डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीचा देशभरात उत्साह

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १३४ वी जयंती. आज जगभरात बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. जगभरातील सामान्य नागरीकांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वजण बाबासाहेबांना अभिवादन करुन सर्वांना या खास दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संसद परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आहे. 

संसद परिसरात आयोजित या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, अर्जुन राम मेघवाल, पीयूष गोयल, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ऑफिशियल पेजवरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले आहे. त्यांनी म्हटले आहे की, "भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा देतो."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रसंगी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, “मी सर्व देशवासीयांच्या वतीने भारतरत्न पूज्य बाबासाहेबांना त्यांच्या जयंतीनिमित्त नमन करतो. त्यांच्या प्रेरणेने आज देश सामाजिक न्यायाचे स्वप्न साकार करण्यासाठी समर्पित भावनेने कार्यरत आहे. त्यांचे सिद्धांत आणि आदर्श ‘आत्मनिर्भर’ आणि ‘विकसित’ भारताच्या निर्मितीला शक्ती आणि गती देतील.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. अमित शहा यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, "शिक्षण, समानता आणि न्यायाच्या बळावर सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे बाबा साहेब भीमराव आंबेडकर आयुष्यभर वंचितांच्या हक्कांसाठी वचनबद्ध राहिले. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या तत्वांवर आधारित संविधान तयार करून त्यांनी भारताच्या महान लोकशाही वारशाचा मजबूत पाया रचला. न्याय्य आणि समतावादी समाज निर्माण करण्याच्या दिशेने बाबासाहेबांचे विचार आजही आपल्या सर्वांना प्रेरणा देतात. संविधानाचे महान शिल्पकार आणि लाखो देशवासीयांच्या स्वाभिमानाचे प्रतीक असलेले बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना कोटी कोटी नमन करतो."

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री आशिष शेलार, मंत्री संजय राठोड, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आदींनी चैत्यभूमीवर जात बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडियावरुन बाबासाहेब आंबेडकर यांनी अभिवादन केले आहे. पोस्ट मध्ये त्यांनी म्हटले आहे की, "जगातील सर्वोत्तम संविधानाची निर्मिती करून न्याय आणि समतेचे दीप प्रज्वलित करणाऱ्या महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!"

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अभिवादन करत म्हटले आहे की, "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन."

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अलौकिक कार्याचं, विचारांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन त्यांना भावपूर्ण अभिवादन! तसंच राज्यातील नागरिकांना डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!"