रतन टाटांच्या पुढाकाराने असे झाले मदरसा शिक्षणाचे आधुनिकीकरण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 4 d ago
मदरशात शिक्षण घेणारे विद्यार्थी
मदरशात शिक्षण घेणारे विद्यार्थी

 

रतन टाटांनी आपल्या आयुष्यात केवळ व्यवसायातच मोठे यश मिळवले असे नाही, तर समाजसुधारणेच्या क्षेत्रातही त्यांनी आपला ठसा उमटवला. मात्र विषयी अनेकांना फारशी माहिती उपलब्ध नाही. विशेषतः, मदरसा शिक्षणात सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. २००६मध्ये आलेल्या सच्चर समितीच्या अहवालातून मुस्लीम समाजाची विदारक सामाजिक स्थिती समोर आल्यानंतर संवेदनशील मनाच्या रतन टाटांनी हा निर्णय घेतला. 
  
सच्चर समितीच्या अहवालात मुसलमानांच्या शैक्षणिक स्थितीविषयी गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली होती. याची दखल घेत रतन टाटांनी 'टाटा मदरसा ट्रस्ट'ची स्थापना केली होती. जो आजही देशाच्या अनेक भागांत मदरसा शिक्षण सुधारण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे.

सच्चर समितीच्या अहवालातून समोर आले शिक्षणाचे वास्तव
२००६च्या सच्चर समितीच्या अहवालाने देशातील सर्वात मोठ्या अल्पसंख्याक समुदाय असलेल्या मुसलमानांच्या विदारक शैक्षणिक स्थितीवर प्रकाश टाकला. या अहवालात म्हटले होते की, मुसलमानांचा साक्षरता दर केवळ ५९.१% आहे आणि ६ ते १४ या वयोगटातील जवळपास एक चतुर्थांश मुले शाळेबाहेरच होती.

मॅट्रिक पास होणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्यांचे प्रमाणही केवळ २३.९% होते, जे देशाच्या सरासरी ४२.५% पेक्षा खूप कमी होते. या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर, रतन टाटांनी मदरसा शिक्षणात सुधारणा करण्याची व्यापक योजना आखली. या योजनेमुळे त्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहातील शिक्षणाशी जोडण्यात यश आले. 

मदरसा सुधारणा कार्यक्रमाची सुरुवात
टाटा ट्रस्टने 'मदरसा सुधारणा कार्यक्रम' अंतर्गत गरीब आणि मागासवर्गातील मुले असणाऱ्या मदरशांवर लक्ष केंद्रित केले. मदरशातील मुलांना धार्मिक शिक्षणाबरोबरच गणित, विज्ञान आणि इतर आधुनिक विषयांचे शिक्षण देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. यासाठी ट्रस्टने आधुनिक शिक्षण पद्धतीसोबतच इंटरअ‍ॅक्टिव्ह  शिक्षण आणि तंत्रज्ञानाचाही वापर केला.
 
 
आधुनिक शिक्षण पद्धतींचा समावेश 
टाटा ट्रस्टने सर्वप्रथम मदरसा शिक्षकांना प्रशिक्षण दिले. त्यामुळे मुलांना बाल-केंद्रित आणि सर्वसमावेशक आधुनिक शिक्षण पद्धतीद्वारे शिक्षण देण्यात ते सक्षम झाले. याचबरोबर  गणित, विज्ञान आणि इतर विषयांमध्ये मुलांची रुची वाढवण्यासाठी रोचक पद्धतींचा वापर करण्यावर ट्रस्टने जोर दिला. संवादात्मक आणि सर्जनशील पद्धतींने मुलांना कसे शिकवावे याचे शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आले.

मदरसा मॉडेलचा विस्तार
टाटा ट्रस्टने विविध राज्यांतील मदरशांमध्ये सुधारणा करण्यासाठी व्यापक प्रमाणात कार्य केले. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये मदरसा सुधारणा उपक्रमाचा विस्तार केला. या अंतर्गत मदरशांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडले गेले आणि विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट-आधारित शिक्षणाच्या माध्यमातून नवीन माहिती दिली गेली.  विद्यार्थ्यांचे ज्ञान आणखी समृद्ध  करण्यासाठी त्यांना इंटरनेटचा वापर शिकवण्यात आला. 

उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये सुधारणा प्रयोग
देशात सर्वाधिक मदरसे उत्तर प्रदेश येथे आहेत. त्यामुळे या राज्यात टाटा ट्रस्टने एक मोठा प्रयोग केला. वाराणसी आणि जौनपूर येथील ५० मदरशांमधील सुमारे १० हजार विद्यार्थ्यांना त्यांनी या उपक्रमात सहभागी करून घेतले.  मदरशांना शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आणि आधुनिक बनवणे, आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांना नियमित शाळांमध्ये येण्यासाठी प्रवृत्त करणे हा या उपक्रमामागचा हेतू होता. या उपक्रमाद्वारे मदरशांसारख्या संस्थांना आधुनिक बनवण्याला प्राधान्य दिले गेले आणि मदरसा विद्यार्थ्यांना नियमित शाळांमध्ये जाण्यासाठी प्रेरित करण्यात आले. सोबतच त्यांना पारंपारिक ज्ञानासोबतच आधुनिक अभ्यासक्रम आणि शिक्षण पद्धतींची माहिती देण्यावरही भर देण्यात आला.

या उपक्रमात ट्रस्टसोबत वाराणसीतील पीपल्स विजिलन्स कमिटी ऑन ह्युमन राइट्स आणि जौनपूरमधील आझाद शिक्षा केंद्र या दोन स्थानिक स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग होता. याशिवाय, निवडलेल्या मदरशांच्या व्यवस्थापन समित्याही सहभागी होत्या. त्यात जौनपूरमधील ३० तर वाराणसीतील २० मदरशांचा समावेश आहे. त्यासोबतच शिक्षक आणि स्थानिकांनाही या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले.

उपक्रमाचा पहिला टप्पा सच्चर समितीचा अहवाल आल्यानंतर लगेचच सुरू करण्यात आला होता. यामध्ये शिक्षणात सुधारणा घडवण्यासाठी मदरशांबरोबर सरकारी शाळांचीही निवड करण्यात आली होती. २००८ नंतर ट्रस्टने या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संसाधनांमध्ये वाढ करत या उपक्रमाचा विस्तार केला.

लाखो विद्यार्थांना मिळाला लाभ
२०१३ ते २०१८ च्या दरम्यान मदरसा सुधारणा कार्यक्रम (MIP) बिहार आणि झारखंडमधील मदरशांपर्यंत विस्तारला गेला. त्यामुळे हा उपक्रम तीन राज्यांतील ४५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला. आतापर्यंत सुमारे एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळाला, ज्यामध्ये  मुलींचे प्रमाण अधिक आहे.

 
तिघरा गावाचे आदर्श उदाहरण
उत्तर प्रदेशच्या तिघरा गावातील मदरसा जमिया दारुल-उल-उलूम हनफिया हे टाटांच्या मदरसा सुधारणा कार्यक्रमाचे आदर्श उदाहरण म्हणता येईल. या मदरशात शिक्षण घेणाऱ्या ११९ विद्यार्थ्यांपैकी ५० विद्यार्थी हिंदू आहेत. या सुधारणेची फळे त्यांनाही चाखता आली. त्यामुळे 'टाटा मदरसा ट्रस्ट'च्या या उपक्रमातून धार्मिक ऐक्याच्या दिशेने मोठे पाऊलही पडले. 

शेतकऱ्याचा मुलगा असणाऱ्या १४ वर्षीय विष्णू प्रजापतीने या मदरशातून उर्दूत प्राविण्य मिळवलेला सर्वोत्तम विद्यार्थी हा खिताब जिंकला. विष्णू पूर्वी सरकारी शाळेत शिकत होता, परंतु तेथील शिक्षणावर नाराज होऊन त्याच्या वडिलांनी त्याला मदरशात प्रवेश घेऊन दिला. तेथील आधुनिक शिक्षणाचा त्याला मोठा फायदा झाला. त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्वात आणि दृष्टीकोनात मोठा बदल झाल्याचे त्याचे वडील सांगतात.

साम्प्रदायिक सौहार्दाचा संदेश
या मदरसा सुधारणा कार्यक्रमाचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे याने केवळ शिक्षणाचा दर्जा उंचावला नाही, तर समाजात एकता आणि धार्मिक सौहार्ददेखील वाढवले. तिघरा गावाच्या मदरशात हिंदू आणि मुस्लिम समुदायातील मुले एकत्र शिकतात. त्यामुळे साहजिकच एकमेकांविषयी प्रेम आणि बंधुभाव निर्माण झालाय. 

'टाटा मदरसा ट्रस्ट'च्या सुधारणा कार्यक्रमाचे फलित
टाटा ट्रस्टने आतापर्यंत सुमारे ४०० मदरशांना या योजने समाविष्ट केले आहे. त्यापैकी ७५ मदरसे 'मॉडेल मदरसा' म्हणून विकसित करण्यात आले आहेत. ट्रस्टने विविध स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन मदरशांमधील मुलांना गुणवत्तापूर्ण आधुनिक शिक्षण देण्याचा यशस्वी प्रयत्न या माध्यमातून केला. या प्रयत्नांमुळे मदरशात शिक्षण घेणारी लाखो मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाशी जोडली जात आहेत. यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यात मोठी मदतच होत आहे.  

योग्य दिशा आणि प्रयत्नांद्वारे धार्मिक आणि आधुनिक शिक्षणाचे सुंदर मिलाफ साधता येतो, त्यातून विद्यार्थ्यांची प्रगतीही होऊ शकते, आणि त्यातून समाजात सकारात्मक संदेशही जातो हे या पथदर्शी उपक्रमाने सिद्ध करून दाखवले आहे.

- मलिक असगर हाशमी
(लेखक आवाज - द व्हॉइस हिंदीचे संपादक आहेत.)
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter