सेराज अन्वर, पटना / किशनगंज
भारतीय मुस्लिमांच्या सर्वांत महत्त्वाच्या आणि मोठ्या संस्थांपैकी एक असणाऱ्या 'जमियत उलेमा ए हिंद'ने रविवारी बिहारच्या मुस्लिमबहुल किशनगंज जिल्ह्यात 'इजलास-ए-आम'चे म्हणजे संमेलनाचे आयोजन केले होते. संघटनेचे राष्ट्रीय मौलाना महमूद मदनी यांच्यासमवेत देशभरातले मुस्लीम धर्मगुरू आणि बिहार व बंगाल येथील विविध जिल्ह्यांतील लाखो लोक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारे हल्ले त्वरित थांबवले जावेत असा स्पष्ट इशारा यावेळी जमीयत उल उलेमा-ए-हिंदने बांगलादेशला दिला. किशनगंजच्या लहरा चौक मैदानात आयोजित इजलास-ए-आम या कार्यक्रमात बोलताना संघटनेचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी म्हणाले, "आपल्या देशातील अल्पसंख्यांच्या संरक्षणासाठी आणि सन्मानासाठी पाऊले उचलणे हे केवळ बांगलादेशच नव्हे तर जगातील सर्वच देशांचे कर्तव्य आहे."
बांगलादेशातील घटनांचा तीव्र निषेध करत ते पुढे म्हणाले, "कुठल्याही सभ्य समाजात न्याय अत्यंत महत्त्वाचा असतो. जात आणि धर्माच्या आधारावर जर भेदभाव सुरु राहिला तर ती न्यायाची मोठी प्रतारणा ठरेल. "हिंदूंवर होणारे हल्ले थांबले पाहिजेत. जर एखाद्या मुस्लिमाने मुस्लिमेतराशी गैरवर्तन केले तर तो मोठा अन्याय आहे. ही कृती इस्लामच्या विरोधात आहे. धर्म हे शिकवत नाही.", याची आठवण मदनी यांनी यावेळी करून दिली.
मस्जिद आणि मदरशांची सुरक्षा हवी
संमेलनात मस्जिद आणि मदरशांवर वाढत्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. धर्मांध व्यक्ती आणि संघटना पद्धतशीरपणे मस्जिदींना लक्ष्य करत असल्याचा निषेधही यावेळी मौलाना मदनी यांनी केला. १९९१च्या पूजा स्थळ (विशेष सुरक्षा) कायद्याच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने मस्जिदींच्या संरक्षणासाठी घटनात्मक पाऊल उचलावे अशी मागणी यावेळी मौलाना मदनी यांनी केली. मदरशांबाबत सुरू असलेल्या नकारात्मक दुष्प्रचाराचा निषेध करत त्यांनी सरकारकडे मदरशांच्या विकासासाठी सहकार्याची मागणी केली.
वक्फ संपत्तीचे संरक्षण
जमियत उलेमा ए हिंदच्या या संमेलनात वक्फ कायद्यातील बदलांचा विरोध करत, मुस्लिम समुदायाच्या अधिकारांचे संरक्षण करण्याची मागणी एकमुखाने करण्यात आली. मौलाना मदनी यांनी मुस्लिम समाजाला संयम व धैर्य बाळगण्याचे आवाहन करताना सांगितले, "आव्हाने मोठी आहेत, मात्र आपण संविधान आणि कायद्याच्या कक्षेत राहून उपाय शोधले पाहिजेत."
ईशनिंदा प्रकरणांवर संताप
प्रेषित मुहम्मद यांच्याबाबत सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या अपमानजनक पोस्ट्सबद्दल संमेलनात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. जमीयतने आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन करत म्हटले की, पैगंबरांच्या सन्मानाचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदा बनवला जावा आणि अशा कृत्यांना गुन्हा घोषित करावे.
इस्लामोफोबिया आणि द्वेषाच्या घटनांवर चिंता
मौलाना मदनी यांनी सीमांचल भागात झालेल्या सांप्रदायिक रॅलीज आणि सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांच्या भडकाऊ वक्तव्यांना राष्ट्रीय एकात्मतेसाठी धोकादायक असल्याचे म्हटले. देशाच्या सामाजिक सौहार्दाला कमकुवत करणाऱ्या अशा कृतींवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभावाचा संदेश
या संमेलनात मौलाना हकीमुद्दीन कासमी, मौलाना मुफ्ती अफ्फान मन्सूरपुरी, मौलाना जावेद इकबाल, आणि मौलाना इफ्तिखार कासमी यांसारखे मुस्लीम समजतील अनेक प्रमुख धर्मगुरू उपस्थित होते. आपल्या भाषणांमधून त्यांनी राष्ट्रीय एकता आणि समाजात बंधुभाव वृद्धिंगत करण्यावर भर दिला. या अधिवेशनात अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासोबतच देशातील सर्व धर्मांमध्ये बंधुता आणि सौहार्द जपण्याचाही संदेश देण्यात आला.
जमियत उलेमा ए हिंद या ऐतिहासिक संस्थेविषयी
जमियत उलेमा ए हिंद भारतीय मुस्लिमांची सर्वात जुनी आणि सर्वात मोठी सामाजिक-धार्मिक संघटना आहे. देशातील धार्मिक सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी नेहमी महत्त्वाची भूमिका निभावणारी ही एक ऐतिहासिक संस्था आहे. संस्थेने प्रत्येक कालखंडात राष्ट्राचे नेतृत्व करण्याचे कर्तव्य पार पाडले. आजही विविध स्तरांवर आणि अनेक क्षेत्रांमध्ये संस्थेचे कार्य सुरू आहे. जमियतने राजकीय, कायदेशीर आणि सामाजिक स्तरावर देशात जातीय सलोखा राखण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत.