महाकुंभात मुस्लिम बांधवांनी रचला मानवतेचा नवा अध्याय

Story by  Pradnya Shinde | Published by  Pradnya Shinde • 7 h ago
प्रयागराज: सामाजिक सौहार्दाची घट्ट वीण
प्रयागराज: सामाजिक सौहार्दाची घट्ट वीण

 

प्रज्ञा शिंदे
 
कुंभमेळा म्हणजे ठराविक आवर्तन काळानुसार पवित्र नद्यांच्या तीर्थक्षेत्री भरणारा हिंदू भाविकांचा मेळा आहे. दर तीन वर्षांनंतर एकदा अश्या पद्धतीने बारा वर्षांत प्रयागराज, उज्जैन, नाशिक (त्र्यंबकेश्वर), हरिद्वार या चार वेगवेगळ्या तीर्थक्षेत्री पूर्ण कुंभमेळे भरत असतात. दर सहा वर्षांनी हरिद्वार व प्रयाग येथे अर्धकुंभमेळा भरतो. अशा बारा पूर्ण कुंभमेळ्यांनंतर म्हणजेच तब्बल १४४ वर्षांनंतर प्रयागराज येथे महाकुंभमेळा भरतो. २०२५ चा हाच तो पूर्ण कुंभमेळा. 

जगातील सर्वोच्च गर्दी एकाच दिवशी होणार, प्रयागराजचा महाकुंभ श्रद्धा आणि धार्मिकतेचा अनोखा संगम ठरणार, महाकुंभ हजारो कोटी रुपयांचा इव्हेंट ठरणार, असे कितीतरी दावे करत उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभाविषयी वातावरणनिर्मिती केली होती. हे दावे त्या सरकारने प्रत्यक्षात उतरवण्याचा आटोकाट प्रयत्नही केला. तथापि त्यांचे नियोजन आणि व्यवस्थापन चेंगराचेंगरी रोखण्यात यशस्वी ठरले नाही, हे वास्तव आहे. 
 
अफाट गर्दी आणि व्यवस्थापनाचे अपयश
मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर स्नानासाठी झुंबड उडालेली असताना झालेल्या चेंगराचेंगरीने अनेकांचा बळी घेतल्याने या सगळ्याला गालबोट लागले. 
 
काही क्षणांमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती .महाकुंभात भक्तांसाठी केलेली व्यवस्था उद्ध्वस्त झाली होती. श्रद्धाळू भुकेने व्याकूळ झाले होते. चेंगराचेंगरीत कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली होती. मृतदेहांचे थर पडले होते. अनेक भाविक जीव वाचवण्यासाठी  धडपडत होते. अनेकांचे कुटुंब विखुरले,जीव गेला, तर काहींनी आपल्या प्रियजनांना डोळ्यांसमोर गमावले. परिसरात मृतदेहांचे ढीग, रडणारी लहान मुले आणि मदतीसाठी आक्रोश करणारे भाविक या भयावह दृश्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले.अशा वेळी भारतीय एकात्मतेच्या आणि बंधुतेच्या संस्कृतीचे दर्शन घडले. 



संक्रांत संकटाची, पण माणुसकीची ज्योत तेवती राहिली
या महाकुंभमेळ्यात हिंदू भाविकांची संख्या कोट्यवधीच्या घरात होती. लाखो लोक संगमावर स्नान करण्यासाठी जमले होते. पण नियोजनाच्या अभावामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. अचानक पसरलेल्या गोंधळात अनेक वृद्ध, महिला आणि लहान मुले गर्दीत हरवली. लोकांसाठी पिण्याचे पाणी, अन्न, आणि सुरक्षित निवाऱ्याची कमतरता जाणवू लागली.
 
याच संकटकाळात मानवतेचा एक अद्वितीय अध्याय लिहिला गेला.या संकटकाळात भारतीय संस्कृतीतील बंधुता आणि सहवेदना प्रकर्षाने समोर आली. प्रशासन अपयशी ठरत असताना मुस्लिम समाजाने शहरातील जॉनस्टनगंज रोडसह दहा पेक्षा अधिक भागांमध्ये बंधुत्व आणि मानवतेचा एक अनोखा आदर्श प्रस्तुत केला. सुमारे २५,००० ते २६,००० भाविकांना उघड्या आकाशाखाली थंडी सहन करावी लागू नये, यासाठी त्यांनी आपल्या घरे, मशिदी, मजार, दर्गा आणि इमामवाड्यांचे दरवाजे उघडले.प्रयागराज येथील यादगरे हुसैनी कॉलेजमध्ये ही भाविकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली.
 

अनेक मुस्लिम कुटुंबांनी हिंदू भाविकांना आश्रय दिला. काहींनी भुकेने व्याकूळ असलेल्या भाविकांसाठी अन्नाची सोय केली, तर काहींनी लहान मुलांसाठी दूध आणि औषधांची व्यवस्था केली. दोन वेळच्या नाष्ट्यापासून जेवणापर्यंतच्या सगळ्या सोयी मुस्लिम बांधवांनी आपल्या घरात केल्या. 
 
रामाच्या मदतीला रहीम धावून आले 
या संकटकाळात अनेक उदाहरणे समोर आली, जिथे मुस्लिम समाजाने हिंदू भाविकांना मदतीचा हात दिला. एका मुस्लिम कुटुंबाने सांगितले की, "आमच्या घरासमोर रस्त्यावर अनेक महिला आणि लहान मुले रडत होती. त्यांच्यासोबत कोणी नव्हते. आम्ही त्यांना आमच्या घरी नेले, त्यांना अन्न-पाणी दिले आणि त्यांचे कुटुंबीय शोधण्यास मदत केली." प्रयागराजमधील सईद अशरफ म्हणतात," आम्ही नेहमी अशा भंडाऱ्याचे आयोजन करत असतो. येणाऱ्या सर्व भाविकांना पोटभर अन्न देता यावे हा आमचा यामागील हेतू असतो." पुढे ते म्हणतात," भारताची गंगा -जमुना संस्कृती आहे. त्यामुळे हीच संस्कृती आणि सौहार्द आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत."   


प्रयागराजच्या अनेक मशिदी आणि मदरशांनी देखील आपली दारे उघडी ठेवली. " इस्लाम धर्मात खिदमत ही अत्यंत महत्त्वाची असते, इस्लाम धर्म मानवता जपण्यास शिकवतो. त्यामुळे आम्ही नेहमी सर्व धर्मियांना आमच्याकडून होईल ती मदत करत असतो." असे मत एका स्थानिक मुस्लिम समाजसेवकाने व्यक्त केले. मोहम्मद अनस आणि त्यांच्या परिवाराने भाविकांना पाण्याची आणि नाष्ट्याची व्यवस्था केली. अनेक मुस्लिम युवकांनी रस्त्यावर फिरून चेंगराचेंगरीत अडकलेल्या आणि हरवलेल्या लोकांना मदत केली, त्यांना त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचवले. काहींनी सामाजिक संस्थांशी संपर्क साधून अन्न, पाणी आणि औषधांची व्यवस्था केली.
 
 
मेळयातील भाविकांना अंघोळ आणि स्वच्छता गृहाच्या सुविधाही उपलब्ध करून दिल्या गेल्या. परिसरातील प्रत्येक मुस्लिम कुटुंबाने आपल्याकडून होईल ती मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. सोनम या मेळयात आलेल्या एक भाविक आहेत. त्या म्हणतात, “ मी आणि माझ्यासोबत १२ लोक आहेत. आम्ही सर्व आता एक मुस्लिम कुटुंबाच्या घरी आहोत. या कुटुंबाने आमची खूप सेवा केली आहे. आम्हाला जेवणापासून ते राहण्याच्या सगळ्या सोयी इथे पुरवल्या आहेत.” 
 
या परिसरातील मुस्लिम बांधवांनी फक्त सुविधाच पुरवल्या नाही तर अनेकांना आपल्या कुटुंबाला शोधण्यातही मदत केली. एका भाविकाने सांगितले, "मी आणि माझे कुटुंब या चेंगराचेंगरीत अडकून पडलो होतो. आम्हाला कुठे जायचे हेही समजत नव्हते. तेव्हा एका मुस्लिम कुटुंबाने आम्हाला आपल्या घरी नेले, जेवण दिले आणि रात्रभर सुरक्षित ठेवले. या मदतीशिवाय आम्ही जिवंत राहू शकलो नसतो."  
 
धर्मापलीकडील मदतीचा ओघ
प्रयागराजमधील एक मुस्लिम महिला म्हणते,
" मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना
हिन्दी हैं हम वतन है हिन्दोस्ताँ हमारा" 

या घटनेने भारतीय संस्कृतीतील बंधुत्वाचा आणि सहिष्णुतेचा खरा अर्थ दाखवून दिला. एकीकडे काही समाज कंटक  समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असताना, दुसरीकडे प्रयागराजच्या मुस्लिम समाजाने दाखवले की मानवता हा खरा धर्म आहे.
 
एका मुस्लिम तरुणाने सांगितले, "जेव्हा आम्ही पाहिले की हजारो लोक उपाशी आहेत, लहान मुले आईवडिलांपासून हरवली आहेत, तेव्हा आम्हाला कोणताही धर्म आठवला नाही. आम्ही फक्त मदत करण्यासाठी पुढे गेलो. आम्हाला फक्त संकटात असलेला माणूस दिसत होता."
 


अनेक भाविक मुस्लिम बांधवांनी केलेल्या मदतीने भारावून गेले होते. या संकटाने पुन्हा एकदा सिद्ध केले की मानवतेच्या भावनेपुढे कोणतेही धर्म, पंथ किंवा राजकीय मतभेद गौण ठरतात. भारतीय संस्कृती ही सहिष्णुतेची आणि बंधुत्वाची शिकवण देणारी आहे. महाकुंभाच्या या दुर्घटनेने व्यवस्थापनाच्या त्रुटी उघड केल्या असल्या तरी, त्याचवेळी मानवतेचा नवा दीपस्तंभही प्रज्वलित केला. संकटाच्या वेळी माणुसकी हा सर्वात मोठा धर्म ठरतो, हे पुन्हा एकदा साऱ्या जगाने पाहिले.

-प्रज्ञा शिंदे

जरूर पहा : 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -