“सध्याच्या डिजिटल युगात सोशल मिडीया हे संवादाचे प्रभावी माध्यम बनले आहे. मात्र, या माध्यमाचा उपयोग समाज घडवण्यासाठी झाला पाहिजे. बऱ्याचदा अफवा, खोट्या बातम्या किंवा द्वेषपूर्ण पोस्ट्सद्वारे दोन जाती, धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. आपण सर्वांनी जबाबदारीने वागून अशा गोष्टींना थांबवून सोशल मिडीयाचा प्रत्येकाने जबाबदारीपूर्वक वापर करावा,” असे आवाहन येथील पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी केले.
रमजान ईद व गुढीपाडवा या सणांच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलताना त्यांनी आवाहन केले. रामेश्वर मोताळे यावेळी बोलताना म्हणाले की, “सोशल मिडीयाच्या काळात सामाजिक एकोपा अत्यंत महत्वाचा असतो. दुसऱ्या समाजाचा अनादर होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. सण, उत्सव साजरे करताना नकारात्मक विचार न करता नियमांचे भान ठेवून शांततेत व उत्साहात सर्व सण, उत्सव साजरे करावेत.”
दरम्यान, शांतता समितीच्या बैठकीत रमजान ईद तसेच विविध सणांसाठी ईदगाह मैदान परिसराची व इतर भागाची स्वच्छता करावी. शहरातील प्रमुख रस्त्यांवर रहदारीला अडथळा ठरणार नाही. यासाठी सुरळीत रहदारीसाठी योग्य प्रयत्न करावेत, अशा सूचना मांडण्यात आल्या. बैठकीला माजी नगरसेवक डॉ. इमरान शेख, डॉ. दानिश शेख, भाजपचे माजी शहराध्यक्ष अनंता नेहेते, पोलिस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद, विनोद गाभणे व्यासपीठावर उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष पी. के. चौधरी, अंबिका दूध संस्थेचे संचालक पप्पू चौधरी, अबूबकर शेख, कौसर सय्यद, माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे यांनीही मनोगत व्यक्त केले.
धुळेकरांना उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे आवाहन
“हिंदु-मुस्लिम दु-मुस्लिम बांधवांनी कुठलाही सण साजरा करताना एकोपा ठेवावा. सर्वांनी कायदा, सुव्यवस्था राखत येणारे सण-उत्सव साजरे करावेत. सर्व समाज बांधवांनी सोशल मीडियावर व्हायरल मेसेज, व्हिडिओकडे दुर्लक्ष करावे आणि त्यात काही आक्षेपार्ह आढळल्यास याबाबत पोलिसांना कळवावे,” असे प्रतिपादन पोलीस उपविभागीय अधिकारी दर्शन दुग्गड यांनी केले.
तळोदा पोलिस ठाण्याच्या वतीने शनिवारी (ता. २२) रात्री इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना दुग्गड यांनी प्रतिपादन केले. प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू लोखंडे, मौलाना शोएब रजा नुराणी, अमोनोद्दीन शेख, निसार मक्राणी, अक्रम पिंजारी, कलीम अन्सारी, आरिफ नुरा, युनुस अन्सारी, शेख उमराव हाजी सरदार, रझाक पठाण, रौफ अन्सारी, अॅड. मेहमूद, सुलतान शेख, उशीर मिस्त्री, मुस्ताक शेख आदी उपस्थित होते.
निसार मक्राणी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “चांगल्या दृष्टिकोनातून बघितले तर कोणीच वाईट दिसत नाही. मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमाजन निमित्ताने होणारी इफ्तार पार्टी म्हणजे हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे. रमजान महिना मुस्लिम समाज बांधवांसाठी महत्वपूर्ण सण आहे. या महिन्यात दान करण्याची पद्धत असून, दान केल्याने माणसाला आत्मिक बल व समाधान मिळते.”
मालेगाव ग्रामीण पोलिसांचा इशारा
“अलीकडे सोशल मीडियाचा दुरुपयोग केला जात आहे. यात तरुणाई प्रामुख्याने अडकत आहे. समाजात तेढ निर्माण करणारे मेसेज पाठवू नका. सायबर पोलिस प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून आहेत, सोशल मीडियावर आलेल्या मेसेजची शहानिशा करा. कायदा मोडणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करून कारवाई करणार,” असा इशारा ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी नागरिकांना दिला आहे.
पोलिस नियंत्रण कक्षात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत देशमाने यांनी इशारा दिला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, “आगामी काळात रमजान ईद, गुढीपाडवा, चैत्रोत्सव यात्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सण-उत्सव साजरे होणार आहेत. सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख पोलिस बंदोबस्त असेल, प्रत्येक बारीक घटनेवर पोलिस नजर ठेवून असतील, सोशल मीडियावर चुकीचे मेसेज पाठवणाऱ्या तरुणांवर वर्षभरात गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे तरुणांच्या नोकरीचा प्रश्न देखील उद्भवतो, तरुणांनी यात न पड़ता शिक्षणाकडे लक्ष द्यावे. समाजात तेढ निर्माण करणारे व चुकीचे मेसेज व्हायरल होऊ नयेत यासाठी व्हाट्सअॅप एडमिनला नोटीस दिली जाणार आहे.”
यावेळी उपस्थित असलेले अॅड. निहाल लोधी म्हणाले की, “ईदगाह मैदानाची स्वच्छता करून सर्व ईदगाह मैदानावर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. शहरात ड्रग्स इंस्पेक्टर नाही, त्यामुळे येथे भेसळयुक्त दूध, मिठाई, व मुदत संपलेले खाद्यपदार्थाची विक्री होते. लोकसंख्येच्या तुलनेने येथे पोलिसांची संख्या कमी आहे.”
यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, सहायक पोलिस अधीक्षक सूरज गुंजाळ, तहसीलदार विशाल सोनवणे, अग्निशमन दलाचे अधिकारी संजय पवार, शांतता समिती सदस्य केवल हिरे, प्रमोद शुक्ला, कैलास तिसणे, रमजानपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर, आयेशानगरचे प्रशांत अहिर, शहर पोलिस ठाण्याचे प्रशांतसिंग चहुरे आदींसह विविध विभागाचे अधिकारी, शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.