संतोष देशमुखांच्या स्मरणार्थ मस्साजोगमधील मुस्लीम समाजाने रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या घटनेने गावात शोककळा पसरली. 31 मार्च 2025 रोजी रमजान ईद साजरी झाली, पण मस्साजोगमधल्या मुस्लिम बांधवांनी हा सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला. संतोष देशमुख यांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती बंधुभाव दाखवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला.
मस्साजोगमधल्या मुस्लिम बांधवांनी या वेळी नवे कपडे खरेदी केले नाहीत. अगदी लहान मुलांनाही नवे कपडे घेतले गेले नाहीत. 200 हून अधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या या गावातील मुस्लीम समुदायाच्या 20 ते 25 घरांमध्ये ईदनिमित्त कोणतेही गोड पदार्थ बनले नाहीत. 2 मार्चपासून रमजान महिना सुरू झाला होता. या काळात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी रोजे पूर्ण केले, पण सण साजरा करण्याचा उत्साह त्यांनी टाळला. सोमवारी सकाळी मस्जिदीत रमजान ईदचा नमाज पढल्यानंतर सर्व लहानथोरांनी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांची सकाळी 10 वाजता भेट घेतली. या भेटीत त्यांनी धनंजय यांना सांत्वन केलं. गळाभेट घेताना अनेकांचे डोळे पाणावले, काहींनी तर मोठमोठ्याने हंबरडा फोडला.
प्रत्येक रमजान ईदला शुभेच्छा देणारा आपला लाडका सरपंच यंदा या जगात नाही, याचं दुःख मुस्लिम बांधवांना झालं. संतोष देशमुख दरवर्षी मुस्लिम बांधवांच्या घरी जाऊन शुभेच्छा देत, त्यांच्यासोबत अल्पोपहार करत. यंदा ते नसल्याने धनंजय देशमुखांनी मुस्लिम मोहल्ल्यात जाऊन शुभेच्छा दिल्या. या भेटीत सर्वांचे डोळे पाणावले. "पुढची ईद दणक्यात साजरी करू," असं संतोष अण्णा म्हणाले होते, हे आठवताना अनेकांचा कंठ दाटला. संतोष यांनी मंगल कार्यालयात ईद साजरी करण्याचा संकल्प जाहीर केला होता, पण ते स्वप्न अधुरं राहिलं. भेटीत मुस्लिम बांधवांनी गळाभेट देताना माणुसकीला खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं. दरवर्षी मोठ्या प्रेमाने शिरखुरमा भरवणाऱ्या हातांनी यंदा दुःखाच्या अश्रूंनी सांत्वन केलं.
हा प्रसंग पाहून अनेकांचं मन सुन्न झालं, डोळे पाणावले. अनेक मुस्लिम बांधव संतोष देशमुखांच्या आठवणींनी गळ्यात पडून रडले. "देशमुख कुटुंबीय दुःखात असताना आम्ही सण साजरा करणार नाही," असा निर्णय गावातल्या सर्व मुस्लिम बांधवांनी घेतला. गावातील मुस्लीम समाजाच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होतंय. मस्साजोगने हिंदू-मुस्लिम एकतेचा आदर्श तर ठेवलाच पण संकटकाळात एकमेकांना साथ देण्याची भावनाही यातून अधोरेखित झाली.
संतोष देशमुखांची 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरणानंतर क्रूर हत्या झाली होती. या घटनेने गावात तणाव निर्माण झाला होता. याआधीही गावकऱ्यांनी संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ होळी आणि धुळवड साजरे केले नव्हते. जोपर्यंत या हत्याकांडातल्या सर्व आरोपींना फाशी होत नाही, तोपर्यंत कोणताही सण साजरा न करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला होता. सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असली, तरी धनंजय देशमुख आणि गावकरी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी लढत आहेत.