कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान मोदी आज पहिल्यांदाच काश्मीरमध्ये

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pooja Nayak • 11 Months ago
पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी

 

देशात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. २०१९मध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदी आज पहिल्यांदाच काश्मीर दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा काश्मीरसाठी खास असणार आहे. दौऱ्यात पंतप्रधान अनेक विकास प्रकल्पांचे अनावरण करणार आहेत. तसंच सार्वजनिक सभेला देखील संबोधित करणार आहेत. 
 
श्रीनगरमध्ये आज मोदींची सभा आहे. पीएम मोदींच्या या रॅलीसाठी श्रीनगरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी रस्त्याने ७ किलोमीटरचा प्रवास करून श्रीनगरच्या बक्षी स्टेडियममध्ये जाणार आहेत.
 
पंतप्रधान मोदींचा काश्मीर दौरा
बक्षी स्टेडियमवर जाहीर सभेला संबोधित करताना, पंतप्रधान मोदी ६४०० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे अनावरण करणार आहेत. पंतप्रधानांच्या आगमनापूर्वी श्रीनगरमध्ये सुमारे १० हजार तिरंगी आणि भाजपचे झेंडे लावण्यात आले आहेत. श्रीनगरमध्ये छोटे रस्ते सील करण्यात आले आहेत. स्टेडियमबाहेर २४ तास अगोदर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे.

रॅली संस्मरणीय करण्यासाठी जम्मू-काश्मीर प्रशासनासोबतच भाजपकडूनही प्रयत्न सुरू आहेत. सर्वजण तयारीत व्यस्त आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी आणि भाजप देशाला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत की, काश्मीर पूर्णपणे बदलले आहे. अशा स्थिती पंतप्रधान मोदी काश्मीरसाठीही मोठी घोषणा करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा
श्रीनगरमध्ये पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेपूर्वी काश्मीरमधील लोकांना धमकीचे फोन येत आहेत. यामध्ये स्थानिक लोकांना पंतप्रधानांच्या जाहीर सभेला उपस्थित न राहण्याची धमकी देण्यात आली आहे. टीव्ही९ ने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI काश्मीरमधील मोबाईल आणि लँडलाईनवर पंतप्रधानांच्या रॅलीवर बहिष्कार घालण्यासाठी धमकीचे कॉल करत आहे. काश्मीरमधील लोकांना वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय फोन नंबरवरून कॉल येत आहेत.

याबाबत सुरक्षा दल आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. जम्मू-काश्मीरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या श्रीनगरमधील मुक्कामादरम्यान सर्व मार्गांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, तर त्यांच्या दौऱ्यादरम्यान लोकांची ये-जा टाळण्यासाठी अनेक ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. पाळत ठेवण्यासाठी ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर केला जात आहे, तर घटनास्थळाच्या सभोवतालच्या दोन किलोमीटरच्या परिसरात सुरक्षा दलांकडून पायी गस्त वाढवण्यात आली आहे. झेलम नदी आणि दल सरोवरात मरीन कमांडो तैनात करण्यात आले आहेत.