मुस्लिम बोर्डिंग : कोल्हापूरातील सामाजिक सलोख्याचे केंद्र

Story by  Bhakti Chalak | Published by  Saurabh Chandanshive • 1 Months ago
मुस्लिम बोर्डिंग, कोल्हापूर
मुस्लिम बोर्डिंग, कोल्हापूर

 

भक्ती चाळक

आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडीत आणि सामाजिक क्रांतीच्या वाटचालीत राजर्षी शाहू महाराजांचे कार्य महत्वाचे ठरले आहे. स्त्री शिक्षणाचे खंदे पुरस्कर्ते, अस्पृश्योद्धारक, मराठी रंगभूमीचे शिल्पकार, शास्त्रीय संगीताचे उत्साही रसिक, मल्ल विद्येचे प्रमूख आधारस्तंभ, एक लोकाभिमूख राजा, सामाजिक समतेचे पुरस्कर्ते अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेले राजर्षी शाहू महाराज यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान अनन्य साधारण आहे. 

सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक कार्याच्या माध्यमातून समाजाचा विकास हा ध्यास डोळ्यासमोर ठेवून शाहू महाराजांनी त्यावेळी घेतलेल्या भूमिका असामान्य आणि समाजहिताच्या ठरल्या. विशेषतः कोल्हापूर संस्थानातील वंचित घटकांच्या विकासासाठी त्यांनी केलेले कायदे आणि घेतलेले निर्णय क्रांतिकारी ठरले. 

 
शाहू महाराजांच्या 'बहुजन' या व्यापक संकल्पनेत दलित, वंचित, महिला यांचा समावेश होता तसाच मुस्लिमांचादेखील होता. मात्र कोल्हापूरमध्ये काही घटकांकडून हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याने छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या विचारधारेला आणि हिंदू मुस्लिम ऐक्याच्या परंपरेला गालबोट लागल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांचा इतिहास आणि मुस्लिम समाजासाठीचे त्यांचे कार्य पुन्हा प्रकाशझोतात आणण्याची गरज आहे. 

तो काळ होता १९०२ चा. शिक्षणाच्या बाबतीत मुस्लिम समाजात अनास्था असलेल्या काळात शाहू महाराज इंग्लंडचा दौरा करून परत आले होते. या गोष्टीचा आनंद व्यक्त करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला गेला. त्यावेळी कार्यक्रमात मुस्लिम समाजातील पुढाऱ्यांनी शैक्षणिक चळवळ उभारावी, संस्था स्थापन कराव्या, त्यास दरबारकडून पूर्ण साहाय्य मिळेल असे आश्वासन महाराजांकडून देण्यात आले.

महाराजांनी त्यावेळी केलेल्या त्या घोषणेला मुस्लीम पुढाऱ्यांच्याकडून म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नव्हता, परंतु महाराज शांत बसले नाहीत. शिक्षणासाठी इच्छुक मुस्लिम समाजातील १० विद्यार्थ्यांना कोल्हापुरात नुकत्याच स्थापन झालेल्या ‘विक्टोरिया मराठा बोर्डिंग’मध्ये प्रवेश देऊन त्यांनी मुस्लिमांच्या शिक्षणास सुरुवात करून दिली.

अशातच १९०६ मध्ये स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी मुस्लिम समाजातील पुढाऱ्यांना बोलवून शिक्षण प्रसारासाठी सोसायटी करण्याचा प्रस्ताव मांडला आणि त्याच वर्षी १५ नोव्हेंबरला 'किंग एडवर्ड मोहामेडन एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना केली. ब्रिटिशांच्या सत्तेचा अंमल असल्याने मुस्लिम समाजातील लोक पुढे येण्यास कचरत होते. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांनी आपल्याकडे पदसिद्ध अध्यक्षपद ठेवले.

आजही मुस्लिम बोर्डिंगचे छत्रपती घराण्यातील राजे पदसिद्ध अध्यक्ष, तर मुस्लिम समाजातील निवडून दिलेले चेअरमन व अन्य कार्यकारिणी कारभार पाहात आहे. सध्या मुस्लिम बोर्डिंगच्या चेअरमनपदी गणी आजरेकर हे विराजमान आहेत. राजर्षींनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आजही जातिपातींच्या पलीकडे जात हे बोर्डिंग सर्व समाजातील लोकांना आपलेच मानून त्यांच्या प्रत्येक सुखदु:खात कसे सहभागी होते याचे दाखले आजरेकर यांनी दिले. 

आवाज मराठी सोबत बोलताना आजरेकर म्हणाले, “कुठल्याही जातिधर्माचा नागरिक मुस्लिम बोर्डिंगकडे 'ही केवळ एकाच समाजाची संस्था नसून ही आमचीही मातृसंस्थाच आहे' या भावनेने संस्थेकडे पाहतो. समतेचे प्रतीक आणि कोल्हापूरचे वैचारिक केंद्र म्हणून मुस्लीम बोर्डिंगकडे पाहिजे जाते.”

 
ते पुढे म्हणतात, "समाजातील कोणताही घटक असो, आंदोलनासाठी त्याला दसरा चौकातील मुस्लीम बोर्डिंग हक्काचे ठिकाण वाटते. त्यामुळेच प्रश्न मराठा आरक्षणाचा असो किंवा लिंगायत आरक्षणाचा... मुस्लीम बोर्डिंगच्या आवारातच ही आंदोलने होतात."
 

राजर्षी शाहू महाराज यांच्या समाज कार्यातील सर्वात मोठा भाग हा त्यांच्या शैक्षणिक बदलांनी भरलेला आहे. महाराजांनी देशातील अनेक संस्थांना, वसतीगृहांना मदत आणि देणगी दिलेली होती. मुस्लिम बोर्डिंगच्या खर्चाची आर्थिक तरतुद व्हावी यासाठी इनाम दिलेल्या जमिनींच्या माध्यमातून ८०% रक्कम धार्मिक कार्यास तर उर्वरित २०% रक्कम शैक्षणिक कार्यात वापरण्याची तरतुद महाराजांनी करून ठेवली आहे.

मुस्लिम बोर्डिंगला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी महाराजांनी कोल्हापुरातील मस्जिद, कब्रस्थान यांतून येणाऱ्या उत्पन्नातून दर्ग्याचा दिवाबत्ती खर्च वजा जाऊन उर्वरित खर्च शिक्षणावर करण्याची तरतूद त्याच वेळी करून ठेवली आहे. तेव्हापासून चालत आलेली प्रथा आजही तशीच सुरु असल्याची माहिती बोर्डिंगचे विद्यमान चेअरमन आजरेकर यांनी दिली.

मुस्लिम बोर्डिंगच्या शैक्षणिक उपक्रमांविषयी माहिती देताना संस्थेचे चेअरमन आजरेकर म्हणतात, "१९६३ मध्ये बोर्डिंगमार्फत नेहरू हायस्कूलची स्थापना करण्यात आली. सुरुवातीला ५वी ते १०वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले, त्यानंतर १९९५ मध्ये ज्युनिअर कॉलेज कला शाखा तर २००९ मध्ये विज्ञान शाखेची स्थापना करण्यात आली. हातकणंगले तालुक्यातील शिरोली (पुलाची) येथे १९८८ मध्ये ८वी ते १०वी उर्दू माध्यमाचे हायस्कूल सुरु करण्यात आले. आज त्या दोन्ही शाळा व कॉलेजची उज्वल निकालाची परंपरा आहे. 

बोर्डिंगच्या शैक्षणिक उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना ते पुढे सांगतात, “२०११ मध्ये मुस्लिम बोर्डिंगने ५० विद्यार्थी क्षमता असलेल्या ग्रंथालयाची स्थापना केली. यामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना अभ्यासिका व पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतात. ग्रंथालयाचा लाभ अनेक विधार्थी परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेत कार्यरत आहेत."

मुस्लीम बोर्डिंगमध्ये चालवल्या जाणाऱ्या इतर समाजोपयोगी उपक्रमांविषयी माहिती देताना सांगतात, "मुस्लीम बोर्डिंग हे कोल्हापूरचे हेड क्वार्टर मानले जाते. कोल्हापुरात येणाऱ्या पूर परिस्थितीमध्ये आश्रयासाठी मुस्लीम बोर्डिंगच्या सभागृहाला प्राधान्य दिले जाते. तसेच व्यसनमुक्ती केंद्र, HIV ग्रस्तांसाठीचे आरोग्य शिबीर याठिकाणी भरवले जातात.” 

अशा रीतीने कोल्हापुरातील मध्यवर्ती भागात असलेल्या दसरा चौकात ११८ वर्षांपासून असलेले मुस्लिम बोर्डिंग आजही समाजहितासाठी उभे आहे. बोर्डिंगची ऐतिहासिक इमारत ही प्रथम चर्चसारखी होती. त्यानंतर तिला आतील व बाहेरील बाजूस मदीनेतील कमानीसारखा आकार देण्यात आला. दगडी बांधकाम असलेल्या या इमारतीचा ढाचा आजही डौलाने उभा आहे.

त्यावेळी महाराजांनी इमारतीसाठी साडेपाच हजार रुपयांचे रोख देणगी देत २५ हजार चौरस फूट मोकळी जागाही दिली होती. शिवाय संस्थानकडील जंगल उपजाचे लाकूड देऊन इमारत उभी केली. दुमजली कौलारू इमारतीमध्ये मध्यावरती हॉल असून, इतर दोन्ही बाजूला खोल्या व इतर दालने आहेत. दक्षिण हद्दीलगत नवी इमारत बांधून नेहरू उर्दू मराठी हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज सुरू आहे. त्यासमोर प्रशस्त असे पटांगण आहे. तर सामाजिक ऐक्‍याची रुजवण घालणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांचा रेखीव पुतळा वारसा वास्तूच्या समोर चौकाच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात आला आहे. 

मराठा, मुस्लिम, लिंगायत, जैन, दैवज्ञ अशा अठरापगड जातींच्या मुलांसाठी शिक्षणाची द्वारे उघडावीत यासाठी महाराजांनी त्या त्या समाजासाठी बोर्डिंग सुरू केले. आधुनिक आणि पुरोगामी महाराष्ट्राची भक्कम पायाभरणी महाराजांना त्यातून करायची होती. कोल्हापूरमध्ये गेल्या काही वर्षांपासून जाणीवपूर्वक पसरवल्या जाणाऱ्या हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाला आणि धार्मिक जमातवादाला पुरून उरत मुस्लिम बोर्डिंगने शाहूंचा वारसा असा समृद्धपणे जपला आहे. त्यामुळे हिंदू मुस्लिम सौहार्दाची परंपरा जपणाऱ्या मुस्लिम बोर्डिंगसारख्या कोल्हापूरमधील इतर सामाजिक आणि सांस्कृतिक संस्था भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रासाठी उर्जास्थान ठरणार यात शंका नाही.

- भक्ती चाळक
([email protected])

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter