रमजानच्या पवित्र महिन्यात रोजा, सत्कर्म, जकात आणि अल्लाहची उपासना यांना विशेष महत्त्व असते. रोजा म्हणजे उपवास मुस्लिम पुरुष आणि महिला दोघांनाही बंधनकारक आहे.. मात्र या काळात आयोजित करण्यात येणाऱ्या सार्वजनिक इफ्तारमध्ये सहसा पुरुषच सहभागी होतात, महिलांना अशी संधी फार कमी मिळते. त्यामुळे रमजान काळात काही संस्था महिलांसाठी खास इफ्तारचे आयोजन करतात. सोलापूरमध्ये असाच एक अनोखा इफ्तार पाहायला मिळाला.
रमजाननिमित्त सोलापूरमध्ये नुकताच सर्वधर्मीय महिलांसाठी इफ्तार पार पडला. एशियन सेंटर फॉर सोशल स्टडीज आणि गाझीउद्दीन अकॅडमी यांच्यामार्फत या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा इफ्तार 'स्नेह जपूया, विसंवाद संपवूया' या संकल्पनेवर आधारित होता. या कार्यक्रमाला सर्व जातीधर्मातील महिलांची उपस्थिती होती. त्यापैकीच एक होत्या सोलापूर सावित्री महिला संघटनेच्या सुमित्रा देशमुख. या अनोख्या उपक्रमाविषयी त्यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दांत…
खळखळून हसणारे, उजळलेले चेहरे, परिचय करून घेणार्या एकमेकींशी संवाद साधणाऱ्या महिला, पांढरे शुभ्र टेबल क्लॉथस आणि सुंदर झालरींनी सजलेले गोलाकार टेबल्स, त्यावर गुलाब पुष्प आणि पाकळयांनी केलेली सजावट, आदबीने वागणारे आणि विविध फळांची रेलचेल असलेल्या डिशेस सर्व्ह करणारे मुस्लिम बांधव आणि त्यांना मदत करणाऱ्या भगिनी, आमंत्रित पाहुण्यांच्या आदरातिथ्य कसलीही कसर राहू नये, यासाठी प्रयत्नशील असणारे आयोजक आणि त्यांना मदत करणारे अनेक हात…
हे इतक्या सुंदर माहौलचे वर्णन करताना शब्दही फिके पडावेत.. अतिशय सुरेख, नीटनेटके नियोजन आणि एक मंतरलेली संध्याकाळ…
निमित्त होते, भारतीय समाजात एकत्र राहताना समाजातील घटकांची एकमेकांना माहिती व्हावी, एकमेकांची जगण्याची मुल्ये, संस्कृती आणि विचारधारा कळावी या उद्देशाने एशियन सेंटर फाॅर सोशल स्टडीज आणि गाजिउद्दीन अकादमी यांच्या वतीने आयोजित इफ्तार संवाद कार्यक्रमाचे...
हिंदु मुस्लिम समाजाचे ऐक्य साधण्यासाठी हा छोटासा प्रयत्न अतिशय प्रभावी आणि समृध्द अनुभव देऊन गेला.
सोलापूर शहर हे अनेक भाषा बोलणारे विविध संस्कृतींना जोपासणारे, अनेक जातीपातींना गुण्यागोविंदाने एकत्र बांधून ठेवणारे शहर म्हणून ओळखले जाते.
सोलापुरातील ज्या चार स्वातंत्र्य सैनिकांमुळे शहराला हुतात्म्यांचे शहर म्हणून वेगळी ओळख मिळाली असे मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन हे जातीय ऐक्यासाठी आणि देशासाठी प्राणांची आहुती देणारी प्रतीके होत. जातीय सलोख्याचा हाच वारसा पुढे नेत पार पडलेला इफ्तार संवाद खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणासाठीचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.
प्रथमच सोलापूर शहरात आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे हिंदु मुस्लिम महिलांनी एकत्रितपणे फलाहाराचा आस्वाद घेत, हिंदू महिलांना प्रथमच सामावून घेत, व्यक्त होण्याची संधी दिली. समाजापुढे एक वेगळे आदर्श उदाहरण आयोजकांनी घालून दिले.महिलांना बोलते केले. डाॅ.आस्मा खान यांनी इस्लाम धर्मातील, कुराणातील शिकवण आणि मूल्ये सांगितली.सहिष्णुता, परोपकार,मानवता इत्यादी मुल्ये सांगणारी इस्लाम धर्म परंपरा सांगितली. मानवतावाद हाच सर्व धर्मांचा पाया आहे, हे सोदाहरण पटवून दिले.
देशात आज दोन धर्मांमधील तेढ वाढत असताना, जाती-धर्मात विखार पसरत असताना अशा कार्यक्रमाचे महत्व अधोरेखित व्हायला हवे. सर्वधर्मसमभावाला, मानवतावादाला, माणुसकीला सगळ्यात महत्वाचे स्थान दिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानाच्या संघर्षावेळी शिवरायांवर हल्ला करणारा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी होता, तर शिवरायांसोबत लढणारा सिद्दी इब्राहिम होता.अठरापगड जातींना एकत्र करुन महाराजांनी स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली.या घटनेचा साक्षीदार इतिहास आहे.
स्वातंत्र्यसंग्रामात सर्व जाती धर्मातील लोक लढले, देशासाठी बलिदान दिले आणि आज आपण धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या राजकारणी आणि पुढाऱ्यांच्या हातचे प्यादे होऊन धर्माच्या नावाखाली आपापसात भांडत बसतो.दंगली, जाळपोळ करतो. अशावेळी अंतरंगातून म्हणावेसे वाटते,
“धर्म जाती प्रांत भाषा भेद सारे संपू दे.
एक निष्ठा एक आशा एकरंगी रंगू दे.
भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी.
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री.
लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले.
माणसाने माणसाशी माणसासम वागणे.
हीच अमुची प्रार्थना अन् हेच आमुचे मागणे.”
साधारण याच धाटणीची कविता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्षा अस्मिता बालगावकर यांनी सादर केली.
“पाडू चला रे भिंत ही मधे आड येणारी.
या मनामनातुन बांधुया एक वाट जाणारी.
चल विसरू हे मतभेद
नको होऊ अविचारी.
या मनामनातुन बांधुया एक वाट जाणारी.”
कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व लहान मोठ्यांनी टाळ्या वाजवत या गीताला उत्स्फूर्त प्रतिसाद देत गाण्याचा आनंद लुटला. आपला भारत देश जगभरात ओळखला जातो.तोच मुळात सर्वधर्मसमभाव जपणारा देश म्हणून.ही भारताची ओळख कायम राखणे ही तुमची माझी आपली वैयक्तिक आणि नैतिक जबाबदारी आहे.हे प्रत्येक भारतीयाने ध्यानात ठेवले पाहिजे.
मुस्लिम बांधवांनी खास हिंदू महिलांसाठी आयोजित केलेला हा इफ्तार संवाद एकमेकांचे सण मग रमजान असो दिवाळी असो की होळी, आम्ही गुण्यागोविंदाने आणि एकत्रितपणे साजरे करणार आणि हा कार्यक्रम याची नांदी ठरेल, यात तिळमात्र शंका नाही.
माझ्या आजवरच्या आयुष्यात मी वारीला न चुकता जाणारे, मनोभावे विठ्ठलाचे नामस्मरण करणारे,एकादशी करणारे रहीमचाचा पाहिलेत.घरातील एखादी व्यक्ती निवर्तली असताना फरजाना भाभीच्या घरून पिठलं भाकरीचा डबा आलेला पाहिलाय.शिरखुर्मा, गुलगुले, दालचावल हे खाऊन आमची पिढी लहानाची मोठी झाली. मग आमच्यामध्ये फूट पाडणारी ही लोकं कोण आहेत, हा मनाला सतावणारा प्रश्न वारंवार पडतो आणि अस्वस्थ करतो.
म्हणून म्हणावेसे वाटते आणि येणाऱ्या पिढीला आवर्जून सांगावेसे वाटते…
“तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा I
इंसान की औलाद हैं इंसान बनेगा I
मालिक ने हर इंसान को इंसान बनाया।
हमनें उसे हिंदू और मुसलमान बनाया।
कुदरत ने तो बख्शी थी हमें एक ही धरती।
हमनें कहीं भारत कहीं इराण बनाया।”
'सलोखा' सारख्या अनेक सामाजिक संस्था जातीधर्मातील तेढ मिटवण्यासाठी 'आओ हमारे घर' सारखे कार्यक्रम राबवत आहेत. जेणेकरून समाजात एकता नांदावी. एकमेकांची संस्कृती जाणून घेता यावी.विचारांचे आदानप्रदान व्हावे.भारतवासी म्हणून आपणही हा एकोपा जपण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे.
जगाच्या नकाशावर सर्वधर्मसमभाव जपणारे राष्ट्र म्हणून भारताचे नाव अबाधित रहायला हवे. सर्व धर्मीयांना समानतेचा अधिकार संविधानाने दिलेला आहे.तो जपुया.स्नेह जपण्याचा, मनामनात प्रेमभाव जागविण्याचा संकल्प करूया.
“हिंद देश के निवासी सभी जन एक हैं.
रंग,रुप,वेष,भाषा चाहें अनेक हैं.”
हा आहे माझा भारत!
जय हिंद!
जय भारत!!