मुस्लिमबहुल गावात हिंदू महिलेचा 'पंचायतराज'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 9 h ago
मुस्लिमबहुल सिरोली गावातील नवनिर्वाचित सरपंच निशा चौहान
मुस्लिमबहुल सिरोली गावातील नवनिर्वाचित सरपंच निशा चौहान

 

हरियाणाच्या नूंह जिल्ह्यातील सिरोली गावाने नुकताच इतिहास घडवला आहे. त्यांच्या एका कृतीने देशभरात सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश दिला. मुस्लिमबहुल असलेल्या या गावात पंचायतीने एकमताने निशा चौहान या हिंदू महिलेची सरपंच म्हणून निवड केली आहे.

ग्रामपंचायत अधिकारी शमशेर सिंह हे सध्या नूंहचा अतिरिक्त भार सांभाळत आहेत. या निवडीविषयी त्यांनी सांगितले की, "पंचायतीत लोकशाही पद्धतीने निवडणूक पार पडली आणि सर्व सदस्यांचे या निर्णयावर एकमत होते."

सिरोली गावची एकूण १,२९६ इतकी लोकसंख्या आहे. यापैकी सुमारे २५० मतदार हिंदू , तर बाकी बहुतांश मुस्लिम समाजाचे आहेत. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास ओळखला जाणारा नूंह हा जिल्हा मेवातमध्ये  येतो. हा जिल्हा अलीकडेच सांप्रदायिक तणावामुळेही चर्चेत आला होता.

या गावातील ग्रामपंचायतीत एकूण १५ सदस्य आहेत, त्यापैकी ८ महिला आहेत. २ एप्रिलला झालेल्या बैठकीत ११ सदस्य उपस्थित होते. या बैठकीत सर्वांनी एकमताने ३० वर्षीय निशा चौहान यांची सरपंचपदी निवड केली. मुस्लिम बहुसंख्य गावाने हिंदू महिलेला नेतृत्वाची जबाबदारी देण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी.

या पंचायतीत सरपंचपद हे महिलांसाठी राखीव आहे. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत सहाना नावाच्या महिलेचा विजय झाला होता. परंतु त्यांचे शैक्षणिक कागदपत्र बनावट आढळल्याने त्यांना या पदावरून काढण्यात आले. त्यानंतर मार्च २०२४ मध्ये रेख्शिना यांची कार्यकारी सरपंच म्हणून नियुक्ती झाली होती. परंतु, त्यांच्या कामावर नाराज असलेल्या सदस्यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये अविश्वास ठराव मंजूर केला होता, त्यामुळे त्यांना ही पद सोडावे लागले होते.

सरपंचपदी निवड झाल्यानंतर निशा चौहान भारावून गेल्या. यावेळी प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, "माझी निवड ही मेवातच्या गंगा-जमुनी संस्कृतीचा विजय आहे. इथे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये नेहमीच बंधुभाव राहिला आहे. गावातील प्रत्येक प्रत्येक वर्गापर्यंत विकास पोहोचवण्याचा माझा उद्देश आहे. सर्वधर्मियांची सेवा करण्याची माझी जबाबदारी आहे."
 

स्थानिक मुस्लिम नेत्यांचा पाठिंबा
सिरोली गावचे माजी सरपंच आणि सध्याचे पंचायत सदस्य अशरफ अली यांनीही निशा चौहान यांच्या निवडीचे समर्थन केले. ते म्हणाले, "आमच्याकडे धर्माच्या आधारावर कधीच भेदभाव केला जात नाही. इथले लोक एकमेकांच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांत उत्साहाने सहभागी होतात. निशा चौहान गावाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करतील अशी आम्हाला आशा आहे. "

मेवातने दिला एकतेचा संदेश
सांप्रदायिक तणावामुळे नूंह जिल्हा अनेकदा माध्यमांमध्ये चर्चेत असतो. अशी पार्श्वभूमी असणाऱ्या या ठिकाणाहून धार्मिक सौहार्दाची बातमी येणे निश्चितच मनाला सुखावणारी आहे. निशा चौहान यांची सरपंचपदी झालेल्या निवडीतून स्पष्ट होते की गावखेड्यातील माणसे अजूनही धर्मापलीकडे जाऊन परस्पर विश्वास आणि विकास यांना प्राधान्य देतात हेच निशा चौहान यांच्या निवडीतून दिसून येते.

सलोख्याचा नवा आदर्श
सिरोली गावची ही निवडणूक धर्म आणि जातीच्या सीमा ओलांडून एकता, शांतता आणि विकास दर्शवते. देशात जातीय तणाव वाढवण्याचे प्रयत्न होत असताना, मेवातमधील ही घटना भारतातीय संस्कृतीतील विविधता आणि एकतेची आठवण करून देणारी ठरली. इच्छाशक्ती असेल तर मतभेद मिटवूनही सौहार्दाची मिसाल निर्माण करता येते, ही या उदहरणातून स्पष्ट होते.
 
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter