धाराशिवमध्ये मनोज जरांगे यांनी ‘असे’ जपले धार्मिक सौहार्द

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 1 Months ago
मनोज जरांगे
मनोज जरांगे

 

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे. आंदोलनाच्या  पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या उपस्थितीत नुकतीच   धारशिव येथे शांतता रॅली काढण्यात आली. त्यात  भगव्या पताका आणि बॅनर घेऊन समर्थक  मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रॅली दरम्यानच जरांगे यांनी शहरातील प्रसिद्ध  हजरत शमशुद्दीन गाझी दर्गाला भेट दिली आणि दर्गावर चादर चढवली. यावेळी उपस्थित मुस्लिम बांधवांनी त्यांचे स्वागत केले. विशेष बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक या दर्गाला भेट देऊन इथे चादर अर्पण केली होती. 

मनोज जरांगे पाटील  यांच्या या भेटीचे सर्वत्र स्वागत होत आहे. ध्रुवीकरणाच्या काळात जरांगे यांची ही कृती दोन्ही धर्मियांमधील सौहार्द वाढवणारी ठरली आहे. मुस्लीम समाज आणि मनोज जरांगे या दोहोंमध्ये असलेली प्रेम, आपुलकी आणि सौहार्दाचे दर्शन महाराष्ट्राला वेळोवेळी झाले आहे. 
  
मुस्लीम समाजाचा जरांगेंना कायमच पाठींबा  
मराठा समाजासह मुस्लिम आरक्षणाचा प्रश्नही अजून प्रलंबित आहे. आण्णासाहेब पाटील यांच्या नंतर मनोज जरांगे यांच्या रूपाने मराठा समाजाला सक्षम नेतृत्व मिळल्याच दिसत आहे. जरांगे यांच्या मराठा  आरक्षणाच्या लढ्यात मुस्लीम समाजाने मराठा समाजाला नेहमीच भक्कम साथ दिली आहे. विविध आंदोलनात मुस्लिम समाजाचा मोठा सहभाग असतो. आंदोलनकर्त्यांची ते निस्वार्थपणे ‘खिदमत’ (सेवा) करत असल्याचे चित्र वेळोवेळी पाहायला मिळाले.  इतकेच नव्हे तर जरांगे यांच्या उपोषणात अनेक मुस्लीम वेळोवेळी सहभागीही झाले आहेत. त्याबद्दल  मनोज जरांगे यांनी वेळोवेळी मुस्लिम समाजाचे आभारदेखील मानले आहेत. 

जरांगेही वेळोवेळी घेतली मुस्लीम समजाच्या समर्थनार्थ भूमिका  
१० वर्षांपूर्वी दिलेले ५ टक्के आरक्षण पुन्हा सुरू करण्याची मागणी मुस्लिम समाजाकडून सातत्याने होत आहे. परंतु अद्याप त्यावर काही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, मुस्लिम समाजातही आरक्षणाचा विषय प्रलंबित आहे. त्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन मनोज जरांगे पाटील यांनी दिले होते.

त्यामुळेच, ‘मराठ्यांना त्यांचे हक्क मिळाल्यावर मुस्लिम आणि धनगरांनाही त्यांचे आरक्षण कसे मिळत नाही ते मी बघेन’ असा इशारा मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. राज्यात काही ठिकाणी मुस्लीम समाजाच्याही कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे आता मुस्लिमांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली होती. .”

त्यामुळेच मनोज जरांगे यांनी हजरत शमशुद्दीन गाझी यांच्या दर्गाला दिलेली भेट राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाची असून जरांगे आणि मुस्लीम समाज यांच्यातील ऋणानुबंध आणखी घट्ट करणारी आहे. 
  
कोण होते हजरत शमशुद्दीन गाझी?
हजरत सय्यद शमुद्दीन गाझी उस्मानाबाद हे चिश्ती परंपरेतील  १२व्या शतकातील सुफी संत होते. उस्मानाबाद येथे शिकवण्यासाठी आणि उपदेश करण्यासाठी पाठवण्यापूर्वी त्यांनी दिल्लीतील हजरत निजामुद्दीन औलिया यांच्या दरबारात पाच वर्षे सेवा केली. त्यानंतर  ते उस्मानाबाद येथे स्थायिक झाले. तहहयात त्यांनी स्थानिकांची सेवासुश्रुषा केली. त्यांच्या निस्वार्थी सेवेमुळे आणि अध्यात्मिक प्रभावामुळे त्यांची ख्याती सर्वत्र पसरली. 



'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter