राजकारणाची भाषा अशा स्वरूपाची असते, की त्यातून असत्य हेही सत्य वाटू लागते.
- जॉर्ज ऑर्वेल, साहित्यिक
पंजाब पोलिसांच्या हातावर तुरी देऊन मोकाट फिरणाऱ्या आणि वयाची तिशीही न गाठलेल्या अमृतपाल सिंगमुळे १९८० या दशकातील खलिस्तानवादी चळवळ आणि तिचा नेता जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्या कटू आठवणी जाग्या होणे स्वाभाविक आहे.
मात्र, त्यानंतरच्या चार दशकांत आरपार बदलून गेलेल्या समाजकारणामुळे आता खलिस्तानवादी चळवळीला फारसा प्रतिसाद नाही, हे स्पष्ट दिसत आहे. तरीही पंजाबमध्ये अशा प्रवृत्ती अधूनमधून डोके वर का काढत आहेत, याचा गांभीर्याने विचार केवळ पंजाबमध्ये सध्या सत्तारूढ असलेल्या ‘आम आदमी पक्षा’लाच नव्हे तर केंद्रांत गेली जवळपास दहा वर्षे सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षालाही करावा लागणार आहे.
गेल्या दोन दिवसांत पंजाब पोलिसांनी अमृतपाल सिंग आणि त्याच्या समर्थकांविरोधात कडी मोहीम हाती घेतली आहे. अमृतपालसिंगचा ठावठिकाणा आज ना उद्या लागेलच; पण त्यापूर्वीच त्याच्या ७८ समर्थकांना ताब्यात घेण्यात आले असून, दरम्यान राज्यात अफवा पसरून आणखी काही अनवस्था प्रसंग गुदरू नये म्हणून केवळ मोबाइल इंटरनेट सेवाच नव्हे तर ‘एसएमएस’ सेवाही बंद करण्यात आली आहे.
पंजाबचे स्वास्थ्य बिघडवणाऱ्या या घडामोडींचे मूळ शोधून काढले पाहिजे. राज्यातील अंमली पदार्थांचा विळखा, शेतीशी संबंधित प्रश्नांची तीव्रता असे काही घटकही अस्वस्थेच्या मुळाशी असू शकतात. दोन वर्षांपूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनात घुसलेल्या अपप्रवृत्तीही या बिघडलेल्या परिस्थितीला कारणीभूत आहेत, असे म्हणावे लागते.
याचे कारण शेतकरी आंदोलनातील दीप सिद्धू या अतरंग पद्धतीने वागणाऱ्या तरुणाशी तेव्हा दुबईत व्यवसाय करणाऱ्या अमृतपालचे निकटचे संबंध होते. याच सिद्धूने या आंदोलनात थेट लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला आणि आंदोलनास हिंसक वळण लागले.
त्या दरम्यान सिद्धूने ‘वारिस दे पंजाब’ नावाची एक संघटना स्थापन केली. त्याचा नावाचा अर्थ ‘पंजाबचे खरे वारसदार’ असा होतो. पुढे सिद्धूचा अपघाती मृत्यू झाला आणि अमृतपालसिंग भारतात परतला तोच भिंद्रनवालेच्या वेषात!
तेव्हापासून या संघटनेची सूत्रे तर त्याने हाती घेतली. पुढे भारतात त्याच्या अनेक कारवाया सुरू झाल्या. फेब्रुवारीत तो आणि त्याच्या समर्थकांनी अमृतसरजवळच्या एका पोलिस ठाण्यावर हल्ला चढवल्यापासून पंजाब पोलिस त्याच्या मागावर आहेत. आपल्या एका समर्थकाची सुटका करावी म्हणून हा हल्ला करण्यात आला होता. तेव्हापासून पोलिस त्याच्या मागावर आहेत.
अमृतपालसिंग आणि त्याचे समर्थक आपला कोणत्याच राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे सांगत असले तरी दहशतवाद्यांचा आणि विशेषत: खलिस्तानी समर्थकांचा आपल्या हितसंबंधांसाठी वापर करून घेण्याची प्रथा किमान पंजाबात तरी नवी नाही. १९८० या दशकात भिंद्रनवालेचे भूत उभे करण्यात अकाली दलाबरोबरच काही प्रमाणात काँग्रेसही जबाबदार होती.
तर आता वर्षभरापूर्वी पार पडलेल्या पंजाब विधानसभेच्या निवडणूक मोहिमेच्या काळात ‘आप’चे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही खलिस्तानवाद्यांच्या भेटीगाठी घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.
त्यानंतर सारवासारव करण्यात ‘आप’ नेत्यांची बरीच दमछाक झाली होती. या पार्श्वभूमीवर आता पंजाब पोलिसांनी अमृतपालसिंगचा छडा लावण्यासाठी राज्यभरात जाळे का लावले आहे, ते लक्षात घ्यावे लागते.
पंजाबचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे नेते भगवंत मान यांची अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर भेट झाली होती. त्यानंतरच अमृतपालविरोधातील कारवाईला गती मिळाली आहे. शहा यांनी मान यांना बोलावून घेऊन अमृतपाल तसेच त्याचे समर्थक यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे थेट आदेश दिले होते, असे सांगितले जाते.
याच विषयावर शहा यांनी पंजाबच्या राज्यपालांशीही चर्चा केली आहे. त्याचे कारण पंजाब पोलिसांच्या ढिसाळ वर्तनामुळेच अमृतपालसिंग त्यांच्या हातावर तुरी देऊन मोकाट आहे, असे केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचे ठाम मत झाले आहे.
त्यानंतरच शहा यांनी ही पावले उचलली आहेत. अर्थात, खलिस्तानवादी चळवळ पुन्हा फोफावू नये आणि त्यातून चार दशकांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, हाच उद्देश आहे.‘वारिस दे पंजाब’ या संघटनेचा हेतू हा पंजाबी संस्कृती तसेच भाषा यांचे रक्षण करणे, हा असल्याचे सांगितले जाते.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंजाबच्या विकासासाठी फारसे काही झालेले नाही, असे या संघटनेचे म्हणणे आहे. त्यात तथ्य अर्थातच नाही. मात्र, अस्मितेचा अंगार पेटवायचा प्रयत्न करायचा आणि अर्धसत्य, वावड्या, वदंता यांची भर घालून आग भडकवत ठेवण्याचा प्रयत्न करायचा, असे प्रकार केले जातात.
दुर्दैवाने अशा प्रयत्नांना झपाट्याने प्रतिसादही मिळतो. गेल्या काही दिवसांत एक लोकप्रिय आणि धडाडीचा नेता म्हणून अमृतपालसिंगची प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न होत आहे. दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर त्या प्रयत्नांना वेग आलेला दिसतो.
अशाप्रकारे एखाद्या व्यक्तीचे प्रस्थ वाढवून त्याभोवती वलय निर्माण केले जात असेल तर असे प्रयत्न वेळीच हाणून पाडावे लागतात. विशेषतः पंजाबसारख्या सीमावर्ती राज्यात या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागते.
त्यामुळेच राजकीय पक्षांनीही संयम पाळून आपल्याकडून विस्तवाशी खेळ होणार नाही, हे एकीकडे कटाक्षाने पाहिले गेले पाहिजे आणि दुसरीकडे शेतीपासून ते अन्य आर्थिक-सामाजिक प्रश्नांची तड लावण्यासाठी कार्यक्षम कारभार केला पाहिजे. विघातक शक्तींचा मुकाबला करण्याचा तोदेखील प्रभावी मार्ग आहे.
सौजन्य दै. सकाळ