जळगावात पार पडला सर्वधर्मीय इफ्तार सोहळा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 9 d ago
जळगाव मधील 'आयडल सेल्स असोसिएशन'ने आयोजित केलेल्या इफ्तारमधील प्रसंग
जळगाव मधील 'आयडल सेल्स असोसिएशन'ने आयोजित केलेल्या इफ्तारमधील प्रसंग

 

माह-ए-रमजान मधील निम्म्याहून अधिक रोजे पूर्ण झाले आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी रोजा इफ्तारचे उपक्रम पार पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर जळगावातील तरुणांनी एकत्र येत 'दावत-ए-इफ्तारचे' आयोजन केले होते. या इफ्तारमध्ये शेकडो रोजेदारांनी सहभागी होऊन स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला.

यावेळी बोलताना इस्लामिक अभ्यासक आमीर शोएल यांनी प्रतिपादन केले. ते म्हणाले, "अन्न पाण्याविना नुसतेच उपाशी राहणे म्हणजे रोजा नव्हे, तर धर्माचरणही महत्त्वाचे आहे. शरीरासह मनाचे पावित्र्य म्हणजेच रोजा होय." 

जळगाव जिल्ह्यात विविध क्षेत्रातील उच्चशिक्षित तरुणांनी 'आयडल सेल्स असोसिएशन' ही संघटना नुकतीच स्थापन केली आहे. तरुणांच्या या संघटनेतर्फे सोमवारी (दि. १७) मुस्लिम बांधवांसाठी 'रोजा इफ्तार'चे आयोजन केले होते. या नवनिर्वाचित संघटनेचा पहिलाच उपक्रम असतानाही सर्व समावशेक प्रयत्न केल्याने उपस्थितांतर्फे तरुणांचे कौतुक करण्यात आले. 

जळगावमधील मेहरुण येथील एच. जे. थिम इकरा महाविद्यालयाच्या मैदानावर हा दावत-ए-इफ्तार कार्यक्रम पार पडला. या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अब्दुल करीम सालार हे होते. तर अब्दुल हमीद शहा, दस्तगीर शहा, रईस शेख, आसिफ शहा, अनिस शहा, साबीर मस्तफाबादी आदी मान्यवरांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली. 

यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष करीम सालार म्हणाले, "मुस्लिम धर्मियांचा रोजा, हिंदू बांधवांचा उपवास, जैन धर्मियांचे पयुर्षण पर्वाचे कठोर उपवास या सर्वांचा उद्देश एकच असतो, तो म्हणजे मनावर ताबा मिळविणे. मनावर ताबा मिळवला, की वाईट कृती होऊ शकत नाही."

कार्यक्रमासाठी आयडल सेल्सचे अध्यक्ष मुनाफ शेख, उपाध्यक्ष मुजाहिद पठाण, याकूब खान, शेख जावेद, आबिद शेख, बख्तीयार शेख, वकार शेख, अझहर हुसेन, मोहंमद इरफान अब्बासी, फैजान शेख, रईस बाबा बागवान व पदाधिकारी कार्यरत होते. आगामी काळात समाजाभिमुख कार्यक्रम करण्याचा मानस या वेळी अध्यक्ष मुनाफ शेख यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, आपल्या चांगल्या कामात वेगवेगळ्या जाती-धर्माच्या विभिन्न विचारांच्या सहकाऱ्यांना सहभागी करून घेतल्यास मानव जातीच्या भल्यासाठी निरंतर कार्य करता येईल, असे मार्गदर्शन उपस्थित धर्मगुरू आणि मान्यवरांतर्फे तरुणांना करण्यात आले.  कार्यक्रम यशस्वितेसाठी मतीन शहा, अजहर काझी, हनीफ शेख, अर्सलान पठाण यांनी सहकार्य केले.