धार्मिक एकतेचा संदेश देणारे मूर्तीकार मोहम्मद कौसर शेख

Story by  Pradnya Shinde | Published by  Pradnya Shinde • 2 d ago
मूर्तीकार मोहम्मद कौसर शेख
मूर्तीकार मोहम्मद कौसर शेख

 

प्रज्ञा शिंदे
 
"मेरा नाम मोहम्मद कौसर शेख है। मैं गणपति कि मूर्ती बनाता हूं।" 
हे वाक्य ऐकताच अनेकांच्या भुवया ऊंचावतात. मात्र सर्वधर्मसमभावाची परंपरा असलेल्या भारतात विविध सण-उत्सवांतून या सांस्कृतिक एकतेची प्रचितीही वेळोवेळी येत असते.

यंदाच्या गणेशोत्सवातही ४० वर्षीय मोहम्मद कौसर शेख यांच्या कामातून हीच एकता आणि धार्मिक सौहार्द पाहायला मिळाले. मुंबई जवळच्या भाईंदर येथे राहणारे कौसरभाई गेल्या २२ वर्षांपासून गणपतीची मूर्ती साकारत आहेत. अनेक मूर्तीकार प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करतात. कौसरभाई मात्र मातीच्या मूर्ती बनवण्यालाच प्राधान्य देतात. 
 

 
पर्यावरणस्नेही मूर्तींना प्राधान्य 
प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती बनवणे दिसायला आकर्षक वाटते, मात्र पर्यावरणावर त्याचे गंभीर परिणाम होतात. POP पाण्यात सहज न विरघळणारे असल्याने, मूर्ती विसर्जनानंतर जलस्रोत प्रदूषित होतात आणि जीवसृष्टीला हानी पोहचते. पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्यामुळे मासे आणि इतर जीव मृत्युमुखी पडतात. त्यातच POP सुकवण्यासाठी रासायनिक रंग आणि विविध घातक घटक वापरले जातात, ज्यामुळे पाण्याची गुणवत्ता आणखी खालावते. 

 
POP च्या मूर्ती पर्यावरणासाठी एक धीमी विषप्रक्रिया ठरते, जिचा दीर्घकालीन परिणाम फार घातक ठरतो. हीच गोष्ट लक्षात घेवून गेल्या काही वर्षांपासून कौसरभाई यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती बनवणे सोडून, पर्यावरणपूरक मातीच्या मूर्ती बनवण्यास सुरुवात केली आहे. हा बदल त्यांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी केला आहे. यावर्षी त्यांनी ७०-८० इको-फ्रेंडली गणेश मूर्ती तयार केल्या असून, या मूर्ती भक्तांमध्ये विशेष लोकप्रिय ठरत आहेत. त्यांनी घेतलेला हा पुढाकार पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने एक मोठे पाऊल ठरले आहे. त्यांची ही कृती इतर मूर्तिकारांनाही पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्याचे महत्त्व पटवून देणारे आहे.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांवर बंदी असली तरी ती फक्त कागदोपत्रीच आहे अशी खंत कौसरभाई व्यक्त करतात. कौसरभाई यांच्या मातीच्या मूर्ती केवळ पर्यावरणपूरकच नसून त्यांच्या कौशल्याने या मूर्तींना विशेष सौंदर्य प्राप्त झाले आहे. यामुळेच गणेश भक्त त्यांची विशेष प्रशंसा करताना दिसतात.. 

 
असे करतात समाजकार्य 
पर्यावरणाची हानी होऊ नये, म्हणून कौसर शेख इको फ्रेंडली गणपती तर बनवतातच, सोबतच ते रोजगार उपलब्ध करून देण्याचंही काम करत आहेत. "आज समाजात गरिबी आहे आणि अनेकांच्या हाताला काम नाही. माझ्या व्यवसायातून मी अनेकांना रोजगार देण्याचा प्रयत्न करतो," असे ते सांगतात. त्यांच्या मते, “जेव्हा पीओपीच्या मूर्ती बंद होतील, तेव्हाच मातीच्या मूर्ती तयार करणाऱ्या कलाकारांना योग्य रोजगार मिळू शकेल.”

 
जात-धर्मापलीकडील कला… 
कौसरभाईंचे गणेश मूर्ती बनवण्याचे काम फक्त हंगामी नसून ते वर्षभर सुरू असते. "गणपतीच्या मूर्त्या बनवण्याची माझी फार इच्छा होती. हीच इच्छा मी पूर्ण करत आहे आणि पुढेही करत राहीन," असे ते आत्मविश्वासाने सांगतात.

गणपतीच्या मूर्ती बनवण्यामागच्या प्रेरणेबद्दल बोलताना ते म्हणतात, “हिंदूबांधव माझ्याकडून मूर्ती घ्यायला येतात तेव्हा मला समाधान मिळते. मला मुर्ती बनवायला आवडतं आणि त्यावर माझं घर ही चालतं. त्यामुळे मी हे काम कधी बंद करणार नाही.”

ते पुढे म्हणतात, “या व्यवसायामुळे मी अनेक अर्थिक संकटांपासून बचावलो आहे. माझी माझ्या कामावर खूप श्रद्धा आहे. यात धर्म आडवा येत नाही.” जात-धर्म न पाहता कलेच्या माध्यमातून लोकांना आनंद देण्यात ते समाधान मानतात. कलेला कोणताही धर्म नसतो हेच ते आपल्या व्यवसायातून दाखवून देतात. 

 
सुखी जीवनाचे तत्वज्ञान  
सध्या समाजकंटकांकडून धार्मिक तेढ आणि विविध गैरसमज पसरवले जातात. त्यावर, ‘हिंदू-मुस्लिम असा भेदभाव करणाऱ्या राजकारणापासून लांब राहिला पाहिजे’, असं ते आवर्जून सांगतात. गणपतीची मूर्ती बनवल्यामुळे बरेचदा टीका झाल्याचंही ते सांगतात. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या कामावर लक्ष दिलं पाहिजे असंही ते म्हणतात.

“अनेक लोक मतांसाठी हिंदू-मुस्लिम अशी तेढ निर्माण करतात. काही या फसवेगिरीला बळी ही पडतात. मात्र राजकारण आणि माझं काम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी या राजकारणाचा विचारही करत नाही.” असं म्हणत कौसरभाई राजकारणापेक्षा व्यवसायामार्फत जपल्या जाणाऱ्या सौहार्दाला अधिक महत्त्व देतात. 

मूर्तिकार म्हणून कौसरभाईंच्या कामाला गणेश भक्तांकडून मोठी पसंती मिळते. त्यांना असलेल्या सामाजिक आणि पर्यावरणीय भानामुळे गणेश भक्तांमध्ये त्यांचे नाव खूप आदराने घेतलं जातं. त्यामुळे त्यांच्या कामातून मिळणारा एकतेचा संदेश समाजासाठी महत्त्वाचा ठरतो. आवाज मराठीकडून त्यांच्या या प्रेरणादायी कामाला सलाम त्यांच्या व्यवसायालाही खूप- खूप शुभेच्छा…
 
-प्रज्ञा शिंदे

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter