शिक्षण, महिला सशक्तीकरण, संशोधन, विकास, परिवर्तन, धर्मविचाराची चिकित्सा, निरोगी आरोग्य हे समाजाच्या प्रगतीचे मुख्य स्रोत आहेत. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी ‘सेंटर फॉर रेनेसाँ’ ही संस्था कार्यरत आहे. नुकताच कोल्हापुरातील हेरले या ठिकाणी सेंटर फॉर रेनेसाँ संस्थेच्या पहिल्या इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला.
मुस्लिम समाजाच्या पुढाकाराने आणि समाजातील इतर कार्यकर्त्यांच्या विशेष योगदानाने ही सामाजिक प्रयोगशाळा उभारली गेली आहे. संस्थेच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून शेकडो लोक उपस्थित होते. विविध क्षेत्रात व्यक्तीस्वरुप, विविध पक्षात, चळवळीत आणि संस्थेत कार्यरत स्त्री-पुरुष सार्थीचा स्नेहसंवाद मेळा घेण्यात आला. यानिमित्ताने समाजाच्या प्रगतीसाठी विखुरलेले सर्वधर्मीय कार्यकर्ते एकाच छताखाली एकत्र आले होते. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत यांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता. विशेषतः या मेळाव्यात मुस्लीम महिलांची संख्या लक्षणीय होती.
या उद्घाटनानंतर महाराष्ट्रभरतील कार्यकर्त्यांचे दोन गट करण्यात आले होते. एका गटात राजकीय हस्तक्षेप करून समाजासाठी काय करता यावर यावर चर्चा झाली तर दुसऱ्या गटात अराजकीय दृष्टीकोनातून समाजहिताचे कोणते कार्य करता येतील यावर विचारमंथन झाले. दोन्ही गटाने मुस्लीम समाजाच्या उन्नतीसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी राजकीय आणि सामाजिक परिवर्तनासाठी आपली मते मांडली. त्याचबरोबर आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या विषयांवर मुस्लीम व मुस्लिमेतर समाजाने मते मांडली.
महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या चळवळींना जोडणारे केंद्र
संस्था उभारण्यामागच्या संकल्पनेविषयी बोलताना ‘हिंदी हैं हम... हिंदोस्ताँ हमारा’ या संस्थेचे कार्याध्यक्ष हुमायून मुरसल म्हणाले की, “सेंटर फॉर रेनेसाँ या संस्थेची स्थापना २०१६ मध्ये झाली. हा एक सामाजिक चळवळीचा भाग आहे. आज समाजपरिवर्तनासाठी अनेक लोक झटत आहेत. त्यालाच हातभार म्हणून आम्ही संस्थेद्वारे आम्ही शिक्षण क्षेत्रात योगदान देण्याचे ठरवले. त्याच माध्यमातून आम्ही रिसर्च अँड डेवलपमेंटचे संशोधन केंद्र उभे करण्याचे ठरवले.”
ते पुढे म्हणतात, “या संस्थेत काही विषयांवरील संशोधन, प्रयोग किंवा त्याआधारावर कार्यकार्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आम्हाला जाणवत होती. तर दुसरीकडे मुस्लिम समाज आमचे लक्ष्य असल्याने त्यांच्या शिक्षणाचा आणि मागसलेपाणाचा प्रश्न आम्हाला महत्वाचा वाटत होता. त्यामुळे ही संस्था उभारणे फारच महत्वाचे होते.”
शिक्षणच्या महत्वाविषयी बोलताना हुमायून मुरसल म्हणाले, “आमच्या दृष्टीने नुसते शाळांमध्ये जाऊन पुस्तके वाचून परीक्षा देणे म्हणजे शिक्षण नाही. आमच्या दृष्टीने जीवन म्हणजेच शिक्षण. मग त्यामध्ये सामाजिक मूल्ये, कौशल्ये आणि माणुसपण या बाबी आल्या. कारण समाज घडवण्याच्या प्रक्रियेत माणसाची भूमिका खूप महत्वाची असते. मग त्यासाठी आधी चांगला माणूस घडवणे गरजेचे आहे, असे मला वाटते.”
याविषयी ते पुढे म्हणतात, “हिंसा, युद्ध यासारख्या गोष्टी टाळून तुम्हाला या समाज व्यवस्थेला कसे पुढे न्यायचे यावर देखील आमची संस्था काम करणार आहे. हेच काम आम्ही शिक्षणच्या माध्यमातून साध्य करणार आहोत. कारण आजकालची शिक्षण व्यवस्था फक्त स्पर्धा, मिरीटलिस्ट एवढ्यापुरती मर्यादित राहिली आहे. त्यामुळे औपचारिक शिक्षण पद्धतीला पर्यायी अशी माणूस घडवणारी शिक्षणव्यवस्था उभी करण्याचे आम्ही ठरवले.”
सेंटर फॉर रेनेसाँमध्ये देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाविषयी बोलताना हुमायून म्हणाले, “संस्थेत विज्ञान, गणित यासारखे अवघड विषय सोपे करून त्याची पायाभूत माहिती विद्यार्थ्यांपर्यंत कशी पोहोचेल यावर आम्ही भर देणार आहोत. काळानुरूप बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार आम्ही इथे डिजिटल स्टुडिओ देखील तयार केला आहे. तर दुसऱ्याबाजुला विद्यार्थ्यांमध्ये भावनिक समतोल कसा राखला जाईल आणि इतरही कौशल्ये कशी वाढतील याकडे विशेष लक्ष देणार आहोत. माणूस म्हणून समाजात वावरत असताना जातीधर्माच्या पलीकडे जाऊन एक नवा समाज प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हे पाऊल असणार आहे.”
ते पुढे म्हणतात, “एका वाक्यात सांगायचे झाले तर ‘सेंटर फॉर रेनेसाँ’ ही समाज परिवर्तनाची प्रयोगशाळा आहे. तसेच पर्यायी शिक्षण व्यवस्थेचे ते केंद्र आहे. काळानुरूप तिथे अनेक बदल घडणार आहेत. विज्ञान, गणित विषयांच्या शाखा वेगवेगळ्या असणार आहेत. मीडिया क्षेत्राचा वेगळा विभाग करण्याचा आमचा विचार आहे. आत्ता ही नुकतीच सुरुवात असल्याने आम्ही प्राथमिक स्तरावर शिक्षण, आरोग्य, स्त्रीसशक्तीकरण, पर्यावरण, शेती या प्रमुख प्रश्नांवर आम्ही काम करणार आहोत. ही संस्था स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या चळवळींना जोडणारे केंद्र बनावे हा आमचा उद्देश आहे.”
यावेळी बोलताना हिंदी हैं हम... हिंदोस्ताँ हमारा या संस्थेचे संपत देसाई म्हणतात, “आज समाजात सर्वात जास्त समस्या मुस्लीम समाजात आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांवर काम करणे खूप गरजेचे आहे. ही संस्था पोटतिडकीने मुस्लिमांच्या समस्यांवर काम करत असल्याने या उद्घाटन प्रसंगी मी एवढंच सांगेन की, ही इमारत नव्हे तर एक विचार आहे. हा विचार आपल्या सर्वांना एकत्रितपणे पुढे घेऊन जायचा आहे.”
ते पुढे म्हणतात, “आज महाराष्ट्रातील समाजकारणाची बिघडलेली व्याख्या सुधारणे गरजेचे आहे. या संस्थेच्या माध्यमातून समाजकारणाची नेमकी मूल्ये समाज घडवणाऱ्या तरुणाईला समजावण्यात येणार आहेत. ही संस्था उभारण्यात मुस्लिम समाजाचा पुढाकार असला तरीही याचा पाया रचण्यात सर्व समुदायांचे योगदान आहे.”
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सतीश लोंढे यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, “ज्या समाजाला बहुसंख्यक समाजाने कोपऱ्यात ढकलण्याचा विडा उचलला आहे, तो समाज सामाजिक कार्यात हातभार लावण्यासाठी कुठेतरी योगदान देत आहे. त्यामुळे या वैचारिक लढ्यात पुढाकार घेण्याची मोठी जबाबदारी संस्थेने स्वीकारली आहे. वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय स्तरावर आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.”
ही संस्था फक्त शिक्षणच नाही तर समाज परिवर्तनाच्या दृष्टीने कार्यकर्ते घडवण्याचे काम करत आहे. याविषयी बोलताना हुमायून म्हणतात, “समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी त्यावर विचार करणे गरजेचे आहे. आणि याच विचार करण्याच्या प्रक्रियेतून सामाजिक कार्यकर्ते घडत असतात. जे समाजासाठी निस्वार्थपणे काम करतात. असेच कार्यकर्ते आम्हाला लाभले आणि या संस्थेच्या माध्यमातून आम्ही असेच कार्यकर्ते घडवणार आहोत. सहिष्णू आणि भावनाप्रधान समाज घडवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.”