पुण्यातील मोती मस्जिदमध्ये पोलिसांसह सर्वधर्मीय इफ्तार

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 4 d ago
पुण्यातील मोती मस्जिदमधील इफ्तारचा आस्वाद घेताना पुणे पोलिस कर्मचारी
पुण्यातील मोती मस्जिदमधील इफ्तारचा आस्वाद घेताना पुणे पोलिस कर्मचारी

 

रमजानचा महिना केवळ धार्मिकदृष्ट्याच नव्हे तर सामाजिकदृष्ट्या ही महत्वाचा आहे. याचे कारण म्हणजे या  उत्सवाच्या दरम्यान हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात एकत्र येत असतात. या काळात दोन्ही समाजांना जोडणारा दुवा म्हणजे करण्यात येणारे इफ्तारचे आयोजन. हा उपक्रम सर्व धर्मांच्या लोकांना एकाच व्यासपीठावर एकत्रित आणतो आणि संवादाचे माध्यम बनतो. 

अशा उपक्रमांमुळे विविध धर्मियांना एकदुसऱ्याची संस्कृती आणि धार्मिक संकल्पना जाणून घेण्याची आणि त्यात सहभागी होण्याची संधी मिळते. त्यामुळेच इफ्तार सर्वधर्मियांना एकत्र आणणारा प्रभावी उपक्रम बनल्याचे दिसते. देशभरात अनेक मुस्लीम आणि मुस्लीमेतर नागरिक आणि संस्था सौहार्द जपण्यासाठी अशा इफ्तारचे आयोजन करताना दिसतात.

पुण्यातील काही महत्त्वाच्या मस्जिदींनी एकत्र येत सर्वधर्मीय इफ्तारचे नुकतेच आयोजन केले. शहरातील मंगळवार पेठ परिसरात असलेल्या मोती मस्जिदमध्ये हा विशेष कार्यक्रम पार पडला. समर्थ पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या मोती मस्जिद जमात ट्रस्ट, चाँदतारा मस्जिद जमात ट्रस्ट, मनुशाह मस्जिद ट्रस्ट, पेन्शनवाला मस्जिद ट्रस्ट, खाकसार मस्जिद, रोशन मस्जिद, बक्कर कसाब मस्जिद, अमानिशा मस्जिद, आईना मस्जिद आणि बुखारी शाह मस्जिद यांच्यावतीने या इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते. 
 

महाराष्ट्रातील धार्मिक सौहार्दाचे वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न गेल्या काही काळापासून जाणीवपूर्वक केले जात आहेत. त्यामुळे या काळात शांतता आणि सौहार्द टिकवण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याची गरज प्रत्येक शांतताप्रिय मराठी माणसाला भासू लागली आहे. आपल्या शहरात शांतता आणि एकता टिकून राहावी आणि ती वृद्धिंगत व्हावी याकरता हा उपक्रम राबवत असल्याचे आयोजकांनी सांगितले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला परिसरातील गणेश मंडळे, राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या विशेष इफ्तारला पुणे पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने आणि समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गीते यांची विशेष उपस्थिती होती. 

या कार्यक्रमाचे आयोजक मजहर शेख यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “सध्या धार्मिक मुद्यांवरून राज्यातील सामाजिक शांतता भंग झाली आहे. अशा परिस्थितीत आपल्या पुण्यात हिंदू-मुस्लिम भाईचारा असाच टिकून रहावा म्हणून आम्ही रोजा इफ्तारचं आयोजन करण्याचं ठरवलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीते साहेबांनी याविषयीची कल्पना आमच्याजवळ मांडली. त्यानंतर मोती मस्जिदचे ट्रस्टी अझीम शेख यांच्या पुढाकारातून आम्ही हा उपक्रम राबवायचं ठरवलं.” 
 

कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी बोलताना ते म्हणाले, “आम्हाला हा महिनाभराचा उपवास असतोच. परंतु, आठवड्यातील काही ठराविक दिवशी हिंदू बांधवांचा उपवास असल्यामुळे आम्ही त्यांच्याशी चर्चा करून इफ्तारसाठी शुक्रवारचा दिवस निवडला. जेणेकरून त्यांना या दिवशी निसंकोचपणे इफ्तारचा लाभ घेता येईल.”

ते पुढे म्हणतात, “आम्ही या कार्यक्रमासाठी अतिशय विचारपूर्वक स्थळ निवडले. आम्ही हा कार्यक्रम मुद्दाम मस्जिदमध्ये करण्याचे ठरवले. कारण अनेक लोकांना मस्जिदमधील वातावरण अनुभवण्याची उत्सुकता असते. परंतु  इतरवेळी त्यांना ते अनुभवता येत नाही. तर काही लोकांमध्ये मस्जिदविषयी अनेक समजगैरसमज देखील असतात. त्यामुळे इथे इफ्तारचा कार्यक्रम पार पडला याचा आम्हाला आनंद आहे. आमच्या या कार्यक्रमामुळे हिंदू बांधवांना मुस्लिम संस्कृतीविषयी अधिक चांगले जाणता आले.” 

या कार्यक्रमाला भाजपचे माजी सभागृह नेते गणेश बीडकर हे देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, “अनेक वर्षांपासून या परिसरात नागरिकांकडून हिंदू-मुस्लिम ऐक्य जपलं जात आहे. ही एकतेची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी या मस्जिदमध्ये सामाजिक सलोख्याचे अनेक उपक्रम घेतले जातात. इथे इफ्तारचे आयोजन तर केलेच जाते परंतु वारकऱ्यांसाठी सुद्धा विशेष जेवणाची व्यवस्था केली जाते. हे ऐक्याचे उपक्रम केवळ महाराष्ट्रात नाही तर देशातील मस्जिदींमध्ये राबवले गेले पाहिजेत.” 
 

ते पुढे म्हणाले, “ज्यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबवला गेला ते मोती मस्जिदचे ट्रस्टी अझीम भाई समाजासाठी अनेक कामे करत आहेत. त्यांनी राबवलेला हा कार्यक्रम एक अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. त्यांच्याद्वारे समाजासाठी राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमांना सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित राहतात आणि चांगला संदेश याठिकाणी देतात. त्यामुळे याठिकाणी कार्यरत असलेल्या सर्व ट्रस्टींचे मी मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो. तसेच या उपक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व पोलिस वर्गाचे मी आभार मानतो. अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे म्हणजे समाजाला एक चांगले संदेश देणे असे मला वाटते.”     

पुण्यातील विविध मस्जिदींनी स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने राबवलेल्या या उपक्रमाने शांतता आणि सौहार्दाचा महत्वाचा संदेश देण्यात आला.  अशा उपक्रमामुळे समाजात सलोखा टिकवण्यास मोठी मदत तर मिळतेच, सोबतच  दोन्ही समाजातील संवाद वाढवण्यासही चालना मिळते. पुण्यात आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम केवळ राज्यच नव्हे तर देशासाठीही प्रेरणादायक आणि मार्गदर्शक ठरेल यात यात शंका नाही.

- भक्ती चाळक
([email protected])

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter