होळी आणि जुमानिमित्त मुस्लीम मौलवींचे शांती आणि सहिष्णुतेचे आवाहन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 h ago
होळी आणि रमजानच्या जुमानिमित्त सौहार्द आणि शांततेचे आवाहन करणारे मुस्लीम मौलवी
होळी आणि रमजानच्या जुमानिमित्त सौहार्द आणि शांततेचे आवाहन करणारे मुस्लीम मौलवी

 

भारतामध्ये विविधता आणि सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक असलेल्या सणांमध्ये होळीचा सण महत्त्वाचा मानला जातो. यंदाची होळी आणखी विशेष ठरणार आहे, कारण यावर्षी होळीचा रंगोत्सव आणि रमजान महिन्यातील दुसरा जुम्मा (शुक्रवार) एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे शांततेचे वातावरण अबाधित राखण्यासाठी आणि कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मुस्लिम समुदायाने अनेक ठिकाणी जुम्मा नमाजेच्या वेळेत बदल केले आहेत. तर दुसरीकडे मुस्लीम मौलवींनीही शांततेचे आवाहन केले आहे.  

देशभरातील अनेक मुस्लिम धर्मगुरूंनी नमाजेच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे होळीच्या उत्सवात कोणताही वाद निर्माण होणार नाही आणि दोन्ही समाजांचे सण शांततेत पार पडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. उत्तर भारतातील परिस्थिती पाहता अनेक उलेमांनी मुस्लिमांना शांततेचे आणि संयमाचे आवाहन केले आहे. होळीच्या दिवशी हिंदू बांधव उत्साहात रंग खेळत असतील, त्याचवेळी मुस्लिम बांधव जुम्माची नमाज अदा करत असतील. या पार्श्वभूमीवर शांतता आणि सौहार्द कायम ठेवण्यासाठी जुम्मा नमाजेच्या वेळेत बदल करावा, असा प्रस्ताव अनेक मुस्लिम धर्मगुरूंनी मांडला होता. त्यानुसार बहुतेक ठिकाणी वेळा बदलण्यात आल्या आहेत. यामुळे धार्मिक सलोखा टिकून राहील आणि कोणताही वाद निर्माण होण्याची शक्यता टळणार आहे.  

होळी आणि रमजान एकाच दिवशी आल्यामुळे धार्मिक सहिष्णुतेचा आदर्श जगापुढे ठेवण्याची ही संधी असल्याचे धर्मगुरूंनी स्पष्ट केले आहे. मुस्लिम बांधवांनी संयम राखावा आणि आपल्या मोहल्ल्यातील मस्जिदीतच नमाज अदा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनानेही योग्य ती खबरदारी घेतली असून, दोन्ही समाजांना शांततेचे पालन करण्याचे आणि परस्पर आदर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  

रामपूरचे शहर काझी सय्यद खुश्नूद मियाँ यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे नमाजेच्या वेळेत बदल करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, 14 मार्च रोजी रामपूरच्या जामा मस्जिदीत दोन वाजता अजान दिली जाईल आणि अडीच वाजता जुम्माची नमाज अदा केली जाईल. होळीच्या दिवशी रस्त्यांवर उत्सवाचा माहोल असेल, त्यामुळे मुस्लिम बांधवांनी शक्य असल्यास आपल्या मोहल्ल्यातील मस्जिदीतच नमाज अदा करावी, जेणेकरून गर्दी आणि गोंधळ टाळता येईल.  

मुरादाबादच्या जामा मस्जिदीतदेखील नमाजेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. मुरादाबादच्या इमाम सय्यद मासूम अली आझाद यांनी नमाजाची वेळ दुपारी 1 ऐवजी 2:30 वाजता करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुस्लिम बांधवांना शांततेचे आणि संयमाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणतात, 'रमजान हा इबादत, संयम आणि सहिष्णुतेचा महिना आहे. त्यामुळे होळीच्या दिवशी कोणताही वाद किंवा गैरसमज होऊ नये, यासाठी सर्वांनी शांतता राखावी आणि संयम बाळगावा.'  

सहारानपूरमध्ये जमात दावत अल-मुस्लिमीनचे प्रमुख मौलाना कारी इसहाक गोरा यांनी देखील मुस्लिम बांधवांना शांतता राखण्याचे आणि सहिष्णुतेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या व्हिडिओ संदेशात ते म्हणाले, 'होळी आणि रमजान एकाच दिवशी आल्यामुळे काही ठिकाणी गैरसमज किंवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी कोणत्याही प्रकारच्या वादात अडकू नये आणि आपल्या जवळच्या मस्जिदीतच नमाज अदा करावी.' मौलाना गोरा यांनी नमाजादरम्यान संयम आणि सौहार्द बाळगण्याचे आवाहन करताना सांगितले की, भारत हा विविधतेत एकता असणारा देश आहे. इथले समाज वेगवेगळ्या धर्मांचे आहेत आणि प्रत्येक धर्माचे अनुयायी आपले सण शांततेत साजरे करतात. हीच आपल्या देशाची खासीयत आहे.त्यामुळे या परंपरेला गालबोट लागेल अशी कृत्ये करू नयेत.'

मौलाना गोरा यांनी मुस्लिम बांधवांना विशेष आवाहन केले आहे. ते म्हणाले की, 'इस्लाम शांततेचा आणि संयमाचा संदेश देतो. आपल्या वर्तनातून इस्लामची शिकवणी जगाला दिसू द्या. कोणत्याही प्रकारच्या वादात अडकू नका. होळीच्या दिवशी संयम बाळगा. नमाज शांततेत अदा करा आणि कोणत्याही प्रकारच्या तणावाला उत्तेजन देऊ नका.' मौलाना गोरा यांनी एक व्हिडिओ संदेशात म्हटले की, "आपला देश विविध धर्मांचा संगम आहे. प्रत्येक जण आपला सण आणि परंपरा आनंदाने साजरा करतो. "

गोरा यांनी शेवटी म्हणाले, "भारतीय समाज विविधतेचा संगम आहे. प्रत्येक धर्माचे अनुयायी आपापले सण मोठ्या आनंदात आणि शांततेत साजरे करतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या वादाला थारा देऊ नका. शांततेचे वातावरण अबाधित ठेवा आणि सौहार्दाचे उदाहरण समाजापुढे ठेवा."

रतलाम येथील शहर काझी  मौलवी सय्यद अहमद अली यांनी मुस्लिम बांधवांना विनंती केली आहे की, होळीच्या उत्सवावेळी चुकून एखाद्या हिंदू बांधवाने रंग टाकल्यास त्याचा राग न धरता प्रसंगाला शांततेने सामोरे जावे. त्यांनी म्हटले आहे, "जर आपल्यावर चुकून एखाद्या हिंदू बांधवाने रंग टाकला, तर त्याचा वाईट अर्थ घेऊ नये. उलट, हसतमुख राहून उत्तम आचरण करा आणि सौहार्दाचा परिचय द्यावा."

उत्तर प्रदेश प्रशासनाने होळी आणि रमजानच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कडेकोट उपाययोजना केल्या आहेत. प्रमुख मस्जिदींच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने दोन्ही समाजांच्या नेत्यांसोबत बैठक घेऊन शांतता आणि सौहार्द कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. मुस्लिम धर्मगुरूंनी देखील आपआपल्या अनुयायांना संयम राखण्याचे आणि परस्पर सौहार्द टिकवण्याचे निर्देश दिले आहेत.  

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter