प्रज्ञा शिंदे
देशात काही ठिकाणी धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या घटना घडत असल्या तरी भारतातील हिंदू-मुस्लिमांमध्ये शांततापूर्ण सहजीवनाची आणि परस्परांच्या आदराची परंपराही मोठी आहे. छ. संभाजीनगर शहरातील एक अनोखी परंपरा याचीच साक्ष्य देते. येथील पडेगाव भागातील सैलानीनगर येथे सैलानी बाबांची प्रसिद्ध दर्गाह आहे. या दर्ग्याच्या आवारात गेल्या ३० वर्षांपासून गणपती बाप्पा प्रतिष्ठापित केले जातात. विशेष म्हणजे, या दर्गापरिसरात गणपतीची आरती ही होते आणि नमाज पठणही केले जाते. त्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाचे बांधव उत्साहाने सहभागी होतात.
छ. संभाजीनगर शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या सैलानीनगर येथे अनेक श्रद्धाळूंचे श्रद्धास्थान बनलेला, सैलानी बाबांचा पवित्र दर्गा आहे. सैलानी बाबांचे निष्ठावान भक्त सद्गुरू शंकर बाबा पोथीकर यांच्या गाढ भक्तीतून आणि आस्थेतून या परंपरेची सुरुवात झाली. सैलानी बाबांची मूळ दर्गा बुलढाणा येथे आहे. शंकर बाबा हे सैलानी बाबांचे शिष्य होते. त्यांनी मोठ्या श्रद्धेने सैलानी बाबांच्या दर्ग्याची प्रतिकृती पडेगाव येथे बनवली. ज्यामुळे या क्षेत्राला नवचैतन्य प्राप्त झाले.
गणपती उत्सवाच्या काळात इथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा केला जातो. हा उत्सव हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एक प्रतीक मानला जातो, कारण या उत्सवात दोन्ही समुदायाचे लोक एकत्र येऊन परस्परांचा सन्मान करतात.
सैलानी बाबांच्या या दर्ग्याच्या परिसरात, विविध धर्माचे आणि जातीचे लोक एकत्र येऊन आपली श्रद्धा व्यक्त करतात, त्यामुळे या ठिकाणाची महती अधिक वाढते. या स्थळाने हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एक आदर्श उदाहरण समाजापुढे मांडले आहे, त्यामुळेच इथे येणाऱ्या भक्तांच्या मनात परस्पर आदराची भावना अधिक दृढ होते. ही परंपरा केवळ धार्मिकतेपुरती सीमित नसून, ती सामाजिक सलोखा आणि एकात्मतेच्या दिशेने मार्गदर्शन करणारी आहे.
अशी झाली दर्ग्यात गणेशाची स्थापना
शंकर बाबा यांच्याकडे येणारे भाविक सर्व जातीधर्मांचे होते, आणि या व्यापक विविधतेला त्यांनी सदैव स्वीकारले. त्यांच्यातील सर्वधर्मसमभावाच्या भावनेतून, त्यांनी सैलानी बाबांच्या दर्ग्यात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्याचा धाडसी निर्णय घेतला. ३० वर्षांपूर्वी सुरू झालेली ही परंपरा आजही तितक्याच निष्ठेने आणि श्रद्धेने पाळली जाते, ज्यामुळे हिंदू-मुस्लिम ऐक्याचा एक अनोखा आदर्श निर्माण झाला आहे. हा निर्णय त्या काळात खूप महत्वाचा ठरला, कारण त्याद्वारे समाजात धार्मिक समन्वय आणि सहिष्णुतेचा संदेश दिला गेला. शंकर बाबा यांच्या निधनानंतर त्यांच्या श्रद्धेचा आणि सेवाभावाचा आदर म्हणून, त्यांच्या समाधीची स्थापना देखील याच दर्ग्यात करण्यात आली. त्यांच्यानंतर, त्यांच्या पत्नीची समाधीही येथेच बांधण्यात आली, ज्यामुळे हे ठिकाण एक धार्मिक श्रद्धास्थान म्हणून अधिक महत्त्वाचे बनले आहे. या समाधीस्थळावर नियमितपणे भाविक येतात आणि आपल्या श्रद्धेने त्यांना वंदन करतात.
गेल्या ३० वर्षांपासून, या दर्ग्यात दरवर्षी गणेश मूर्तीचे प्रतिष्ठापन मोठ्या उत्साहात केली जाते. येथे फक्त गणपतीचीच पूजा नाही, तर नमाज पठणही तितक्याच श्रद्धेने केले जाते. हे दृश्य सर्वधर्मसमभावाचे जिवंत उदाहरण आहे, जिथे धार्मिक आस्थेची एकत्रितता पाहायला मिळते. गणपतीची आरती आणि नमाज पठण एकाच ठिकाणी होण्याने धार्मिक सहिष्णुता आणि ऐक्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचतो.
यामुळे सैलानी बाबांचा दर्गा केवळ धार्मिक उपासनेचे केंद्र नसून, तो सामाजिक ऐक्य आणि सहिष्णुतेचा एक दीपस्तंभ बनला आहे. अशा ठिकाणी विविध धर्मांचे लोक आपापल्या श्रद्धेचे पालन करतात, ज्यामुळे समाजात एकात्मतेची भावना अधिक बळकट होते. येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणाचे सौहार्द अनुभवता येते, त्यामुळे हे ठिकाण संपूर्ण समाजासाठी प्रेरणास्थान बनले आहे.
दर्ग्यातील अनोखा एकोपा
पल्लवी पोथिकर या शंकर बाबा यांच्या सूनबाई आहेत. त्या म्हणतात, "शंकर बाबांची सैलानी बाबांवर सुरुवातीपासूनच श्रद्धा होती. सैलानी बाबा मुस्लिम होते त्यामुळे त्यांची दरगाह तर शंकर बाबा यांची समाधी आहे. त्यामुळे इथे सर्वधर्म समभाव जोपासला जातो. दर्गाह परिसरात हनुमान आणि महादेवाचंही मंदिर आहे. दर गुरुवारी इथे गणपती, दत्त, महादेव यांच्यासोबतच सैलानी बाबांचीही आरती होते. "
पुढे त्या सांगतात, "या ठिकाणी सर्व धर्माचे भाविक येतात. त्यामुळेच इथे सर्वधर्मीय सण साजरे होतात. इथे कालिका माता, तुळजाभवानी माता यांचे उत्सव ही साजरे केले जातात. आम्ही इथे गणेशोत्सवही साजरा करतो."
दर्गाहला भेट देणाऱ्या भाविकांपैकी एक असलेले अन्वर पठाण सांगतात, "दर्गाहमध्ये आल्यावर अध्यात्मिक समाधान मिळते. इथे बाबांच्या समाधीसोबत गणेशजींची मुर्तीही आहे. इथे सर्व धर्माचे लोक येतात, प्रत्येक सण मिळून साजरे करतात. सैलानी बाबांचा उरूसही इथे उत्साहाने साजरा केला जातो."
या दर्ग्याची देखभाल हिंदू आणि मुस्लिमबांधव दोघेही करतात. फक्त गणेशोत्सवच नाही तर दर्ग्यात हिंदूचे इतर सणही साजरे केले जातात. अशाप्रकारे सैलानी नगरात गेल्या ३० वर्षांपासून हिंदू मुस्लिम बांधवाच्या ऐक्याचं अनोखं दर्शन घडत आहे. किरकोळ कारणांहून हिंदू-मुस्लीम बाधंवातील तेढ वाढवण्याचं काम समाज कंटकांकडून केलं जातं. त्यामुळे धर्मावरुन भांडणं लावून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना ही चांगलीच चपराक आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -