कोटा शहरातील उत्सव-ए-शादी.
कोटा शहरात नुकत्याच पार पडलेल्या एका अनोख्या विवाहसोहळ्याची सध्या देशभरात चर्चा आहे. देशभरातून नवदांपत्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भूमिकेचे कौतुक होतय. त्याचे कारणही तितकेच खास आहे. कारण यावेळी एकाच मंडपात युनूस परवेझ अन्सारीचा निकाह आणि सौरभ चक्रवर्ती याचा शुभविवाह पार पडला. हे केवळ दोन जोडप्यांचे लग्न नव्हते, तर दोन्ही नवरदेवांच्या वडिलांच्या चाळीस वर्षांपासूनच्या मैत्रीचा हा उत्सव होता.
चाळीस वर्षांची मैत्री
अब्दुल राऊफ अन्सारी आणि विश्वजित चक्रवर्ती हे लहानपणापासूनचे मित्र. त्यांची मैत्री कोट्यातील मशिद गल्लीत सुरू झाली. तिथे ते शेजारी होते. त्यांनी एकमेकांचे सण साजरे केले. होळी असो की ईद, दोघे एकत्र असायचे. दोघांचे कुटुंबीयही एकमेकांमध्ये मिसळून गेली. कालांतराने त्यांनी प्रॉपर्टी व्यवसायात भागीदारी केली. जनकपुरी माळ रोडवर त्यांनी शेजारी घरे बांधली. धर्म वेगळे असूनही त्यांचे नाते सख्ख्या भावांपेक्षा अधिकचे होते.
एकाच मंडपात निकाह आणि शुभविवाह
17 एप्रिलला ईशा नमाजानंतर अब्दुल राऊफ अन्सारी यांचा मुलगा युनूस याचा फरहिन अन्सारीशी इस्लामी पद्धतीने निकाह झाला. तर दुसऱ्या दिवशी विश्वजित चक्रवर्ती यांचा चिरंजीव सौरभ याने श्रेष्ठा रायशी हिंदू रीतिरिवाजांनी विवाह केला. ही दोन्ही लग्ने एकाच मांडवात झाली. उपस्थित पै-पाहुण्यांसाठी हा सोहळा अनेक अर्थांनी संस्मरणीय ठरला.
व्हायरल झाली होती निमंत्रणपत्रिका
या लग्नाची निमंत्रणपत्रिकाही खास होती. तिला ‘उत्सव-ए-शादी’ असे नाव दिले होते. पत्रिकेत हिंदी आणि उर्दू शब्दांचा सुंदर संगम होता. एकाच पत्रिकेत दोन्ही लग्नांचा उल्लेख होता. ही पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. देशभरातून लोकांनी गंगा-जमनी संस्कृती आणि हिंदू-मुस्लीम सौहार्दाचे प्रतिक ठरणाऱ्या या आयोजनावर कौतुकाचा वर्षाव केला.
दोन्ही कुटुंबियांचे अनोखे यजमानपद
विश्वजित आणि मधू चक्रवर्ती यांनी युनूस-फरहिनच्या निकाहात पाहुण्यांचे स्वागत केले. तर अब्दुल राऊफ आणि अजिजान अन्सारी यांनी सौरभ-श्रेष्ठाच्या विवाहाचे यजमानपद स्वीकारले.
युनूस आणि सौरभ यांचे वडलांच्याच पावलावर पाऊल
युनूस आणि सौरभ या दोघांनी त्यांच्या वडिलांमधील मैत्री तितक्याच आस्थेने उत्साहाने पुढे नेली. इतकेच नव्हे तर तिला चार चांद लावले.
चक्रवर्ती कुटुंब मूळ बंगाली आहे. मात्र ते कोट्यात स्थायिक झाले. सौरभ औषध वितरणाचा व्यवसाय करतो. तर युनूस अन्सारी आयटी क्षेत्रात काम करतो. कौटुंबिक मैत्रीचे नवे पर्व गाठत दोघांनी एकाच मांडवात लग्ने करण्याचे ठरवले.
उत्सव-ए-शादी नंतर दावत-ए-खुशी
दोन सलग दिवशी निकाह आणि विवाह झाल्यानंतर 19 एप्रिलच्या रात्री कोट्यातील चंद्रेसल रोड, काला तलाव येथील आलिशान रिसॉर्टमध्ये दोन्ही परिवारांनी एकत्रितपणे ‘दावत-ए-खुशी’ या नावाने स्वागत समारंभाचे आयोजन केले.
यावेळी युनूस-फरहिन व सौरभ-श्रेष्ठा ही दोन्ही जोडपी एकाच मंचावर पाहुण्यांचे आशीर्वाद स्वीकारत होती. यावेळी उपस्थितांनी नवदांपत्यांवर प्रेमाचा वर्षाव केला. सर्वांनीच या अनोख्या सोहळ्याचे कौतुक केले. देशात हिंदू-मुस्लिमांनी या मैत्रीतून आदर्श घ्यावा असे प्रत्येक जण सांगत होता. यावेळी पारंपरिक पदार्थ, संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांमुळे उपस्थितांची संध्याकाळ अविस्मरणीय झाली.
धार्मिक सलोख्याचा दिला संदेश
अब्दुल राऊफ आणि विश्वजित यांनी आपल्या मुलांच्या लग्नातून जगाला अनोखा संदेश दिला. हा केवळ लग्नसोहळा नव्हता. तर हे निमित्त होते प्रेम, मैत्री आणि माणुसकी साजरी करण्याचे. सत्प्रवृत्ती असेल तर धर्म कधीही अडसर ठरत नाही, उलट आपापले धर्म पाळूनही सलोखा वाढवता येतो, हेच यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले.
हिंदू-मुस्लिम एकतेचे उदाहरण
एकाच मंडपात दोन भिन्न धार्मिक विधी निर्विघ्नपणे पार पडल्या. अन्सारी आणि चक्रवर्ती कुटुंबीयांच्या सलोख्यातून हिंदू-मुस्लिम सौहार्दाचे नवे उदारहण जगाला पाहायला मिळाले. ही उत्सव-ए-शादी कोट्याच्याच नव्हे तर देशाच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल यात शंका नाही!
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter