचे काम करतो. बोपोडी मस्जिदीतील हा प्रयत्न म्हणजे सर्वधर्मीय सलोख्याचे एक उत्तम उदाहरण आहे. समाजात धार्मिक सौहार्द वाढावा आणि गैरसमज दूर व्हावेत, यासाठी असे उपक्रम भविष्यातही राबवले जावेत. या उपक्रमासाठी बाबासाहेब सौदागर, मुनाफ हारून शेख, डॉ. निसार, सलीम बेपारी, फारूक पीरजादे आणि इतर मुस्लिम नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

- भक्ती चाळक
([email protected])

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter