हरियाणातील मेवातमध्ये तब्लीगी जमातच्या तीन दिवसीय ऐतिहासिक इज्तेमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. इज्तेमाच्या समारोपाला तब्लीग जमातचे प्रमुख मौलाना साद कंधालवी उपस्थित होते. त्यांच्या दुआनेच कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपस्थित असलेल्या लाखो मुस्लिमांसोबत मौलाना साद यांनी संवाद साधला. त्यांनी इस्लामची मूलभूत शिकवण, मुस्लीमांची सामाजिक जबाबदारी आणि देशप्रेम अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले.
इस्लाम बंडखोरीची परवानगी देत नाही — मौलाना साद
इस्लाम हा शांततेचा आणि बंधुभावाचा धर्म असल्याचे मौलाना साद म्हणाले. कुठल्याही परिस्थितीत तो देशाविरुद्ध बंड करण्याची परवानगी देत नाही. खरा मुसलमान कधीच कायदा मोडत नाही, कि देशविरोधी कृत्ये करत नाही, याची आठवण त्यांनी उपस्थितांना करून दिली. धर्माने सांगितलेल्या तत्वांचे पालन करत समाजात चांगुलपणाचा आणि शांतीचा संदेश द्यावा, असे आवाहन यावेळी मौलाना साद यांनी केले.
धर्माच्या मूलभूत शिकवणुकीची करून दिली आठवण
मौलाना साद यांनी आपल्या प्रवचनात उपस्थितांना नमाज, रोजा, जकात आणि हज या इस्लामच्या पाच मुलभूत तत्त्वांची आठवण करून दिली. प्रेषित मुहम्मद यांच्या शिकवण तंतोतंत आचरणात आणणारच खरा मुस्लीम असतो असे ते यावेळी म्हणाले.
ते म्हणाले, “चप्पल शिवायला चांभाराकडे जावं लागतं, तसेच मार्गदर्शन हवे असेल तर मस्जिद आणि अल्लाहच्या मार्गावरच चालावं लागतं.”
आईवडिलांची सेवा करणं अत्यंत महत्त्वाची आहे. आईवडिलांकडे दुर्लक्ष करणाऱ्याला अल्लाह माफ करत नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. जाणूनबुजून नमाज सोडणाऱ्यांना कयामतवेळी या आळसाची कठोर मिळेल, अशी चेतावणीही त्यांनी यावेळी दिली.
महिलांना आणि मुलांना इस्लामी शिक्षण देण्यावर भर
मुस्लिम माता आणि भगिनींना इस्लामचं शिक्षण देण्याची गरज यावेळी मौलाना साद यांनी व्यक्त लेली. मुलींचं संगोपन इस्लामी तत्वांवर आधारित असावं, असे ते म्हणाले. मुसलमानांनी आपल्या मुलांना आवर्जून मस्जिदीत घेऊन जावं आणि त्यांना धर्माच्या मूलभूत गोष्टी शिकवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
भव्य आयोजनातून देण्यात आला शांतता आणि ऐक्याचा
१९ ते २१ एप्रिलदरम्यान पार पडलेल्या या इज्तेमामध्ये देशभरातून लाखो मुसलमान सहभागी झाले. कार्यक्रमासाठी २१ एकरमध्ये भव्य मांडव उभारण्यात आला होता. १०० एकरमध्ये बसण्याची तर ८० एकरात पार्किंगची व्यवस्था करण्यात होती. यावेळी ४५०० हून अधिक शामियाने उभारण्यात आले होते. सर्वत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था होती. सोबतच आरोग्य शिबिरं, वजूखाने आणि लंगर (भंडारा) यांचंही उत्तम नियोजन करण्यात आले होते.
या भव्य आयोजनात प्रशासनाचाही पूर्ण सहभाग राहिला. SP विजय प्रताप सिंह, SDM, DSP फिरोजपूर झिरका आणि इतर अधिकारी इथे सातत्यानं उपस्थित होते. परिसराची ड्रोनच्या साहाय्याने देखरेख करण्यात आली. वाहतूक आणि इतर गोष्टींवर ताण पडणार नाही याची विशेष खबरदारी यावेळी घेण्यात आली होती.
राजकीय आणि सामाजिक प्रतिनिधींची उपस्थिती
या इज्तेमालात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधीही सहभागी झाले. मेवात भाजप जिल्हाध्यक्ष सुरेंद्र सिंह उर्फ पिंटू यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. “मी इथे माणूस म्हणून आलो आहे. धर्म भिंत न बनता पूल बनायला हवा. आपल्याला एकमेकांच्या धर्माचा सन्मान करायला हवा.”, असे कौतुकास्पद उद्गार त्यांनी यावेळी काढले.
समारोपात दुआ आणि शांततेचा संदेश
तीन दिवसांच्या या इज्तेमामध्ये अखेरच्या दिवशी मौलाना साद यांनी भावनिक दुआ केली. देशभरात शांतता नांदावी, न्याय आणि माणुसकी यांसाठी यावेळी त्यांनी अल्लाहकडे दुआ मागितली. मेवात वादाचं नव्हे तर धर्म, बंधुभाव आणि इस्लामी एकतेचं प्रतीक बनावे अशी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
तब्लीगी जमात : भारतातील पुनरुत्थानवादी चळवळ
१९२६ मध्ये मौलाना इलियास कंधालवी यांनी दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरात तब्लीगी जमातची स्थापना केली. मुसलमानांना इस्लामच्या मूळ शिकवण सांगणे आणि ती आत्मसात करायला लावणे हे तब्लीगचे मुख्य उद्दिष्ट आहे. कलमा, नमाज, इल्म व जिक्र, मुस्लिमांचा सन्मान, नीयतीत प्रामाणिकपणा आणि वेळेचं योग्य नियोजन या ‘सहा गोष्टीं’वर ही चळवळ आधारलेली आहे. तब्लीगी जमातचे लोक त्यांच्या दैनंदिन आयुष्यातून वेळ काढून ३ दिवस, ४० दिवस किंवा ४ महिने धार्मिक जनजागृतीसाठी बाहेर पडतात. ते आपला खर्च स्वतः करतात. मस्जिदीत राहतात आणि मुस्लिमांना खरा इस्लाम समजावून सांगतात.
- युनूस अलवी, नूंह (हरियाणा)