प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार गुरव यांना निवेदन देताना इरफान शेख, इकबाल शेख, नईम शेख आदी.
रमजान महिना सुरू झाला आहे. रमजान सुरू होण्याआधी एकता लब्बैक मल्टीपर्पज फाऊंडेशनने यावल शहरातील काही महत्त्वाच्या समस्या सोडवण्यासाठी पालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे. यामध्ये शहराची साफसफाई, पाणीपुरवठा नियमित करणे आणि बंद पडलेले पथदिवे सुरु करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होता. या फाऊंडेशनने या समस्यांबाबत पालिका प्रशासन व प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पवित्र रमजान महिन्यात शहरातील गल्लो-गल्लीत गोळा होणारा कचरा वेळेवर साफ केला जावा. तसेच त्याची नियमित विल्हेवाट लावली जावी. गटारींवर औषध फवारणी आणि पावडर टाकण्यात यावी. लक्कडपेठ ते कुरेशी मोहल्ला आणि धाडी नदी परिसरातील गटारींमध्ये साचलेली घाण तातडीने काढावी. या गटारींची स्वच्छता करण्यासाठी जेसीबीची मदत घेऊन गाळ आणि कचरा काढला जावा.
पाणीपुरवठा अनियमित असल्याने शहरातील पाणीपुरवठा नियमित करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.लोहारा येथून पाणी येते, परंतु विद्युत पुरवठा खंडित झाल्यास पाणीपुरवठा ठप्प होतो. यासाठी जनरेटरची व्यवस्था केली जावी, जेणेकरून पाणीपुरवठा चालू राहील.
तसेच, शहरातील बंद पडलेले पथदिवे लवकरच बदलून नवीन लावावेत. मिल्लतनगर भागातील साफसफाई आठवड्यात दोन वेळा केली जाते, पण ती चार वेळा केली जावी. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही. मिल्लतनगरमध्ये हरित पट्ट्याजवळ गटारी नसल्यामुळे पाणी शौष खड्ड्यात सोडले जाते. यामुळे सांडपाणी घरांमध्ये येऊ लागले आहे. यासाठी शोषखड्ड्यांतील पाणी पालिकेने व्हॅक्यूम यंत्राने काढावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
निवेदन स्वीकारताना नायब तहसीलदार श्री. गुरव आणि पालिकेच्या सहाय्यक कार्यालय निरीक्षक संगीता बाक्षे यांची उपस्थिती होती. निवेदन देताना एकता लब्बैक मल्टीपर्पज फाऊंडेशनचे अध्यक्ष इरफान शेख, नईम शेख, अबरार कुरैशी, रईस सलमानी, मोहसीन शेख, साबीर शेख, मुदस्सर शेख, साजिद सलमानी, इस्माइल शेख आदी उपस्थित होते.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter