पहलगाम हल्ल्यातील पीडितांसाठी भारतीय मुस्लिम उभारणार निधी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
आयएएस प्रशिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञ समीर अहमद सिद्दीकी
आयएएस प्रशिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञ समीर अहमद सिद्दीकी

 

पहलगाममधील भयंकर दहशतवादी हल्ल्याने देशाला हादरून सोडले आहे. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप लोकांच्या विधवा, मुले आणि इतर कुटुंबीयांना मदत करण्यासाठी एक नवा आणि ऐतिहासिक प्रस्ताव समोर आला आहे. हा प्रस्ताव प्रसिद्ध आयएएस प्रशिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञ समीर अहमद सिद्दीकी यांनी मांडला आहे. सामाजिक विचारवंत म्हणून ते प्रसिद्ध आहेत.

समीर अहमद सिद्दीकी यांनी मांडलेला प्रस्ताव प्रत्यक्षात अंमलात आला तर कश्मीर, भारतीय मुस्लिम आणि दहशतवादविरोधी कारवायांच्या प्रयत्नांना मोठे यश येईल.  

जगातील सर्वात मोठ्या दहशतवादविरोधी निधीची संकल्पना 
समीर अहमद सिद्दीकी यांनी प्रस्तावात म्हटले आहे की, "भारतातील मुस्लिमांनी एकत्र येऊन जगातील सर्वात मोठी 'दहशतवादविरोधी निधी' मोहीम सुरू करावी. भारतात सुमारे २० कोटी मुस्लिम आहेत. त्यापैकी फक्त २० लाख मुस्लिमांनी प्रत्येकी १०० रुपये दिले, तर प्रचंड निधी जमू शकेल. या निधीचा वापर पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबांना सात पिढ्यांपर्यंत आर्थिक मदत देण्यासाठी होऊ शकेल."

हा प्रस्ताव केवळ संस्था उभारण्यापुरता मर्यादित नाही. तर दहशतवादाच्या हिंसाचाराने बळी पडलेल्या कुटुंबांचे भविष्य सुरक्षित करणे हा त्याचा उद्देश आहे.

समीर यांनी या प्रस्तावाची तुलना कोलकात्याच्या वली रहमानी यांच्या उपक्रमाशी केली. वली यांनी छोट्या-छोट्या आर्थिक योगदानातून १२  कोटी रुपये जमवले. त्यातून त्यांनी आधुनिक शाळा उभारली. त्या शाळेत गरीब आणि बेसहारा मुलांना उच्च स्तरीय शिक्षणाची सुविधा मिळते.

समीर अहमद सिद्दीकी म्हणाले की, "जम्मू-काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या ऐतिहासिक उपक्रमाची सुरुवात करावी. काश्मीर बराच काळ दहशतवाद आणि नकारात्मक प्रतिमांशी जोडला गेलेला आहे. आता काश्मीरला सकारात्मक आणि ऐतिहासिक कामगिरीशी जोडण्याची वेळ आली आहे."

ते पुढे म्हणाले, "जिथे निष्पापांना धर्म विचारून मारले गेले, कलम्याचा अपमान करण्याचा प्रयत्न झाला, तिथल्या जनतेने आवाहन करून जगातील सर्वात मोठा दहशतवादविरोधी निधी उभारायला हवा. यामुळे काश्मीरचा चेहरा बदलेल. मानवतेच्या बाजूने एक ठाम संदेशही जाईल."

सोशल मीडियावर पाठिंब्याचा सुर 
समीर अहमद सिद्दीकी यांनी हा प्रस्ताव पाच दिवसांपूर्वी त्यांच्या यूट्यूब चॅनल ‘टीम समीर सिद्दीकी’वर मांडला होता. तेव्हापासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. लोकांनी समीर यांच्या विचारांचे कौतुक केले. अनेकांनी याला ‘डोळे उघडणारी मोहीम’ देखील म्हटले आहे.

कोण आहेत समीर अहमद सिद्दीकी?
समीर अहमद सिद्दीकी हे केवळ प्रसिद्ध आयएएस प्रशिक्षकच नाहीत, तर यशस्वी व्यवसाय विश्लेषकही आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि सेवा उद्योगात त्यांचा दीर्घ अनुभव आहे. संचालन व्यवस्थापन, संवाद, नेतृत्व आणि डेटा विश्लेषणात ते निपुण आहेत.

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे पदवीधर असलेले समीर सध्या नवी दिल्लीतील एम पुरी आयएएस संस्थानात सामान्य अध्ययनाचे प्रमुख आहेत. हे संस्थान देशातील अग्रगण्य नागरी सेवा प्रशिक्षण केंद्रांपैकी एक आहे. येथून आयएएस, आयपीएस आणि गट-अ सेवांमध्ये सर्वाधिक यशस्वी उमेदवार निवडले गेले आहेत.

समीर यांच्या 'अंतर्गत सुरक्षा आणि द्विपक्षीय संबंध' या विषयावरील पुस्तके स्पर्धा परिक्षांच्या विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि रोबोटिक्सच्या युगात नव्या पिढीला तयार करण्यासाठी शिक्षणात बदलाची गरज असल्याचे ते सांगतात. पारंपरिक आणि आधुनिक विज्ञानाचे सिद्धांत एकत्र आणण्यासाठी ते ओळखले जातात.

त्यांची व्याख्याने आणि विश्लेषणे यूट्यूब आणि इतर मंचांवर लाखो लोकांनी पाहिली आणि शेअर केली आहेत. समीर अहमद सिद्दीकी यांचा हा प्रस्ताव फक्त आर्थिक मदत योजना नाही. तर दहशतवादाला सकारात्मक आणि शक्तिशाली प्रत्युत्तर देण्याचा हा प्रयत्न आहे.

भारतातील मुस्लिमांनी एकत्र येऊन ही योजना स्वीकारली आणि काश्मीरच्या जनतेने पुढाकार घेतला, तर केवळ पीडित कुटुंबांना आधार मिळेल असे नाही. तर जगाला एक नवा संदेशही मिळेल. मानवतेची एकता दहशतवादाच्या द्वेषापेक्षा कितीतरी बलवान आहे, हे या योजनेतून जगाला दाखवता येईल.

आता जम्मू-कश्मीर सरकार आणि समाजातील इतर घटक या ऐतिहासिक उपक्रमाला प्रत्यक्षात आणण्यासाठी काय पावले उचलतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.