हज यात्रेवरून आलेल्या मुस्लिम बांधवांचा सत्कार करताना बाळासाहेब मोरे.
बार्शी तालुक्यातील पांगरी गावात हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा अनेक वर्षांपासून जपली जात आहे. नुकतेच पांगरी गावात मोरे मेजर सिक्युरिटी सर्व्हिसेसच्या वतीने हज यात्रेवरून परतलेल्या मुस्लिम बांधवांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात गावातील हिंदू आणि मुस्लिम लोकांनी एकत्र सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी गावातील सामाजिक सलोख्याचे दर्शन महाराष्ट्राला घडवले.
हज यात्रेवरून परतलेल्या मुस्लिम बांधवांचा सत्कार
हज यात्रा इस्लाममधील अत्यंत महत्वाची धार्मिक आणि पवित्र यात्रा आहे. ही यात्रा प्रत्येक मुस्लिम बांधवांनी करणे आवश्यक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पांगरी गावात धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण कायम राहिले आहे. हजयात्रेवरून आलेल्या भाविकांचा सत्कार करण्याची या गावाची परंपरा बनली आहे. या परंपरेला पुढे नेत बाळासाहेब मोरे यांनी हज यात्रेवर आलेल्या मुस्लिम बांधवांचा सत्कार केला.
या सत्कार कार्यक्रमाची सुरवात मलिक साहेब दर्ग्यावर चादर चढवून आणि नमाज पठणाने झाली. गावातील रहिवासी सिकंदर वली यांच्या हस्ते ही चादर चढवण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून पांगरी गावात विविध धर्मांचे लोक एकत्र राहत आहेत.
एकमेकांच्या सणांमध्ये आपुलकीने सहभागी होतात. येथे लोक आपसातील धार्मिक भेदभाव विसरून एकमेकांच्या सुख-दुःखात सामील होतात. विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये एकत्र येत गावाचे ऐक्य अबाधित ठेवत आहेत.
या कार्यक्रमाला हिंदू आणि मुस्लिम समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये नीलकंठ शेळके, वली सिकंदर शाह कादरी महाराज, शकील बागवान, नाजीम सौदागर, रौफ शेख, अखलाक पठाण, सत्तार बागवान, शकूर इनामदार, जैनुद्दीन शेख, बाबूभाई काझी आदींसह अनेक हिंदू- मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पांगरी गावाने या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक सकारात्मक संदेश दिला आहे. 'सर्वधर्मसमभाव' ही आपली संस्कृती कायम ठेवत या गावाने एकता आणि सामूहिकतेचे उदाहरण दिले आहे. गावातील या ऐक्यामुळे इतर ठिकाणी देखील धर्मनिरपेक्षता आणि सलोख्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
अशा कार्यक्रमामुळे आपली सामाजिक आणि धार्मिक ऐक्याची संस्कृती जपली आहे. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे समाजातील विविधता सकारात्मक दृष्टीने बघता येते. अलीकडच्या काळात असे कार्यक्रम होणे काळजी गरज असून सर्वांनी या प्रकारच्या कार्यक्रमांसाठी पुढाकार घ्यायला हवा.एकमेकांच्या श्रद्धांचा आदर राखून आणि एकमेकांच्या परंपरांचा सन्मान करून समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवता येतो हे या कार्यक्रमाने दाखवून दिले आहे.