मोफत सेहरी वाटून रोजेदार आणि गरजूंची खिदमत करणारे हात

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 10 d ago
महाराष्ट्रभरात मोफत सेहरी वाटणारे विविध स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते
महाराष्ट्रभरात मोफत सेहरी वाटणारे विविध स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते

 

सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे. अगदी आबालवृद्धांपासून सगळेच या महिन्यात मोठय़ा उत्साहाने रोजा (उपवास) धरतात. सुर्योदयापूर्वी न्याहारी केली जाते त्याला ‘सेहरी’ म्हणतात. त्यानंतर थेट सूर्यास्तापर्यंत खाणे-पिणे वर्ज्य असते. थेट संध्याकाळी खजूराचा पहिला घास घेत उपवास सोडला जातो, ज्याला ‘इफ्तार’ करणे असे म्हटले जाते.

रोजा सोडल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच संध्याकाळची नमाज असते. त्यानंतर पाऊण-एक तासांनी दिवसभरातील शेवटची म्हणजे ईशाची नमाज झाल्यावर रमजानमध्ये तरावीहची विशेष नमाज असते. जी साधारण तासभर चालते. त्यामुळे उपवास सोडल्यानंतर निवांत जेवायची उसंत नसते. म्हणूनच वेळेत इफ्तार करणे गरजेचे असते. 

रमजानच्या महिन्यात रोजामुळे खाण्यापिण्याच्या वेळा अगदी काटेकोरपणे पाळल्या जातात. अशावेळी कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी बाहेरगावी असणाऱ्या रोजेदारांची गैरसोय होते. हीच अडचण ओळखून महाराष्ट्रातील काही संस्था रमजान काळात मोफत सेहरी आणि इफ्तारचा उपक्रम राबवतात. आजच्या विशेष लेखातून जाणून घेऊयात राज्यभरातील अशा महत्त्वाच्या संस्थांच्या नेक कार्याविषयी… 

रमजान फाउंडेशन -  परळी वैजनाथ
परळी वैजनाथ येथील रमजान फाउंडेशन ही संस्था गेल्या २ वर्षांपासून मोफत सेहरीचे आयोजन करत आहे. या संस्थेचे कार्यकर्ते वर्षभर पैसे साठवून रमजानच्या महिन्यात महिनाभर मोफत सेहरी देतात. ४० ते ५० जणांची ही संस्था परळी वैजनाथच्या रेल्वे स्थानकावरील रोजेदार आणि गरजूंना सेहरीचे डबे पुरवते. 

विशेष म्हणजे संस्थेतील कार्यकर्तेच स्वतःच्या हाताने सेहरीचे हे जेवण बनवतात. तर महिला त्यांना भाज्या निवडणे, कणिक मळून देणे यासारखी लहानमोठी मदत करतात. ही सर्व मंडळी दिवसभर या सेहरीच्या तयारीसाठी लागलेली असतात. जेवण तयार झाल्यानंतर रात्री ९ वाजता हे सर्व डबे घेऊन कार्यकर्ते परळी रेल्वे स्थानकावर पोहोचतात. फ्री सेहरी… फ्री सेहरी… म्हणत रोजेदार आणि गरजुंपर्यंत हे जेवण पोहोचवले जाते. ही त्यांची धावपळ सेहरीची वेळ संपेपर्यंत सुरू असते. 

या उपक्रमाची वाखणण्याजोगी बाब म्हणजे, फक्त मुस्लिमांसाठी नाही तर इतरही समाजातील गरजूंना ही सेहरी मोफत दिली जाते. या सेहरीच्या डब्यात २ चपात्या, भाजी, २ केळी आणि पाण्याची बॉटल असते. या सेहरीचा लाभ अधिकाधिक लोकांना घेता यावा यासाठी रमजान येण्याआधीच उपक्रमाचे बॅनर शहरभर लावण्यात येतात. दररोज २५० ते ३०० लोकांपर्यंत हे डबे पोहोचत असल्याची माहिती संस्थेचे कार्यकर्ते सय्यद वकार यांनी दिली. 

या उपक्रमाच्या संकल्पनेविषयी बोलताना सय्यद वकार म्हणाले, “रमजानच्या काळात आम्ही एकदा रेल्वे स्थानकावर होतो. त्यावेळी तिथलं कँटिन बंद होतं. मग काही प्रवाशांनी आम्हाला जवळपासच्या हॉटेलबद्दल विचारलं. परंतु इतक्या पहाटे कुठलं हॉटेल सुरु असणार? मग त्यानंतर आम्ही ठरवलं, किमान रमजानच्या काळात तरी आपण अन्नदान करून रोजेदारांची खिदमत करावी.” 

ते पुढे म्हणाले, “सुरुवातीला आम्हाला या उपक्रमाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु मग आम्ही जाहिरातीच्या  माध्यमातून  अधिकाधिक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवली. या उपक्रमाचा उद्देश केवळ लोकांना जेवण उपलब्ध करून देणे हा नसून समाजाप्रति कर्तव्य निभावणे आहे. आमचा धर्म याविषयी आग्रही आहे.”

कादरिया वेल्फेअर सोसायटी - पुणे 
जुन्नर तालुक्यातील कादरिया वेल्फेअर सोसायटी ही संस्था गेल्या २० वर्षांपासून पुणे शहरात रमजानच्या निमित्ताने मोफत सेहरी वाटते. सोबतच जुन्नर शहरात पोलिसांच्या विशेष उपस्थितीत इफ्तारचे आयोजन देखील करते. हे इफ्तार केवळ मुस्लिमांसाठी नसून त्या भागातील गणेश मंडळे आणि इतर सामाजिक संस्थांसाठी देखील असते. संस्थेचे अध्यक्ष रऊफ खान यांनी त्याला ‘सौहार्दाचा इफ्तार’ असे म्हटले आहे. 
 

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात बाहेरून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. रमजानच्या काळात घराबाहेर राहणाऱ्या या विद्यार्थ्यांची पहाटेच्या सेहरीची गैरसोय होते. मग अशा विद्यार्थ्यांना सेहरीचा डबा पुरवण्याचे काम रऊफ खान यांची संस्था करते. या डब्यात खजूर, सरबत आणि वेगवेगळी फळे असतात. पुण्यातील वाकड, बालेवाडी, वारजे माळवाडी आणि पेठांमधील भागांमध्ये दिवसाला ६०हून अधिक डबे पुरवले जातात.   

याविषयी बोलताना रऊफ खान म्हणाले, “माणुसकीच्या भावनेने मी ही खिदमत करतो. गरजूंना मदत करणे आणि भुकेलेल्या अन्न देणे यापेक्षा मोठं पुण्य जगात नाही. त्यामुळे मी हा उपक्रम हाती घेतला. मी केवळ माणुसकी हा धर्म मानतो, त्यामुळे माझ्या संस्थेच्या मार्फत मी इतरही समाजासाठी, विशेषतः महिला वर्गासाठी अनेक उपक्रम राबवतो.”

ख़िदमत ए ख़ल्क़ फाउंडेशन - उस्मानाबाद 
ख़िदमत ए ख़ल्क़ ही संस्था महाराष्ट्रभर कार्यरत आहे. या संस्थेमार्फत गेल्या ८ वर्षांपासून मोफत सेहरी दिली जाते. या उपक्रमाचे वैशिष्ट्य असे की, ही सेहरी खाणारा तर तृप्त होतोच परंतु सेहरी बनवणारे हात देखील संतुष्ट होतात. कारण ही संस्था गरजू कुटुंबाला दरवर्षी सेहरी बनवण्याचे काम देत असते. 

हा उपक्रम महाराष्ट्रातील उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड, लातूर, परळी आणि मोमिनाबाद या शहरांमध्ये राबवला जातो.शहरांमधील दवाखाने, मदरसा आणि मस्जिदींमध्ये येणाऱ्या लोकांच्या सेहरी आणि इफ्तारची सोय ही संस्था महिनाभर करते. विशेषतः दवाखान्यांमधील रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना याचा मोठा लाभ होतो. याविषयीच्या जाहिरातीचे फलक दवाखान्यांच्या भिंतींवर लावले जातात. 

या उपक्रमासाठी लागणारे संपूर्ण भांडवल संस्थेचे कार्यकर्ते स्वतःच्या खर्चातून उभे करतात. संस्थेमार्फत दररोजचे ६० डबे गरजूंपर्यंत पोहोचवले जातात.  या डब्यांमध्ये ३ चपात्या, २ भाज्या, भात आणि पाण्याची बॉटल असते. 

या संस्थेचे उस्मानाबाद शहराचे कार्यकर्ते सय्यद झाकीर सांगतात की, “रमजानच्या पाक महिन्यात हे कार्य करून आम्हाला लोकांची दुआ मिळते. केवळ रोजेदारचं नाही तर सेहरी बनवणारे हात सुद्धा आम्हाला दुआ देतात. आम्ही जाणीवपूर्वकच गरजूंना जेवण बनवण्याचं काम देतो म्हणजे त्यांचा सुद्धा रमजानचा महिना आनंदी जावा.” 

ते पुढे म्हणतात, “आम्ही डबे दिलेले मुसाफिरसुद्धा या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करतात. मागील वर्षी तर शहराचे पोलीस अधीक्षक शकील यांनी आमच्या कामाची प्रशंसा करत आम्हाला मदतही केली होती. आमचं काम असंच आणखी मोठ्या प्रमाणात चालावं हीच अल्लाकडे आमची मागणी आहे.”  

अल-हैदरी चॅरिटेबल ट्रस्ट - पुणे 
पुण्यातील अल हैदरी चैरिटेबल ट्रस्ट आणि अहलेबैत हेल्पलाइन या संस्था गेल्या ८ वर्षांपासून मोफत सेहरी आणि इफ्तारचे आयोजन करत आहेत. दररोज त्यांच्याकडून जवळपास ४०० रोजेदारांना डबे पुरवले जातात. शहरात शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी, कामगार वर्ग, उपचार घेण्यासाठी बाहेरून आलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना या उपक्रमाचा उपयोग होतो. 

या संस्थेचे २० कार्यकर्ते पूर्णवेळ या उपक्रमासाठी राबत असतात. शहरातील पेठ परिसर, कोंढवा, कोथरूड, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, पुणे विद्यापीठ परिसर, विमाननगर, येरवडा अशा शहराच्या चारही ठिकाणांहून या डब्यांना विशेष मागणी आहे. रात्री अकरा वाजेपासून जेवण बनवण्याचे काम सुरु होते ते थेट पहाटे  ३ वाजेपर्यंत चालते. संपूर्ण काम पूर्ण होते. पहाटे ३-३० ते ५ वाजेपर्यंत शहराच्या विविध भागांत सेहरीचे वाटप केले जाते.  
 
  
या उपक्रमाविषयी बोलताना अल-हैदरी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव खिसाल जाफरी म्हणाले, “इस्लाममध्ये रमजानच्या या पवित्र महिन्याचे मोठे महत्व आहे.या काळात जनसेवेवर विशेष भर दिला जातो. याच पार्श्वभूमीवर आपल्या हातून काहीतरी चांगले काम घडावे म्हणून आम्ही हा उपक्रम सुरु केला. या महिन्यात आम्ही जेवढं सामाजिक दायित्व करू तेवढे पुण्य आम्हाला मिळणार आहे. ”

ते पुढे म्हणाले, “आम्ही या उपक्रमाला सुरुवात केली तेव्हा कमी प्रतिसाद मिळाला. मात्र आता डब्यांची मागणी आणि कामाचा आवाका वाढला आहे. पहाटेच्या वेळी हॉटेल्स बंद असल्याने इफ्तारपेक्षा सेहरीला जास्त मागणी असते. आमच्याकडे कर्मचारी आणि वेळ मर्यादित आहेत. त्यामुळे आम्हाला आणखी लोकांपर्यंत पोहचता येत नाही. माझे समाजाला एवढंच सांगणं आहे की आपण  सर्वांनी एकत्र येत असे उपक्रम राबवले तर कित्येक गरजवंतांना मदत मिळू शकेल.”

एहसास फाउंडेशन - उस्मानाबाद 
उस्मानाबादमधील एहसास फाउंडेशन ही संस्था गेल्या ६ वर्षांपासून सेहरीचे मोफत वाटप करत आहे. कळंब गावातील तरुण एकत्र येऊन शहरात हा उपक्रम राबवतात. आपला उपक्रम पोचवण्यासाठी त्यांनी सोशल मिडीयाचा चांगला उपयोग केला आहे. आपल्या पोस्टरवर संस्थेने खूप सुंदर वाक्य लिहिले आहे. ‘करो मेहरबानी तुम अहले जमीं पर, खुदा महरबान होगा अर्शे बरी पर’ हाच संदेश घेऊन ही संस्था कार्यरत आहे. 
 

सेहरीचा हा स्वयंपाक गरजू महिलांकडून करून घेतला जातो. त्यांना मोबदला तर मिळतोच शिवाय सत्कार्यात हातभार लागल्याचे समाधानही मिळते. संस्थापक अमीन म्हणाले, “एहसास फाउंडेशन आणि त्यासोबत जोडली गेलेली प्रत्येक व्यक्ती अतिशय निस्वार्थपणे या कामात सहभागी होते. आपण खुश आहोत याचा अर्थ सर्वच जण खुश आहेत असं नाही. गरजूंना मदत हे उपकार नसून आपला फर्ज आहे, याची जाणीव कायम असायला हवी.”

याशिवाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक छोट्या मोठ्या संस्था कार्यरत आहेत. जसे की, 

१) मदनी चॅरिटेबल ट्रस्ट - सांगली 
सांगलीतील मदनी चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था गेल्या ९ वर्षांपासून गरजूंना मोफत सेहरीचे वाटप करत आहे. शहरात शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी आणि दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे. 

या उपक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवी याकरिता संस्थेच्या कार्यकर्त्यांनी उपक्रमाचे  पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. गरजूंनी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत संपर्क केल्यास ते घरपोच डबे मिळणार आहेत. 

२) स्काय ग्रुप - अमरावती 
अमरावती शहरातील काही तरुणांनी एकत्र येत स्काय ग्रुपच्या माध्यमातून मोफत सेहरीचे वाटप करण्याचे ठरवले. या सेहरीचा लाभ अधिकाधिक लोकांना घेता यावा याकरिता त्यांनी आपल्या सोशल मीडियावरून उपक्रमाचे पोस्टर टाकण्यात आले आहे. त्या पोस्टरमध्ये त्यांनी संपर्क क्रमांक देऊन 'मुस्कुराते हुए कॉल करे' अशा सुंदर पद्धतीने आवाहन केले आहे.   

३) सहरी इंतजाम कमिटी - कुपवाड 
कुपवाड येथील सहरी इंतजाम कमिटी मागील वर्षीपासून शहरात खास सेहरीचे आयोजन करत आहे. कामानिमित्त घराबाहेर असलेले नागरिक, शालेय विद्यार्थी आणि रुग्ण यांच्यासाठी विशेषता संस्था हा उपक्रम राबवत आहे. याविषयी जाहीर केलेल्या पोस्टरमध्ये त्यांनी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतची संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 

४) फातिमाआजिज फाउंडेशन - औरंगाबाद 
औरंगाबाद शहरात कार्यरत असलेली ही संस्था हॉस्पिटलमधील रुग्णांना आणि वसतिगृहात राहणाऱ्या मुलींना मोफत सेहरीची डबे पुरवत आहे. शहरातील चिकलठाणा आणि जालना रस्ता परिसरातील सर्व रुग्णालयांमध्ये हे डबे पुरवले जात आहे.

या आणि अशा अनेक मुस्लीम संस्था रमजानच्या पवित्र महिन्यात सेहरी आणि इफ्तारचे मोफत वाटप करत असतात. रोजेदारांसह इतर धर्मातील गरजू लोकांना सुद्धा ते डब्यांचे मोफत वाटप या पवित्र महिन्यात करतात. अशा कार्यातून पुण्य मिळवणे या धार्मिक संकल्पनेसोबत सर्व धर्मियांप्रति माणुसकी जपण्याचे काम देखील ते करतात. त्यांच्या या कामाला आवाज मराठीचा सलाम. 

- भक्ती चाळक
([email protected])

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter