इस्लाम नवकल्पनांच्या विरोधात असल्याची मांडणी चुकीची – अजित डोवाल

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 3 h ago
'इस्लाम - सत्तावाद और पिछड़ापन'चे प्रकाशन करताना रहमान, डॉ. कुरु, NSA डोवाल  आणि एम. जे. अकबर
'इस्लाम - सत्तावाद और पिछड़ापन'चे प्रकाशन करताना रहमान, डॉ. कुरु, NSA डोवाल आणि एम. जे. अकबर

 

नवी दिल्ली: आवाज द व्हॉईस

स्वार्थ आणि सत्तेसाठी इस्लामची मांडणी चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे. इस्लामच्या मूळ अर्थालाच फाटा देत नवीन विचार आणि कल्पनांसाठी असलेली जागा आक्रसून टाकण्यात आली. पण काही समाजांनी नवीन कल्पनांना स्थान न दिल्याने मागासलेपणा आल्याचे आपण लक्षात ठेवले पाहिजे असे मत देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यात खुसरो फाउंडेशन आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली. या कार्यक्रमात प्रसिद्ध राजकीय शास्त्रज्ञ डॉ. अहमद टी. कुरू यांच्या सुप्रसिद्ध पुस्तकाच्या 'इस्लाम - सत्तावाद और पिछड़ापन' या हिंदी अनुवादाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ. कुरू यांच्यासमवेत NSA अजित डोवाल आणि ज्येष्ठ पत्रकार एम.जे. अकबर यांनीही आपले विचार मांडले.

समाजाच्या उत्कर्षासाठी आत्मपरीक्षण गरजेचे – डोवाल
डोवाल म्हणाले, "राज्यसंस्थेने आणि समाजांनी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. जर तुम्ही स्वतःचा विचार केला नाही, तर वेळ आणि दिशा दोन्ही हरवता. आधुनिक विचार स्वीकारण्यास उशिरा  केल्यास प्रगती खुंटते." राज्य आणि धर्म यांच्यातील संघर्षावर बोलताना ते म्हणाले की, "राजकीय आणि धार्मिक संघर्ष केवळ इस्लामपुरते मर्यादित नाहीत. इतिहासात असे अनेक उदाहरणे सापडतात, जिथे सत्ताधारी आणि धर्मगुरू यांच्यात तणाव राहिला आहे."

अब्बासी राजवटीत मात्र राज्य आणि धार्मिक नेतृत्वामध्ये स्पष्टता होती, असे सांगत ते पुढे म्हणाले, धर्म आणि सत्ता यांच्यातील संघर्ष हा अपरिहार्य आहे. पण त्यावर तोडगा कसा काढला जातो, महत्त्वाचे हे आहे. 

छपाई यंत्राचा विरोध हि ऐतिहासिक चूक
डोवाल म्हणाले, "छपाई यंत्राचा विरोध हे मागासलेपणाचे उत्तम उदाहरण आहे. जेव्हा छपाई यंत्र आले, तेव्हा काही धर्मगुरूंनी त्याला विरोध केला. त्यांना वाटले की, याने इस्लामचा अर्थ चुकीच्या पद्धतीने मांडला जाईल.

एम.जे. अकबर यांनीही आपल्या भाषणात मुस्लिम समाजातील ज्ञानाच्या कमतरतेवर भर दिला. ते म्हणाले, "लोकशाहीपेक्षा मुस्लिम समाजाला ज्ञानाधारित व्यवस्थेकडे परत जाण्याची अधिक गरज आहे. मुस्लिम साम्राज्यांचा ऱ्हास याच कारणाने झाला की, त्यांनी ज्ञानाचा प्रसार करणे थांबवले."

आधुनिकतेशी जुळवून घेण्याची गरज
अकबर यांनी मुस्लिम समाजातील आधुनिकतेशी जुळवून घेण्याच्या अपयशावर भाष्य केले. "खऱ्या समस्येची मुळे मुस्लिम समाजाच्या आधुनिकता आणि राष्ट्र-राज्य संकल्पनेच्या अर्धवट समजुतीत आहेत," असे ते म्हणाले.

त्यांनी पाकिस्तानचे उदाहरण देत डॉ. कुरू यांना सल्ला दिला की, त्यांनी पुढच्या पुस्तकात पाकिस्तानवर विशेष लक्ष द्यावे. कारण तिथे धर्माच्या आधारावर राष्ट्राची फाळणी झाली आणि त्यामुळे पिढ्यानपिढ्या संघर्ष निर्माण झाला.

मुस्लिम समाजाचा विकास आणि लोकशाहीचा मार्ग
पुस्तकाचे लेखक डॉ. कुरू यांनी भाषणात स्पष्ट केले की, मुस्लिम समाजाने त्यांच्या नागरिकत्वाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. म्हणजेच त्यांनी हक्कांसह जबाबदाऱ्यांनाही महत्त्व दिले पाहिजे. ते म्हणाले, "मुस्लिम समाजाचा विकास लोकशाहीत आहे. बहुसंख्य आणि अल्पसंख्य समाजाने नागरिकत्वाचा सन्मान करायला हवा. सर्वांना समान हक्क मिळाले पाहिजेत आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यायला हवे."

ते पुढे म्हणाले, "मुस्लिम समाजाचा सुवर्णकाळ तेव्हाच होता, जेव्हा त्यांनी विविधतेला स्वीकारले आणि खुले विचार ठेवले."

खुसरो फाउंडेशनचा पुढाकार
पुस्तकाचे प्रकाशक, खुसरो फाउंडेशनचे संयोजक डॉ. हाफिजूर रहमान यांनी सांगितले की, फाउंडेशन इस्लामबद्दलच्या चुकीच्या समजुतींना आव्हान देण्यासाठी नवनवीन पुस्तके प्रकाशित  केली आहेत. जिहाद, गझवा ए हिंद याविषयीच्या चुकीच्या समजुतींना खुसरो फाउंडेशनच्या पुस्तकाने छेद देण्याचे महत्त्वाचे काम केले आहे.