लोकसभा निवडणुकीत पिछाडीवर पडलेल्या महायुतीने विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र जोरदार मुसंडी मारत तब्बल तीन चतुर्थांश जागा मिळवल्या. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र पन्नाशीही गाठता आली नाही. लाडकी बहीण आणि इतर सरकारी योजनांच्या बळावर महायुती सरकारने मोठा विजय प्राप्त केला. या निवडणुकीत मोठे फॅक्टर ठरले ते जातीय समीकरणे आणि मुस्लीम मतांचे राजकारण.
लोकसभेत दुरावलेल्या अल्पसंख्यांक विशेषतः मुस्लीम समाजाला जवळ करण्यात महायुतीला यश मिळाल्याची चर्चा आहे. त्यासोबतच हिंदू मतांच्या एकत्रीकरणामुळे महायुतीला २३४चा आकडा गाठता आल्याचे जाणकारांचे मत आहे. राज्यात ३८ विधानसभा मतदारसंघात २० टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लीम मतदारांचे प्राबल्य आहे. ३८ पैकी २२ जागांवर महायुतीचा विजय झाला आहे, तर मविआला केवळ १३ जागा मिळाल्या आहेत. या निकालावर एकीकडे आश्चर्य व्यक्त होत असले तरी मुस्लीम समाजात काहीसे अस्वस्थतेचे वातावरण आहे.
निवडणूक प्रचारात झालेला वोट जिहादचे आरोप, फडणवीसांसारख्या महायुतीच्या प्रमुख नेत्याने (आणि भावि मुख्यमंत्र्याने) जिहाद विरुद्ध धर्मयुद्ध अशी घेतलेली उघड भूमिका, नितेश राणेंच्या आक्षेपार्ह वक्तव्यांचा मालिका या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महायुतीला मिळालेल्या प्रचंड बहुमतानंतर पुढे काय असा प्रश्न मुस्लीम समाजाला पडणे स्वाभाविक आहे. दरम्यान, मुस्लीम समाज या निकालाकडे कसा पहात आहे आणि त्यांच्यामध्ये काय चर्चा सुरु आहेत तसेच, नव्या सरकारकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत याविषयी आवाज मराठीने जाणून घेतल्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया.
विधानसभा निवडणुकांच्या निकालावर भाष्य करताना सामाजिक कार्यकर्ते इब्राहीम खान म्हणाले, “निवडणुकांचा निकाल एकतर्फी लागल्याने आश्चर्यजनक मानला जात आहे. यावेळी आघाडीमध्ये विस्कळीतपणा जाणवला. महायुती निवडणुकांना आत्मविश्वासाने सामोरी गेली. आघाडीकडे त्याचा पाहायला मिळाला.निकाल आम्ही स्वीकारला आहे. नव्या सरकारकडे सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मांडत राहण्याचे आमचे काम आम्ही सुरुच ठेवणार आहोत.”
पुढे ते म्हणतात, “सरकारने समान्य नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी. मुस्लीम समाजानेही महायुतीला भरपूर मतदान केले आहे. कसब्यासारख्यात पारंपारिक मतदारसंघात सुद्धा मुस्लिमांनी भाजपला मोठ्या प्रमाणात मते दिली आहेत. याचा सगळा डाटा माझ्याकडे आहे. फक्त भाजपच नाही तर घटकपक्ष राष्ट्रवादीलासुद्धा मुस्लिमांनी भरघोस मतदान केले आहे. त्यामुळे या सरकारने मुस्लीम समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक ठेवावा आणि समाजाच्या मुलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. मुस्लीम समाजासाठी मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळ आहे. सरकारने त्यामध्ये भरीव आर्थिक तरतूद केली पाहिजे आणि तिचा १००% विनियोग होईल हे पाहिजे.”
मुस्लीम समाजाला सल्ला देताना इब्राहीम खान म्हणतात, “आपल्या सामाजिक चळवळी या धर्मकेंद्रित नसाव्यात. सामाजिक कार्य धर्मापुरते मर्यादित न ठेवता ते संपूर्ण समाजासाठी असावे. धर्माच्या मुद्द्यांवर न लढता त्यांनी जगण्याच्या मुलभूत प्रश्नांसाठी लढले पाहिजे आणि धार्मिक राजकारणापासून लांब राहिले पाहिजे. मुस्लीम समाजानेही कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे’ उभे राहायला हवे.”
मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांवरसविस्तर भाष्य केले. ते म्हणले, “सर्वसामान्य लोकांचा विश्वास न बसणारा हा निकाल होता. निवडणुकीच्या काही महिने अगोदर महिला वर्गाला खुश करण्यासाठी लाडकी बहिण योजना सुरु केली आणि तीन महिन्याचे एकत्रित पैसे दिले. हे आचारसहिंतेच्या नियमांमध्ये बसते का हा प्रश्नच आहे. निवडणूक काळात अशा बऱ्याच गोष्टी घडल्या. त्यावर निवडणूक आयोगाने वेळीच आक्षेप का घेतला नाही हा प्रश्न उभा राहतो. निवडणूक काळात मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठीपैशांचा खूप मोठ्या प्रमाणात दुरुपयोग करण्यात आला आहे. ही घटना लोकशाहीला अत्यंत दुबळी करणारी आहे.”
मतांच्या ध्रुवीकरणाबाबत तांबोळी म्हणतात, “या निवडणुकीत जसे हिंदू-मुस्लीम ध्रुवीकरण झाले, त्याच पद्धतीने मराठा आणि ओबीसींमध्येदेखील ध्रुवीकरण करण्यात आले. निवडणुका जिंकण्यासाठी हा प्रकार केला जातो खरा, पण याचे दूरगामी परिणाम सामाजिक ऐक्यावर होतात.”
मुस्लिम समाजाने लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूने एकगठ्ठा मतदान केले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांमध्ये फाटाफूट झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे महायुतीला मुस्लिम मतदार जोडण्यात यश आल्याचे पाहायला मिळाले. याविषयी बोलताना शमसुद्दीन तांबोळी म्हणतात, “महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजना, एसटी प्रवासातील सुटची योजना आणि इतर महिला केंद्रीत योजनांचा परिणाम म्हणून अगदी उघडपणे मुस्लिम महिलांनी महायुतीला साथ दिल्याचे या निवडणुकांमध्ये पाहायला मिळाले. निवडणुकांपूर्वी मोफत अजमेर यात्रा, मुस्लीम महिलांना बुरख्याचे वाटप याचाही परिणाम मुस्लीम मतदारांवर झालेला पाहायला मिळतोय.”
पुढे बोलताना ते म्हणतात, “मुस्लिमांकडून महायुतीला मतदान झाले असले तरीही, कुठेही अस्तित्वात नसलेल्या वोट जिहादच्या नावाने मुस्लीम समाजाला बदनाम केले जात आहे. लव्ह जिहाद, लॅंड जिहाद आणि आता वोट जिहादच्या नावाने हिंदू समाजाच्या मनात भीती निर्माण करून धर्माच्या नावाने मते मागण्याचा प्रकार यावेळी घडला आहे.”
येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत असे विचारले असता तांबोळी म्हणतात, “आपल्या महाराष्ट्रात जातीधर्माच्या नावाने द्वेष वाढणार नाही यासाठी नव्या सरकारने काम केले पाहिजे. आम्ही सत्यशोधक मंडळाचे सर्वच कार्यकर्ते समान नागरी कायद्याच्या बाजूने आहोत. संविधानाला अपेक्षित असणारा समान नागरी कायदा यावा यासाठी मंडळाने १९६६मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. त्यामुळे समान नागरी कायदा आणण्यासाठी या सरकारने प्रयत्न करावेत एवढीच आमची अपेक्षा आहे.”
सांगलीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष मुनिर मुल्ला यांनी देखील निवडणुकीच्या निकालावर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणतात, “विधानसभांचे निकाल खूपच अनपेक्षित होते. महायुतीला यश मिळण्यामागचे कारण म्हणजे लाडकी बहिण योजना. या योजनेद्वारे सरकारने महिलांच्या खात्यात थेट पैसे पाठवल्याने महिलावर्ग जास्त प्रभावित झाला. तसेच महायुतीच्या कार्यकाळात ज्या वैविध्यपूर्ण योजना सुरु झाल्या आहेत त्याचा परिणाम म्हणजे सर्व मतदार महायुतीकडे आकर्षिले गेले आणि त्यामुळेच महायुतीला भरघोसमते मिळाली आहेत.”
पुढे ते म्हणतात, “आता नवीन सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. महाराष्ट्राला औद्योगिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या देशात अव्वल दर्जाचे स्थान मिळवून द्यावे. मराठा समाजासाठी जसे सारथी, मातंग समाजासाठी आर्टीची स्थापना करण्यात आलीय तशीच मुस्लीम समाजासाठी मार्टीची स्थापना झाली आहे. मात्र पुढे त्याचे काही काम झालेले नाही. इतर संस्थांप्रमाणे मार्टीद्वारे मुस्लीम समाजाला विनाव्याज कर्ज उपलब्ध करून द्यावे. त्याचप्रमाणे मुस्लीम तरुणांना रोजगारासंदर्भातील स्कीम्स सुरु करण्यात याव्यात. सर्वात महत्वाचे म्हणजे काही धर्माधवादी लोकांच्या बोलण्यातून मुस्लीम समाजाला सतत टार्गेट गेले जात आहे. त्यांच्यावर हेट स्पीचच्या अस्तित्वात असलेल्या कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, जेणेकरून समाजात तेढ निर्माण होणार नाही.”
विधानसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालामुळे या निकालांचे चहूबाजूंनी विश्लेषण सुरु आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने या निकालांचा अर्थ लावतोय. लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लीम समाजाची मते निर्णायक ठरली होती. मात्र, यावेळी चित्र वेगळे दिसले. मुस्लीम मतदार हे कायमच महायुतीच्या विरोधात मतदान करतात असा एक समज आहे. आता महायुतीचे सरकार आल्यामुळे मुस्लीम समाजात त्याचे काय प्रतिबिंब पडले हे जाणून घेण्याचा प्रयत्न आवाज मराठीने केला. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार देवेंद्र फडणवीस यांनी विजयानंतर ‘सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे’ आश्वासन दिले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मुस्लीम समाजाला दिलासा मिळाला असेल यात शंका नाही!