रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. या महिन्यात मुस्लिम रोजा (उपवास) पकडून अल्लाहची ईबादत करतात. सूर्योदयाचे तांबडे फुटण्यापूर्वीपासून ते सूर्यास्तानंतरची लालसर कांती फिटेपर्यंत दिवसभर रोजा पकडला जातो.
या उपवासाच्या काळात तहानेने कोरडा पडलेल्या घसा पाण्याची टंचाई असलेल्या ग्रामीण भागातल्या लोकांची जाणीव करून देते. तर पोटाची भूक, भाकरीच्या तुकड्याचा घासदेखील मोठ्या कष्टाने ज्यांच्या नशिबी असतो, त्यांच्याप्रति एक सामाजिक बांधिलकी निर्माण करते. अशाप्रकारे हा रोजा गरिबांना मदत करण्याची प्रेरणा देतो. हीच प्रेरणा मनात बाळगून दिल्लीतील एक हिंदू तरुणी जामा मस्जिद परिसरात एक अनोखा उपक्रम राबवत आहे.
सध्या चर्चेत असलेली ही तरुणी आहे नेहा भारती. नेहा गेल्या तीन वर्षांपासून रमजानच्या पाक महिन्यात जामा मस्जिदमध्ये रोजेदारांसाठी इफ्तारचे आयोजन करत आहे. ती या कृतीतून केवळ हिंदू-मुस्लिम बंधुभावाचे प्रतीक बनली नाही, तर समाजात एकता आणि प्रेमाचा संदेशही पसरवत आहे.
नेहा ही जुन्या दिल्लीतील चावडी मोहल्ल्यात राहते. तिने दिल्ली विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. देशात एका विशिष्ट समुदायाविरुद्ध द्वेष आणि तणाव वाढू लागल्याने, या द्वेषाला प्रेमाने हरवायचे नेहाने ठरवले. आपल्या समाजात शांतता आणि एकता टिकवण्यासाठी आपण एकमेकांच्या सणांचा सन्मान करायला हवा आणि समाजासाठी आपले योगदान द्यायला हवे, असे नेहाचे म्हणणे आहे. या विचाराला प्रत्यक्षात आणण्यासाठी नेहाने जामा मस्जिदमध्ये इफ्तारचे आयोजन सुरू केले.
रोजेदारांना रमजानच्या पवित्र महिन्यात भूक आणि तहान यांचा सहजतेने सामना करता यासाठी नेहा त्यांच्यासाठी इफ्तारचे आयोजन करते. सुरुवातीला तिने हे काम एकटीने सुरू केले होते, पण आता तिचे आई-वडील आणि कुटुंबातील इतर सदस्यही या नेक कामात तिला साथ देत आहेत.
नेहाचे अनोखे इफ्तार
नेहाची इफ्तार वाटण्याची पद्धत खूपच अनोखी आहे. रोजेदारांना या उपवासाच्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेता यावा यासाठी, ती विशेष मेहनत घेते. तिचा हा प्रयत्न दर्शवतो की नेहा फक्त अन्नच वाटत नाही, तर ती लोकांना एकमेकांबद्दल प्रेम आणि समर्पणाची जाणीवही करून देते.
तिच्या मेहनतीमुळे आणि प्रामाणिकपणामुळे तिने सोशल मीडियावरही आपली छाप सोडली. सोशल मीडियावर लोक तीच्या या कृतीचे भरभरून कौतुक करत आहेत आणि या चांगल्या कामात तिला मदतही करत आहेत. तिचे हे इफ्तार आयोजन दिवसेंदिवस भव्य होत आहे. समाजातील वेगवेगळ्या स्तरांतील लोक यात योगदान देण्यासाठी पुढे सरसावत आहेत.
कुटुंबाचे योगदान
नेहाने तिच्या या कामाला प्रोत्साहन आणि साथ दिल्याबद्दल आपल्या आई-वडिलांचे खास आभार मानले. ‘आवाज द वॉईस’सोबत बोलताना ती म्हणाली, “माझे आई-वडील मला नेहमी शिकवत आलेत, द्वेष करून काहीच मिळवता येत नाही. आपण जितके शक्य असेल तितके प्रेम वाटले पाहिजे.”
ती पुढे म्हणते, “मी ही कल्पना घरी बोलून दाखवल्यावर माझ्या कुटुंबानेही मला या कामासाठी खूप प्रोत्साहन दिले. फक्त प्रोत्साहनच नाही तर मला यात मदत सुद्धा केली. घरी स्वादिष्ट पदार्थ तयार करण्यापासून ते लोकांना वाटेपर्यंत आमचे सगळे कुटुंब एकजुटीने हे काम करते.”
रमजान फक्त मुस्लिमांसाठी नाही
नेहाचे असे म्हणणे आहे की रमजानचा महिना फक्त मुस्लिमांसाठी नाही, तर तो संपूर्ण मानव जातीसाठी ईश्वराच्या कृपेचा महिना आहे. ती म्हणते, “आपण सर्वांनी एकमेकांच्या सणांचा सन्मान करायला हवा आणि माणुसकीची जाणीव ठेवून समजाप्रतिची आपली जबाबदारी पार पाडायला हवी.” नेहाचा हा विचार देशभरात सामाजिक एकता आणि बंधुभावाचे महत्त्व अधोरेखित करतो.
प्रेमाने द्वेषावर विजय
नेहाचा असा विश्वास आहे, जगभरात कितीही द्वेष पसरला असला तरीही कुठेतरी प्रेम नेहमी जिवंत राहील. ती म्हणते, “ज्या ज्या देशात द्वेष वाढला आहे, तो देश उद्ध्वस्त झाला आहे. परंतु जिथे अजून प्रेम जीवंत आहे, तिथे नेहमी शांतता आणि समृद्धी टिकून राहते. म्हणूनच मी हा उपक्रम सुरू केला.”
सुरुवातीला जेव्हा नेहाने हा उपक्रम सुरू केला, तेव्हा काही नातेवाईक आणि परिसरातील लोकांनी तिची थट्टा केली होती. पण नेहाने कुणाचीही पर्वा केली नाही आणि आपले कार्य सुरू केले. आज ती संपूर्ण समाजासाठी एक प्रेरणास्थान बनली आहे.
हिंदू-मुस्लिम सौहार्दाचे प्रतीक
नेहा भारतीचा हा प्रयत्न हिंदू-मुस्लिम सौहार्दाचे उदाहरण बनला आहे. तिच्या या चांगल्या कामात अनेक हिंदू जोडीदारांनीही सहाय्य केले आहे. त्यांनी इफ्तार आयोजनात मदत केली आणि प्रेमाचा हा संदेश पसरवण्यात योगदान दिले. नेहा भारतीचे इफ्तार वाटण्याचे काम ही फक्त एक उपक्रम नाही, तर एक सामाजिक चळवळ बनली आहे.
नेहा भारतीचा रमजान महिन्यातील इफ्तारचा उपक्रम समाजातील एकता आणि बंधुभावाचे प्रतीक बनला आहे. तिच्या या अभिनव प्रयत्नामुळे हिंदू-मुस्लिम सौहार्दाचा एक नवीन दृषटिकोन समोर आला आहे. ज्या काळात समाजात द्वेष आणि तणाव वाढत आहेत, त्याचवेळी नेहाने प्रेम, समर्पण आणि एकतेचा संदेश दिला आहे. नेहाचा हा पुढाकार धर्मियांना जवळ आणण्यासाठी खरोखरच प्रेरणादायी आहे.