ईदच्या दिवशी अख्खं मुस्लीमबहुल गाव धावलं मदतीला

Story by  Bhakti Chalak | Published by  Pradnya Shinde • 3 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भक्ती चाळक
 
सोमवार १७ जून रोजी सकाळी पश्चिम बंगालमध्ये कांचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीने धडक दिली. न्यू जलपाईगुडी याठिकाणी हा अपघात झाला. या धडकेत कांचनजंगा एक्स्प्रेसच्या दोन डबे रुळावरून घसरले. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाल्याची माहिती मिळाली. या घटनेदरम्यान एका प्रसंगातून 'मानवसेवा हीच ईश्वरसेवा' असल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

सोमवारी देशभरात ईद अल-अज़हा अर्थात बकरी ईद सणाची तयारी सुरु होती. यानिमित्ताने पश्चिम बंगालमधील मुस्लीम बहुल निर्मल जोत गावात सणामुळे अतिशय उत्साह आणि आनंदाचे वातावरण होते. अशातच काहीतरी मोठा आवाज झाल्याने हातातील काम सोडून गावकरी आवाजाच्या दिशेने धावून गेले. त्याठिकाणी पोहोचताच काळीज पिळवटून टाकणारे दृश्य त्यांना पाहायला मिळाले, कंचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीची धडक लागल्याने मोठा अपघात घडला होता.
 
ही धडकी इतकी जोरदार होती की यावेळी कंचनजंगा एक्सप्रेसचे दोन डबे थेट रुळावरून खाली घसरले होते. अपघात झाला म्हणून प्रवाशी ओरडत होते, जखमी रक्तबंबाळ अवस्थेत मदतीसाठी हाक मारत होते. हे दृश्य पाहून गावकरी सण विसरले, पोलीस आणि मदत पथकाची वाट न पाहता प्रवाशांच्या मदतीसाठी धावले, लोकांना वाचवू लागले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. 

निर्मल जोत गावातील रहिवासी असलेले मोहम्मद मोमिरुल यांनी घटनेचा थरारक अनुभव सांगितला. ते म्हणाले, "मी नमाज अदा करून नुकताच परत आलो होतो, घरी सगळे आनंदाचे वातावरण होते, तेव्हा अचानक मोठा आवाज ऐकू आला. मी माझ्या घराजवळील रेल्वे रुळाच्या दिशेने धावत गेलो आणि रेल्वेचे डबे रुळावरून घसरलेले दिसले. मला मालगाडीचा लोको पायलट पॅसेंजर ट्रेनच्या चाकाखाली पडलेला दिसला. मी त्याच्याजवळ पोहोचलो तेव्हा तो मृत अवस्थेत होता."

पुढे ते म्हणाले, "आमच्या गावातील १५० हून अधिक लोकांनी तातडीने बचाव आणि मदत कार्य सुरू केले. ईदचा सण विसरून सर्वजण प्रवाशांना वाचवण्यासाठी आणि जखमींची काळजी घेण्यासाठी धावले. तेव्हा रुग्णवाहिका आलीच नव्हती, त्यामुळे गावात ज्याच्याकडे वाहन होते त्यांनी जखमी प्रवाशांना घेऊन हॉस्पिटलच्या दिशेने धाव घेतली. या दुर्घानेमुळे अनेक प्रवासी भेदरलेले होते अशा अवस्थेत गावकऱ्यांनी त्यांनी घरी नेले." 

गावातील रहिवासी मोहम्मद हकीम म्हणाले, "आमच्या गावातील अनेक लोक घटनास्थळी दाखल झाले आणि आम्ही एकत्र येऊन बचावकार्य सुरू केले. त्यापैकी काहींनी जखमींना मदत केली. तर काहींनी मृतदेह बाहेर काढले." 

दुर्घटनेनंतरच्या परिस्थितीचे वर्णन करताना स्थानिक रहिवासी फ़ज़लुर रहमान म्हणाले, "आम्ही सकाळी ८ वाजता नमाज अदा करायला सुरुवात केली आणि नमाज संपवल्यावर मोठा आवाज आला. तिथून आम्ही घटनास्थळी दाखल झालो. तिथे असलेले दृश्य अतिशय भयानक होते... काही लोक बेशुद्ध पडले होते, काही लोक रडत होते, मी अशा परिस्थितीत कधीच पहिली नव्हती." 
 
या मुस्लिम तरुणांनी वेळेत मदतीसाठी धाव घेतली नसती तर मृतांचा आकडा कितीतरी वाढू शकला असता. या धाडसी तरुणांमध्ये मुहम्मद राहुल, मुहम्मद खलील, मुहम्मद शमीम अख्तर आदींचा समावेश होता.

अशाप्रकारे या थरारक अपघाताच्या घटनेनंतर गावकऱ्यांनी ईदच्या पाक दिनी अपघातग्रस्तांना केलेली मदत म्हणजे खऱ्या अर्थाने माणुसकी जपत स्वतःचा आनंद बाजूला सारून कुर्बानीचा उद्देश साध्य केला आहे. निर्मल जोतच्या गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत केलेली ही कृती समाजापुढे आदर्श निर्माण करणारी आहे.
 
- भक्ती चाळक

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter