तालुक्यातील दापूर येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान तथा हिदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले मोठेबाबांचा यात्रोत्सव शनिवार (ता. २) पासून सुरू होत आहे. यात्रा कमिटीने यात्रेची तयारी केली असून, विविध कार्यक्रम होणार आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवात हिंदू-मुस्लिम बांधव एकोप्याने सहभागी होतात. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आहे. शनिवारी रात्री नऊला संदल मिरवणूक काढण्यात येणार आहे. रविवारी (ता. ३) सायंकाळी बक्षुभाई दारुवाले (संगमनेर) शोभेची दारू उडविणार आहेत. आसमंत उजळून टाकणारी ही आकर्षक आतषबाजी यात्रोत्सवाचे आकर्षण असते. मनोरंजनासाठी रात्री कलावंत मंगला बनसोडे यांचा तमाशा मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी (ता. ४) दुपारी कुस्त्यांची दंगल होईल. यात जिल्हाभरातील नामवंत पहिलवान सहभागी होणार आहेत. यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटीसह ग्रामस्थांनी केले आहे.
यात्रेबद्दल विचारले असता, दापुर येथील पोलिसपाटील ज्ञानेश्वर साबळे म्हणाले, "दापूर येथील मोठेबाबा देवस्थान 66 हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले भूमिपुत्र यात्रेनिमित्त गावी येतात. हा यात्रोत्सव म्हणजे स्थानिकांसह परगावी असलेल्या भूमिपुत्रांसाठी ऊर्जा देणारा ठरतो."
दरम्यान, संदल मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम बांधव सहभागी होतील. गलफ अर्थात चादर चढविण्याच्या कार्यक्रमात दोन्ही धर्मातील लोक सोबत असतात. नवसाला पावणारे मोठेबाबा म्हणून देवस्थानाकडे भाविक पाहतात. नवसपूर्तीसाठी दंडवत, लोटांगण घालून पुष्पहार अर्पण केले जातात. दापूरसह गोंदे, चापडगाव, धुळवड परिसरातील लोक यात्रेत सहभागी होतात. यात्रोत्सव काळात २५ ते ३० लाखांची उलाढाल होते.
यात्रेनिमित्त मोठेबाबा मंदिराची रंगरंगोटी करण्यात येऊन आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, वावी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला असल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली.