बकरी ईद निमित्त कुर्बानी द्यायच्या पशूंचे तपासणी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 2 Months ago
बकरी ईद
बकरी ईद

 

राज्यात साजरा केल्या जात असलेल्या बकरी ईद या मुस्लिमांच्या पवित्र सणानिमित्त कुर्बानी द्यावयाच्या पशूंच्या तपासणीचे शुल्क सोमवार (ता.१७) ते गुरुवार (ता.२० ) जून २०२४ या कालावधीत २०० रुपये वरून २० रुपये करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच नुकतीच रायगड जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची बैठक संपन्न झाली आहे. यामध्ये बकरी ईद निमित्त योग्य नियोजन करण्यात आले आहे.

बकरी ईद निमित्त सेवाशुल्क दरात ही विशेष सवलत गेल्या वर्षीही देण्यात आली होती. राज्यभरातील पशुवधगृहात पशु कत्तल पूर्वी कत्तलपूर्व तपासणी महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत केली जाते. हे तपासणी शुल्क गेल्याच वर्षी प्रति पशु २०० रुपये होते. त्यानंतर बकरी ईदच्या पूर्वी अल कुरेश ह्युमन वेल्फेअर असोसिएशनने हे शुल्क २० रुपये करण्याची विनंती राज्य शासनाला केली होती. त्या मागणीसाठी सदर संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सदर विषयी निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाने या सवलती बाबतचा शासन निर्णय जाहीर केलेला आहे

रायगड जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे बकरी ईद पार्श्वभूमीवर पार पडलेली आहे. या सभेस निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, तसेच पनवेल महानगरपालिका, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय, परिवहन विभाग, वन विभाग यातील अधिकारी उपस्थित होते. बकरी ईद साजरी करण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम (सुधारणा) १९९५ तसेच, प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा १९६० च्या तरतुदीचे पालन करण्याच्या अनुषंगाने पनवेल महानगरपालिका तसेच कर्जत, खोपोली, स्थानिक प्रशासन पोलीस व पशुसंवर्धन विभागाने समन्वय ठेवण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आहेत.

खोपोली नगर परिषद हद्दीमध्ये १, कर्जत ग्रामीण मध्ये ३ आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये ४ ठिकाणी तात्पुरत्या कुर्बानी केंद्रास परवानगी देण्यात आलेली असून या ठिकाणी पशुसंवर्धन विभागाकडून कत्तल पूर्व तपासणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी पुरेशा प्रमाणात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

डॉ.सचिन देशपांडे,
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, रायगड. मु.अलिबाग.