शांतता समितीच्या बैठकीत हुसेन शाह व वसीम शाह यांचा सत्कार करताना उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे व शांतता समितीचे सदस्य
माणुसकी हाच खरा धर्म असल्याने माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे असा सूर अनेकदा व्यक्त होतो. सध्या सर्वत्र जातीय व धार्मिक कटूता शिगेला पोहोचत असताना येथील मुस्लिम युवकांनी बहुळा धरणाच्या पाण्यात बुडणाऱ्या हिंदू महिलेचे प्राण वाचवून धार्मिक, जातीय एकतेचे व माणुसकीचे दर्शन घडवले आहे. या युवकांचा येथील पोलिस ठाण्यांतर्गत कार्यरत असलेल्या शांतता समितीतर्फे सत्कार करण्यात आला.
शहरातील जळगाव रस्त्यावरील बहुळा धरणाच्या पाण्यात ५५ वर्षीय हिंदू समाजाच्या महिलेने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने उडी घेतली. याचवेळी येथून जात असलेल्या हुसेन शाह व वसीम शाह यांनी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पाण्यात उड्या मारून या महिलेला बाहेर काढून उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात आणले. रमजान महिन्याच्या काळात हे पवित्र कार्य करण्याचे भाग्य आम्हास लाभल्याचे हुसेन व वसीम शाह यांनी स्पष्ट केले.
या दोन्ही युवकांचा पाचोरा पोलिस ठाण्यात शांतता समितीतर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलिस निरीक्षक अशोक पवार, उपनिरीक्षक योगेश गणगे, प्रकाश चव्हाणके, सुनील पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.